Home » सुयोग्य नेतृत्वाअभावी काँग्रेस रसातळाला जाणार?

सुयोग्य नेतृत्वाअभावी काँग्रेस रसातळाला जाणार?

by Team Gajawaja
0 comment
काँग्रेस
Share

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जवळजवळ सत्तर वर्षे संपूर्ण देशावर निरंकुश सत्ता गाजविणाऱ्या काँग्रेस पक्षाची आजची दयनीय अवस्था पाहता काँग्रेसच्या नेतृत्वानेच काँग्रेसला रसातळाला नेण्याचे ठरविले आहे की काय? अशी भावना सर्वत्र निर्माण झाली आहे. 

देशाच्या कोणत्याही भागात होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला एकसारखे पराभवाचे धक्के सहन करावे लागत आहेत. मात्र त्याची जबाबदारी कोणीच घेत नाही आणि पराभवामुळे कोणीही शहाणे होऊन पक्ष संघटनेमध्ये आवश्यक ते बदल घडवून आणले जात नाहीत, असेच चित्र गेल्या काही वर्षांपासून दिसत आहे. 

गेल्या दोन-तीन वर्षांपासून काँग्रेससारख्या देशातील एका प्रमुख पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळत नाही, हीच खरी म्हणजे फार मोठी शोकांतिका आहे आणि विशेष म्हणजे त्याचे सोयरसुतक कोणालाच वाटत नाही. आगामी काळात पक्षाचे काय होणार याचीही चिंता फारसं कोणी करताना दिसत नाही. 

वास्तविक गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात आणि देशाच्या अनेक राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेस हाच एकमेव देशव्यापी पक्ष सक्षम होता. परंतु सध्याची काँग्रेसची स्थिती पाहता काँग्रेस हाच भाजपला पर्यायी पक्ष आहे, असे म्हणणाऱ्यांची वेड्यात गणना होऊ शकते. 

संपूर्ण भारत देश ‘काँग्रेसमुक्त’ करण्याचे ‘लक्ष्य’ ठरवून सत्ता काबीज करणाऱ्या भाजपची लढाई आता हळूहळू एकतर्फी होत चालली आहे. कारण काँग्रेसने स्वतःहूनच देशाला ‘काँग्रेसमुक्त’ करायचे ठरविले आहे की काय, अशी दाट शंका येऊ लागली आहे. इतकी निष्क्रियता काँग्रेसमध्ये आज आलेली आहे.

२०१४ साली भाजपने नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व पुढे करून अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने काँग्रेसची केंद्रातील सत्ता हस्तगत केली. परंतु त्यानंतर काँग्रेसने पुन्हा सत्ता हस्तगत करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत असेच दिसून येते. मधल्या काळात मोदींविरोधात आक्रमक झालेल्या राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळून पक्षात काहीसे चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाल्यावर पराभवाची जबादारी घेऊन त्यांनीही काँग्रेस अध्यक्षपद सोडले आणि पक्षाची हंगामी सूत्रे पुन्हा सोनिया गांधी यांच्याकडे आली. 

वास्तविक पाहता ‘राहुल गांधी यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाकडून पक्षातील कार्यकर्त्यांच्या खूप अपेक्षा होत्या मात्र सातत्याचा अभाव, पक्ष संघटना बळकट करण्यासाठी न घेतलेले कष्ट, तसेच पक्षाला लागलेली गळती थांबविण्यासाठी कसलेच प्रयत्न न करण्याचा निर्धार आणि भाजपने निर्माण केलेली ‘पप्पू’ ही प्रतिमा पुसून टाकण्यात आलेले अपयश, यामुळे राहुल गांधी यांचा कोणताही प्रभाव पडला नाही. 

राहुल गांधी यांच्याबरोबरच प्रियांका गांधी यांचेही नेतृत्व उदयास आले, मात्र त्यांनी आपले कार्यक्षेत्र उत्तरप्रदेश या एकाच राज्यापुरते मर्यादित ठेवले. उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाचा खऱ्या अर्थाने कस लागला. मात्र निवडणुकीत झालेल्या काँग्रेसच्या दारुण पराभवामुळे त्यांच्या नेतृत्वाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राहुल पाठोपाठ प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाबाबतीतही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे काँग्रेस आणि गांधी घराण्याचा वाद पुन्हा निर्माण  झाला.

मधल्या काळात काँग्रेस पक्षाची सूत्रे गांधी घराण्याबाहेरच्या व्यक्तीकडे सुपूर्द करावीत अशी मागणी काँग्रेसमधूनच करण्यात येऊ लागली होती. त्यासाठी काँग्रेसमधील काही असंतुष्ट नेत्यांनी (जी-२३ गट) बैठकाही घेण्यास प्रारंभ केल्या होत्या, मात्र पुढे कोठे घोडे अडले? हे त्यांनाच माहित. त्यामुळे नेतृत्वबदलाचा प्रश्न फुसका बारच ठरला. 

====

हे देखील वाचा: Rahul Gandhi On Central Govt: मोदी सरकारने जनतेच्या सुरक्षेसाठी पावले उचलावीत, राहुल गांधींचे केंद्राला आवाहन

====

नुकतेच महाराष्ट्राचे नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी, काँग्रेसने तरुणांच्या हातात नेतृत्व देणे पक्षाला महाग पडले असे विधान केले आहे. त्यांचा अप्रत्यक्ष रोख राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याकडे होता हे उघडच आहे. 

हे दोघेही पक्षातील जुन्याजाणत्या नेत्यांना फारसे महत्व देत नाहीत, असा त्यांचा आक्षेप असावा आणि तो खराही आहे. परंतु तरुण नेतृत्व आणि पक्षातील जुनेजाणते नेतृत्व यांच्यात समन्वय घडवून आणण्याची  जबाबदारी कोणी पार पाडावयाची हाच खरा यक्षप्रश्न आहे. 

सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षापुढची एक प्रमुख समस्या सांगितली असली, तरी त्यावर नजीकच्या काळात काही उपाययोजना होऊ शकेल याची सुतराम शक्यता नाही. थोडक्यात रोग माहित झाला आहे मात्र  त्यावर जालीम उपाय कोणी आणि कसे करायचे? अशी काँग्रेस पक्षाची सध्याची अवस्था झाली आहे. 

====

हे देखील वाचा: Assembly Election 2022: मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, ‘निवडणुकीत पराभवासाठी एकट्या गांधी कुटुंबाला जबाबदार धरणे योग्य नाही’

====

काँग्रेस पक्ष तळागाळात रुजलेला आहे त्यामुळे फिनिक्स पक्षासारखा तो राखेतूनही पुन्हा वर  येईल अशीच काही काँग्रेस नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची अजूनही समजूत आहे. वास्तविक या समजुतीला अनेकवेळा तडे गेले आहेत मात्र तरीही कसलीच उपाययोजना न करून ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याकडेच पक्षश्रेष्टींचा कल आहे. तसे झाल्यास काँग्रेस पक्षाचे भवितव्य अंधकारमय आहे असेच म्हणावे लागेल.  

एकीकडे भाजपसारखे तगडे आव्हान समोर उभे असताना सुयोग्य नेतृत्वाअभावी काँग्रेस स्वतःच रसातळाला जाणार की काय? याचीच भीती वाटत आहे.

– श्रीकांत नारायण

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.