फनी, क्रोध, वायू, ओखी, निसर्ग, जोवाद….ही आहेत चक्रीवादळाची नावं. हिंदी महासागरात ‘सायक्लोन’, तर अटलांटिका महासागरात ‘हरिकेन’ आणि पॅसिफिक महासागरात ‘टायफून’ अशा वेगवेगळ्या नावानं चक्रीवादळाची ओळख आहे. असं असलं तरी त्यांची नावं ही वेगळी आणि हटके असतात. ही नावं ठेवण्याची कारणं अनेक आहेत. (who decides cyclone names?)
समुद्रात चक्रीवादळ निर्माण झालं की, हवामान खात्याकडून त्याचं बारसं केलं जातं. या नामकरणातून त्या चक्रीवादळाचा आवाका किती असेल याचीही कल्पना देण्यात येते. या नावामागे चक्रीवादळांचा ज्यांना फटका बसणार आहे, अशा लोकांना त्याची माहिती मिळावी आणि संभाव्य नुकसानीपासून त्यांचे रक्षण व्हावे हीच भावना असते.
चक्रीवादळ म्हणजेच ‘सायक्लोन’ हा शब्द ‘सायक्लोस’ या ग्रीक शब्दापासून आला आहे. त्याचा अर्थ ‘वेटोळे घातलेला साप’ असा होतो. कमी दाबाच्या क्षेत्राभोवती वातावरणातील फरकामुळे चक्रीवादळे तयार होतात. जर चक्रीवादळाचा वेग ताशी 34 नॉटिकल मैलांपेक्षा जास्त असेल, तर त्याला विशेष नाव देणे गरजेचे ठरते. वादळानं आपला वेग 74 मैल प्रती तासापर्यंत पार केला, तर त्या वादळाचे वर्गीकरण चक्रीवादळात करण्यात येते. जगभरातील कोणत्याही महासागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना प्रादेशिक हवामान केंद्रे नावे देतात. भारतीय हवामान विभाग (IMD) सह जगात एकूण सहा असे विभाग कार्यरत आहेत.
सुरुवातीला, चक्रीवादळांना मोठे जहाज, कॅथोलिक संत यांच्या नावावरुन नावे देण्यात आली. 1900 च्या दशकाच्या सुरुवातीस, चक्रीवादळांना स्त्रीलिंगी नावे देण्यात आली, तर 1979 मध्ये पुरुषांची नावे दिली गेली. आता जागतिक हवामान संघटना (WMO) आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर द आशिया पॅसिफिक (ESCAP) सन 2000 पासून चक्रीवादळांना नावे देत आहेत. भारतीय हवामान विभाग हिंद महासागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना नावे देत आहे. ताशी 65 किमीपेक्षा अधिक वेगाच्या चक्रीवादळाचे नामकरण होते.(who decides cyclone names?)
नावे देताना कुणाच्या भावना न दुखवण्याची सूचना दिली जाते. महासागरानुसार काही झोन तयार करण्यात आले आहेत. त्या-त्या झोनमधील देशांनी नावे सुचवायची आणि जसजशी चक्रीवादळे येतील तशी अनुक्रमे येणाऱ्या वादळांना नावे द्यायची हा नियम आहे.
भारत नॉर्थ इंडियन ओशनिक झोनमध्ये येतो. हिंद महासागर क्षेत्रातील आठ देशांनी भारताच्या मागणीनुसार या चक्रीवादळांचे 2004 पासून नामकरण करण्याची व्यवस्था करून दिली. या आठ देशांमध्ये बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, थायलंड आणि श्रीलंकेचा समावेश आहे. 2018 मध्ये, इराण, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन हे पाच देशही यात जोडले गेले.
या देशांकडून नावाबाबतच्या सूचना जागतिक हवामान संघटनेला पाठवण्यात येते. त्या नावांबाबत विचार करुन मग चक्रीवादळाचं एक नाव ठरवण्यात येतं. आत्तापर्यंत प्रत्येक देशाने वादळासाठी प्रत्येकी 8, अशी 64 नावे ठरवून दिली आहेत. चक्रीवादळांची 64 नावे ठेवण्यात आली आहेत
चक्रीवादळांना नाव देण्यामागे एक व्यापक दृष्टीकोन आहे. चक्रीवादळांची नावे लोकांना सहज ओळखता यावीत म्हणून देण्यात येतात. चक्रीवादळांना नावे देण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वेही आहेत. चक्रीवादळाचे प्रस्ताविक नाव व्यक्ती, धार्मिक श्रद्धा, संस्कृती याबाबत टिका करणारे नसावे. नाव लहान, उच्चारायला सोपे असावे. चक्रीवादळाचे नाव जास्तीत जास्त आठ अक्षरांचे असले पाहिजे आणि ते उच्चार आणि आवाजासह देण्यात यावे, हा प्रमुख नियम आहे. उत्तर हिंद महासागरात येणाऱ्या चक्रीवादळांची नावे पुन्हा देता येत नाहीत.
चक्रीवादळाच्या नावांमागच्या गमतीशीर गोष्टी
चक्रीवादळांच्या नावामागेही गमतीशीर अशा गोष्टी लपलेल्या असतात. नोव्हेंबर 2017 मध्ये आलेल्या ‘ओखी’ या चक्रीवादळाला बांगलादेशने नाव दिले होते. त्याचा बंगाली भाषेत ‘डोळा’ हा अर्थ होतो. बांगलादेशने चक्रीवादळाला ‘फानी’ किंवा ‘फोनी’ हे नाव देखील दिले आहे. ‘फानी’ म्हणजे स्थानिक बांगला भाषेत सापाचे वेटोळे.
13 जून 2019 रोजी ‘वायू’ नावाचे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकले. हे नाव भारताने दिले होते. म्यानमारने एका चक्रीवादळाला ‘टौकटे’ हे नाव दिले. म्यानमारमध्ये सरपटणाऱ्या प्राण्याला टौकटे म्हणतात.
श्रीलंकेने एका चक्रीवादळाला ‘असनी’ असे नाव दिले. या शब्दाचा सिंहली भाषेत क्रोध असा अर्थ होतो. आत्तापर्यंत अमेरिकेकडून चक्रीवादळांना महिलांची नावे दिली गेली आहेत. (who decides cyclone names?)
या चक्रीवादळांचे एकदा दिलेले नाव बदलण्याची पद्धतही आहे. ती मात्र थोडी किचकट आहे. जागतिक हवामान संघटनेच्या चक्रीवादळ, टायफून आणि उष्णकटिबंधीय चक्रीवादळ समितीचे कोणीही सदस्य उष्णकटिबंधीय चक्रीवादळाचे नाव चक्रीवादळांच्या नामकरण सूचीमधून काढून टाकण्याची विनंती करू शकतात. यावर एकमत झाल्यास हे नाव बदलण्यात येते.
चक्रीवादळाचे नाव ठेवताना जागतिक हवामान संघटनेच्या चक्रीवादळ समितीने निश्चित केलेल्या एकवीस नावांच्या सहा फिरत्या वर्णमाला यादीतून नाव निवडण्यात येते. सध्या हवामान खात्यातील आधुनिक सुविधांमुळे आगामी चक्रीवादळांची पूर्वसूचना खूप आधी लागते. त्यामुळे त्यांचे नामकरणही तेवढ्याच लवकर होते.
– सई बने