यंदा माघी गणेशोत्सवाला एक वाद उफाळून वर आला, तो म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचा ! दरवर्षीप्रमाणे यंदाही वाजत गाजत गणपती बाप्पा मंडपात आले. मात्र विसर्जनासाठी त्यांना वाट पहावी लागली… का ? तर यंदा मुंबई महानगरपालिकेने पीओपीच्या मूर्तींचे समुद्रात विसर्जन करायचं नाही, असे आदेश दिले होते. तशी महापालिकेने पीओपीच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिक तलावांची सोय केली होती. मात्र त्यासाठी मंडळांचे कार्यकर्ते आणि गणेशभक्त समाधानी नव्हते. त्यामुळे एकतर विसर्जन रखडलं आणि सोबतच पालिका आणि गणेश मंडळांमध्ये राडा पाहायला मिळाला. त्यामुळे आता पीओपीच्या मूर्तींबाबत पालिका, राज्य सरकार न्यायालय काही वेगळा निर्णय घेणार का ? गणेशोत्सव पूर्णपणे बदलण्याची योजना आखली जात आहे का ? जाणून घेऊ. (Ganesh Idols)
यंदा माघी गणेशोत्सवातल्या सार्वजनिक मूर्तींचं विसर्जन समुद्रात करायला पालिकेने नकार दिल्यामुळे पीओपीच्या मूर्ती बनवणारे मूर्तीकार आणि सार्वजनिक मंडळांमध्ये वादंग उठला आहे. पीओपीच्या मूर्ती तयार करण, त्यांची विक्री करण आणि त्यांचं विसर्जन करण यावर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार बंदी घातली आहे. त्यातच सुप्रीम कोर्टानेही ती मार्गदर्शक तत्त्व योग्य ठरवली होती. त्यामुळेच माघी गणेशोत्सवाला पीओपीच्या मूर्तींची विक्री होऊ देऊ नका आणि ती झाली तर त्या मूर्तींचे विसर्जन करायला देऊ नका, असे आदेश हाय कोर्ट, एमपीसीबी, राज्य सरकार आणि विविध महापालिकांनी दिले होते. (Trending News)
परिणामी माघी गणेशोत्सवाला अनेक गणेश मूर्तीचं विसर्जन झालंच नाही आणि सर्व मूर्ती पुन्हा एकदा मंडपात आणण्यात आल्या. काही पीओपीच्या गणेश मुर्तींचं विसर्जन झालं, ज्यावर शाडूची माती तयार करणाऱ्या मूर्तीकारांनी आक्षेप घेतला होता. यानंतर राज्यभरातील पीओपी मूर्तीकारांच्या संघटनांची व सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची मोठी बैठक लालबागला झाली.. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा या बैठकीला उपस्थित होते. हिंदूंच्या सणावरच असे निर्बंध का लावले जातात, अशा वावड्यादेखील उठल्या होत्या. (Ganesh Idols)
यानंतर शाडूच्या मूर्तींसाठी पाठपुरावा करणारे श्री गणेश मूर्तीकला समितीचे वसंत राजे (Vasant Raje)यांनी म्हटलं आहे की, पालिकेने यंदाच्या माघी उत्सवापूर्वी गणेशोत्सव मंडळांकडून हमीपत्र घेतले होते. त्यामुळे आता मंडळांनी आक्षेप घेण योग्य नाही. पीओपीच्या मूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करावं आणि न्यायालयाच्या आदेशाचं पालन करावं. अनेक मंडळांनी जबरदस्तीनेही मूर्तींचे विसर्जन केले होते. मात्र एकंदरीत वातावरण पाहता त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. (Trending News)
माघी गणेशोत्सव पूर्ण झाला, पण भाद्रपदला येणाऱ्या गणेश चतुर्थीला हा वाद आणखी उफाळून वर येईल, असं चिन्ह आहे. कारण आगामी काळात गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने मुंबई महापालिका प्रशासनाने पावलं उचलण सुरु केलं आहे. त्यामुळे पीओपी बंदीचा निर्णय किती योग्य ठरणार, हे कळून येईल. कारण देशभरात विविध गणेश मूर्ती या पिओपीच्याच बनत असतात. त्यामुळे पीओपी मूर्तीकारांना याचा चांगलाच फटका बसू शकतो. पण पीओपीच्या मूर्ती असल्या तरी त्यांचं विसर्जन समुद्रात न करता ते कृत्रिम तलावातच केलं जाईल, असंही पालिकेचं म्हणणं आहे. मात्र यासाठी किती सार्वजनिक मंडळ तयार होतील, हा एक मोठा प्रश्न आहे. (Ganesh Idols)
==================
हे देखील वाचा : Rahul Gandhi : भारतीय तंत्रज्ञानाची ओळख राहुल गांधी यांनी करुन घ्यावी…
==================
पीओपी बंदीच्या निर्णयाविरोधात आपली बाजू मांडण्यासाठी मूर्तिकार न्यायालयात धाव घेणार आहेत. मूर्तींवर बंदी घालण्यापेक्षा विसर्जनासाठी वेगळे पर्याय आणा, अशीही मागणी करण्यात आली आहे. मात्र जर पीओपीवर बंदी घालून शाडूच्या मूर्ती कंपल्सरी केल्या तर, त्यांचा खर्चही तितका वाढणार आहे. शाडूच्या तुलनेत पीओपी स्वस्त असतो. त्यामुळे याचाही ताण मूर्तिकार, गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती गणपती असणाऱ्या कुटुंबांवर येणार आहे. त्यामुळे एकंदरीत सगळ्या गोष्टींचा विचार करूनच निर्णय घ्यावा, असं अनेक जण राज्य सरकारला सुचवत आहेत. यंदा भाद्रपदमध्ये २७ ऑगस्ट रोजी गणपती विराजमान होणार आहेत. मात्र त्याआधी पीओपीच्या मूर्तीबाबत सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.