कोरोनाच्या संकटामुळे २०२०-२१ च्या मोसमपासून रणजी स्पर्धेला (Ranji Trophy) खीळ बसली. ती २०२१-२२ च्या मोसमात उठण्याची चिन्हे अजूनतरी दिसत नाहीत. नाही म्हणायला, एक दिवसीय सामन्याची विजय हजारे करंडकाची स्पर्धा संपन्न झाली. तेवढ्यावरच समाधान मानण्याची वेळ आली आहे. एकूणच आयपीएल सुरु झाल्यापासून देशांतर्गत स्पर्धांचे महत्व हळूहळू कमी होऊ लागले आहे. आयपीएलच्या वेळापत्रकात अडथळा नको म्हणून ‘रणजी स्पर्धा’ अगोदरच गुंडाळण्यात येऊ लागली. विभागीय पातळीवरील ‘दुलीप करंडक स्पर्धा’ तर आता इतिहासजमा झाली आहे.
पूर्वी गत मोसमातील रणजी विजेता संघ व शेष भारत संघ यांच्यातील ‘इराणी चषक’ सामन्याने भारताच्या क्रिकेट मोसमाला सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये सुरुवात होत असे व पुढील वर्षाच्या एप्रिल महिन्यातील रणजी अंतिम सामन्याने मोसमाची सांगता होत असे. आता हे वेळापत्रक कोलमडून पडले आहे.
इराणी चषकाचा सामना आता होतो की नाही याचा शोध घ्यावा लागेल. भारतीय क्रिकेटचा आयपीएल हाच केंद्रबिंदू झाला असून तीच भारतीय क्रिकेटची ओळख आधुनिक काळात ठरली आहे. पण याचा दुष्परिणाम भारतीय क्रिकेटच्या भवितव्यावर होत आहे, याची ना कुणाला खंत ना खेद, अशी अवस्था आहे.
भारताने जवळपास नव्वद वर्षांपूर्वी कसोटी सामने खेळण्यास सुरुवात केल्यापासून भारतीय राष्ट्रीय संघाची ‘गंगोत्री’ असलेल्या देशांतर्गत रणजी (Ranji Trophy), दुलीप व इराणी चषक सामन्यांमधूनच भारतीय क्रिकेटला असंख्य गुणवान खेळाडूंचा लाभ झाला आहे. विजय हजारे, विजय मर्चन्ट, चंदू बोर्डे, बापू नाडकर्णी, पॉली उम्रीगर यापासून ते सुनील गावस्कर, विश्वनाथ, कपिल देव, वेंगसरकर, तेंडुलकर, द्रविड, गांगुली, लक्ष्मण, अनिल कुंबळे, विराट कोहली, अश्विन, इत्यादी असामान्य खेळाडूही वर उल्लेखिलेल्या देशांतर्गत स्पर्धांचीच देन आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दडपण, ताणतणाव, चढउतार सहन करण्यासाठी आवश्यक असलेल्या मानसिक आणि शारीरिक कणखरतेची मशागत याच स्पर्धांमधून होते. एकप्रकारे देशांतर्गत स्पर्धा या कसोटी क्रिकेटची रंगीत तालीमच असते. यातून तावून सुलाखून निघालेले खेळाडूच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दीर्घकाळ तग धरू शकतात. शिवाय या स्पर्धा कसोटी खेळाडूंना आपला गमावलेला फॉर्म परत मिळवण्यासाठी तसेच तंत्रातील चुका दुरुस्त करण्यासाठी एक ‘प्लॅटफॉर्म’ उपलब्ध करून देतात.
आज आपल्याकडे काय चित्र दिसते? आपल्या भारतीय संघाची निवड मुख्यतः आयपीएलच्या कामगिरीवर होते. वीस षटकांचेच सामने खेळण्याची सवय असलेले खेळाडू कसोटीत अत्यावश्यक असणाऱ्या संयम, निग्रह, लढाऊ बाणा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ‘स्टॅमिना’ यात कमी पडतात. परिस्थितीनुसार नैसर्गिक खेळाला मुरड घालण्याची त्यांची तयारी नसते. अनेक खेळाडू धूमकेतूसारखे अचानक उगवतात आणि तसेच शीघ्र अस्तंगतही होतात.
सध्याच्या भारतीय संघातील पुजारा, राहणे, कोहली,अश्विन यासारख्या खेळाडूंची निवृत्ती आता जवळ येऊ लागली आहे. त्यांची जागा घेणारे खेळाडू कोण आहेत? असे कुठलेही ठळक नाव दृष्टीपुढे येत नाही. वरील दिग्गज खेळाडू निवृत्त झाल्यावर भारतीय क्रिकेटमध्ये निश्तिच एक पोकळी निर्माण होणार आहे. अशीच पोकळी श्रीलंका संघात जयसूर्या, महिला जयवर्धने, कुमार संगकारा, मुरलीधरन यांच्या निवृत्तीनंतर निर्माण झाल्याचे आपण बघत आहोत. परिणामस्वरूप हा संघ आता रसातळाला गेला आहे.
हे ही वाचा: हे वाद टाळता येणार नाहीत का?
इंग्लंड संघाची पण त्याहून वाईट स्थिती झाली आहे. ‘जो रूट’ सोडला तर सध्याच्या इंग्लंड संघात एकही विश्वासार्ह खेळाडू नाही. सतत टी २० सामने खेळत असल्याने इंग्लंडची सध्या चालू असलेल्या ॲशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुर्दशा झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ सुद्धा सध्या संक्रमणावस्थेतून जात आहे. हाशिम आमला, मॉर्केल, स्टेन, फिलँडर हे खेळाडू निवृत्त झाल्यावर त्यांच्या तोडीच्या खेळाडूंचा शोध चालू आहे तोपर्यंत त्यांची कामगिरी प्रभावित झाली आहे.
हे देखील वाचा: आईपीएल चा ताळेबंद
‘पुढच्यास ठेच,मागचा शहाणा’या उक्तीनुसार भारताने श्रीलंका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका यांच्या अनुभवातून बोध घेणे अगत्याचे आहे. याचसाठी देशांतर्गत स्पर्धांचे तातडीने पुनरुज्जीवन होणे ही काळाची गरज आहे. नाहीतर ‘वरातीमागून घोडे’ अशी अवस्था होण्यास वेळ लागणार नाही.
रघुनंदन भागवत