Home » पहिल्यांदाच 2024 च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसणार महिला शक्ती

पहिल्यांदाच 2024 च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसणार महिला शक्ती

by Team Gajawaja
0 comment
Women Parade
Share

आपल्या देशाची राजधानी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी होणारी परेड ही भारतातील प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाच्या परेडपैकी सर्वात मोठी असते.  26 जानेवारी रोजी नवी दिल्ली येथील कर्तव्य पथावरील ही परेड दोन्ही गोष्टींसाठी महत्त्वाची असते. एक म्हणजे, प्रत्यक्ष ही परेड बघणारे आणि दुसरे म्हणजे, या परेडमध्ये सहभागी होण्याचा गौरव ज्यांना मिळाला आहे ते.  प्रजासत्ताक दिनाची पहिली परेड 1950 मध्ये झाली होती. तेव्हापासून दरवर्षी होणारी परेड अधिकाधिक वैशिष्टपूर्ण होत आहे. आता 2024 ची होणारी परेड अशीच वैशिष्टपूर्ण ठरणार आहे. कारण 2024 च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये फक्त महिलाच सहभागी (Women Parade) होणार आहेत. महिला शक्ती बँडपासून सर्वत्र दिसणार आहे.  संरक्षण मंत्रालयाने यासंदर्भात सशस्त्र दलांना पत्र लिहिले आहे. यावर्षीच्या परेडममध्येही हवाई दलाच्या महिला दलाने भाग घेतला होता.  आता 2024 मध्ये प्रजासत्ताक दिनाची परेड संपूर्ण महिलांची असणार आहे.  देशाच्या स्त्री शक्तीची झलक राजधानी दिल्लीमध्ये बघता येणार आहे.  

26 जानेवारी 2024 रोजी होणार्‍या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कर्तव्याच्या मार्गावर केवळ महिलांचा समावेश केला जाणार आहे. परेड व्यतिरिक्त संचलन पथक, सांस्कृतिक कार्यक्रमात फक्त महिलाच असणार आहेत. यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाने लष्करी दल आणि परेडमध्ये सहभागी असलेल्या इतर विभागांना पत्र लिहून माहिती दिली आहे. (Women Parade)

गेल्या काही वर्षांत, केंद्र सरकारने सशस्त्र दलांमध्ये स्त्री-पुरुष समानतेला चालना देण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. त्याचीच पुढची पायरी म्हणून या निर्णयाकडे बघितले जाते. 29 एप्रिल रोजी आर्टिलरी रेजिमेंटमध्ये पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यांना पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहे. महिला सैन्य अधिका-यांची शक्ती महिला दिनाच्या परेडमध्ये (Women Parade) देशाला बघता येणार आहे. त्यातून प्रेरणा घेऊन अनेक तरुणी सैन्यामध्ये भरती होण्यासाठी प्रयत्न करतील. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याचा निर्णय ‘डी-ब्रीफिंग बैठकीत’ घेण्यात आला. संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत लष्कर, नौदल, हवाई दल, गृह मंत्रालय, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते. यात प्रजासत्ताक दिन परेड 2024 मधील कर्तव्य मार्गावरील परेड दरम्यानच्या तुकडी, टॅबलेक्स आणि इतर प्रदर्शनांमध्ये फक्त महिला सहभागी असतील असा निर्णय घेण्यात आला आहे. (Women Parade)

यावर्षी झालेल्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारताने केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि त्रिपुरा यांच्या झलकामध्ये ‘महिला शक्ती’ ही मुख्य थीम ठेवली होती.  यात लेफ्टनंट कमांडर दिशा अमृत यांच्या नेतृत्वाखाली 144 खलाशांच्या तुकडीने परेडमध्ये भाग घेतला. 

अलिकडच्या वर्षांत सरकार सशस्त्र दलांमध्ये महिलांच्या मोठ्या भूमिकेसाठी जोर देत आहे. प्रथमच, भारतीय लष्कराने अलीकडेच आपल्या तोफखाना रेजिमेंटमध्ये पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश केला आहे. लष्कराच्या आर्टिलरी रेजिमेंटमध्ये प्रथमच महिलांचा समावेश झाला आहे. त्यापैकी तीन चीन आणि 2 पाकिस्तान सीमेवर तैनात आहेत. भारतातील महिला अधिकारी अत्यंत गौरवास्पद कामगिरी पार पाडत आहेत. कर्नल गीता राणा अलीकडेच चीनच्या सीमेला लागून असलेल्या संवेदनशील लडाख प्रदेशात युनिटचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला लष्करी अधिकारी बनल्या आहेत. याशिवाय, यावर्षी पहिल्यांदाच लष्कराने महिला अधिकारी कॅप्टन शिवा चौहान यांना जगातील सर्वात उंच आणि सर्वात थंड युद्धभूमी सियाचीनमध्ये तैनात केले आहे.  लष्कराने सुदानमधील अबेई या विवादित प्रदेशात 27 महिला शांतीरक्षकांची सर्वात मोठी तुकडीही तैनात केली आहे.

========

हे देखील वाचा : रशियन सैन्यात जायचे नाही म्हणून तरुण बदलतायत लिंग

========

या सर्व स्त्री शक्तीची माहिती देशाला नव्हे तर जगाला होणार आहे. प्रजासत्ताक दिनाची परेड दिल्लीमध्ये ज्यांना प्रत्यक्ष बघता येत नाही, अशा लाखो नागरिक घरात बसून ही परेड लाईव्ह बघतात.  आता 2024 मध्ये होणा-या परेडमध्ये महिला शक्ती आहे. हे बघून हजारो तरुणींना प्रेरणा मिळेल, असा त्यामागचा उद्देश आहे. (Women Parade)

भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन 1950 मध्ये इर्विन स्टेडियम म्हणजेच आताचे मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम, येथे झाला होता. 1951 पासून राजपथावर प्रजासत्ताक दिन होत आहे. आता त्याचे नामकरण कर्तव्यपथ असे झाले आहे. राष्ट्रपती भवनापासून कर्तव्य मार्गाने इंडिया गेटपर्यंत आणि तेथून लाल किल्ल्यावर परेड निघते. भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून त्याची सुरुवात होते. त्यानंतर लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या अनेक रेजिमेंटमधून त्यांच्या बँडसह कूच केले जाते. विविध राज्यांतील त्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे टॅबलेक्स प्रदर्शित केले जातात. बीटिंग रिट्रीट सोहळा परेडचा शेवट होतो.

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.