Home » एनडीआरएफ जवान देशाचे भक्कम रक्षक 

एनडीआरएफ जवान देशाचे भक्कम रक्षक 

by Team Gajawaja
0 comment
NDRF Soldier
Share

गुजरातमध्ये बिपरजॉय या चक्रीवादळानं धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसापासून या बिपरजॉय चक्रीवादळाचे हे धुमशान सर्वजण बघत आहेत. गुजरातच्या समुद्रकिना-यावरील जवळपास सर्वच झाडे या चक्रीवादळाच्या फटक्यानं पडली आहेत. हजारो लाईटचे खांबही उखडले आहे. बिपरजॉय चक्रीवादळ प्रथम जखाऊ किनारपट्टीला धडकले. त्यानंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  या वादळामुळे दोघांचा मृत्यू झाला असून 22 हून अधिक जण जखमी झाले आहेत. याशिवाय अनेक पशूधनही बाधित झाले आहे. मुख्य म्हणजे कच्छ, मांडवी, नलिया, नारायण सरोवर, जखाऊ बंदर, मुंद्रा आणि गांधीधाम, अहमदाबादमध्ये राज्यभर मुसळधार पाऊस आणि जोरदार पाऊस पडत आहे. या बहुतांश भागातील विद्युत पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून बंद करण्यात आला होता. तसेच हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. शिवाय नागरिकांना घराच्या बाहेर पडू नका असे आवाहनही करण्यात आले होते. असे आवाहन करतांना मात्र काही जवान समुद्रकिना-यावर फिरत होते. पडलेली झाडे त्वरित दूर करत होते. तर कुठे पडलेले विद्युत खांब सावरुन पुन्हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते. काही ठिकाणी अजूनही नागरिकांनी आपली घरे सोडली नव्हती. अशांना भर वादळात सुरक्षितस्थळी हलवत होते. काही ठिकाणी गर्भवती महिलांना त्रास सुरु झाल्याची बातमी आली, लगेच हे जवान घटनास्थळी गेले आणि त्यांनी त्या महिलांना आवश्यक अशी वैद्यकीय सुविधा असेल अशा हॉस्पिटलमध्ये हलवले. गुजरातमध्ये बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका बसणार अशी माहिती मिळताच ही जवानांची फौज दिवसरात्र काम करत आहे. त्यांच्या या शौर्यामुळेच गुजरातला बिपरजॉय चक्रीवादळाचा मोठा फटका बसला असला तरी कुठलेही नुकसान झालेले नाही. हे जवान म्हणजे डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स अँड सिव्हिल डिफेन्स म्हणजेच एनडीआरएफचे जवान आहेत. (NDRF Soldier)

डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स अँड सिव्हिल डिफेन्सची स्थापना 2005 मध्ये झाली. आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अंतर्गत, धोकादायक आपत्ती परिस्थिती किंवा आपत्तीला विशेष प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने या एनडीआरएफची स्थापना केली. भारतातील आपत्तींचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असते. मात्र जेव्हा बिपरजॉय चक्रीवादळ किंवा तस्सम गंभीर स्वरुपाची आपत्ती येते, तेव्हा राज्याच्या विनंतीनुसार सशस्त्र दल, केंद्रीय निमलष्करी दल, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स यांची राज्याला मदत करण्यात येते. केंद्र सरकार याबाबत निर्णय घेते.  हे एनडीआरएफचे जवान सगळ्या कठीण परिस्थितीत काम करण्यास सक्षम असतात. त्यामुळेच जेव्हा जोरदार पाऊस पडतो, पूरपरिस्थिती निर्माण होते, तेव्हा प्रथम एनडीआरएफची तुकडी दाखल होते. आता बिपरजॉय मध्येही या एनडीआरएफच्या जवानांनी जी कामगिरी पार पाडली आहे, त्याला तोड नाही. (NDRF Soldier)   

नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सचे प्रमुख महासंचालक म्हणून नियुक्त केले जातात. एनडीआरएफचे महासंचालक हे भारतीय पोलीस संघटनांकडून प्रतिनियुक्तीवर असलेले आयपीस अधिकारी असतात. सध्या हा पदभार अतुल करवाल यांच्याकडे आहे. यात भारताच्या पॅरा-मिलिटरी फोर्समधून प्रतिनियुक्तीवर आलेल्या जवानांची भर्ती होते. देशाची तीन सीमा सुरक्षा दले,  तीन केंद्रीय राखीव पोलीस दले, दोन केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दले, दोन इंडो-तिबेट सीमा पोलीस आणि दोन सशस्त्र सीमा बले यातील जवान या दलात असतात. एनडीआरएच्या प्रत्येक बटालियनमध्ये अभियंता, तंत्रज्ञ, इलेक्ट्रिशियन, श्वान पथक आणि वैद्यकीय पथकासह 45 कर्मचार्‍यांचा समावेश असतो. हे जवान इमारत कोसळणे, भूस्खलन, विनाशकारी पूर आणि चक्रीवादळ,  भूकंप अशा विविध आपत्तींमध्ये काम करतात. आतापर्यत एनडीआरएफच्या जवानांनी लाखो नागरिकांचे जीव वाचवले आहेत. गुजरातमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपही या जवानांनी केलेल्या कार्याचे कौतुक झाले होते. (NDRF Soldier)

याशिवाय आसाममध्ये आलेली पूरपरिस्थिती, बिहारमधील कोसी रिफ्ट दुर्घटना, चेन्नईमधील विनाशकारी पूर, पश्चिम बंगालमधील आयला चक्रीवादळ आदी घटनांतून एनडीआरएफच्या जवानांनी हजारो नागरिकांचे जीव वाचवले आहेत. या एनडीआरएफच्या जवानांनाचे प्रशिक्षणही यासाठी अत्यंत कठीण असते. एनडीआरएफ जवानांच्या अभ्यासक्रमात पूर बचाव, कोसळलेल्या संरचना शोध आणि बचाव, प्रथमोपचार प्रतिसाद, दोरी बचाव, आण्विक, जैविक आणि रासायनिक आणीबाणी, मृतदेहांची सन्माननीय विल्हेवाट आदीचा समावेश असतो. एनडीआरएफच्या  जवानांना NISA, DRDO, BARC, CME, आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये तसेच यूएसए, सिंगापूर, चीन, फिनलंड, कोरिया, स्वित्झर्लंड आदी परदेशी देशांमध्येही प्रशिक्षण दिले जाते. (NDRF Soldier)

========

हे देखील वाचा : नरेंद्र मोदी आजचे आणि 2005 चे…

========

अशा सक्षम प्रशिक्षणातून तयार झालेले जवान हे देशासाठी काहीही करण्यासाठी तयार असतात. बिपरजॉय चक्रीवादळात जेव्हा 150 किमी वेगानं वारे वाहत होते, तेव्हाही हे जवान समुद्रकिना-यावर एका भक्कम भिंतीसारखे उभे होते. त्यांच्या दक्षतेमुळेच एवढ्या मोठ्या आपत्तीतही मनुष्यहानी झाली नाही. ज्या भागातला विद्युत पुरवठा खंडित झाला, तो रातोरात पूर्ववत करण्यातही या एनडीआरएफच्या जवानांचा मोठा वाटा आहे.  भारताच्या या जवानांना सलामच आहे.

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.