Home » ‘व्हिप’ म्हणजे काय रे भाऊ? 

‘व्हिप’ म्हणजे काय रे भाऊ? 

by Team Gajawaja
0 comment
What is whip
Share

गेल्या आठवड्याभरात महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता आता स्थिरस्थावर झाली आहे. शिंदे सरकार आले आहे. गेल्या आठवड्यातल्या सर्वच राजकीय घडामोडी नाट्यमय झाल्या. ज्यांना राजकारणाची फार आवड नाही, असे सामान्यजनही या राजकीय नाट्याचा अंक उत्सुकतेने बघत होते. अशा सर्वांच्या कानावर एक शब्द वारंवार पडत होता, तो म्हणजे व्हिप! (What is whip?)

हा व्हिप काय असतो? पक्षाने व्हिप बजावला, म्हणजे नेमकं काय झालं? याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. हा व्हिप म्हणजे काय, हेच आपण जाणून घेऊया.

व्हीप या शब्दाचा सरळ, सोप्पा अर्थ म्हणजे पक्षाचा आदेश. पक्षाने एखाद्या मुद्द्यावर सभागृहामध्ये काय भूमिका घ्यायची आहे, याबद्दल जो निर्णय घेतला आहे, तो सर्वांना पाळण्याचा आदेश देण्यात येतो, त्यालाच  व्हीप असं म्हणतात. व्हीप हा राजकीय पक्षाचा अधिकार असतो. (What is whip?)

राजकीय पक्षाच्या सदस्यांनी त्यांच्या स्वत:च्या वैयक्तिक विचारसरणीनुसार निर्णय न घेता पक्षाच्या धोरणांनुसारच मतदान करावे या हेतूने व्हीप काढला जातो. त्यामुळेच व्हीप  म्हणजे पक्षशिस्तीचे पालन करण्याचा आदेशच असतो, असेही सांगण्यात येते. पक्षातील आमदारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्हिपचा वापर करण्यात येतो. ही व्हीपची संकल्पना ब्रिटिशकालीन आहे.

पक्षादेश म्हणजे व्हिप काढण्याचे अधिकार हे पक्षाने निवडलेल्या विधिमंडळ गटनेत्याला असतात.  घटनातज्ज्ञांच्या मतानुसार एखाद्या पक्षाने जुन्या गटनेत्याऐवजी नवीन गटनेता निवडल्यास पक्षादेश काढण्याचा अधिकारही नव्या गटनेत्याला मिळतो. त्यामुळे असा आदेश काठण्याआधी सर्वप्रथम प्रत्येक राजकीय पक्षाकडून विधिमंडळ गटनेत्याची निवड केली जाते. मग त्या निवड केलेल्या गटनेत्याकडे व्हिप  म्हणजेच पक्षादेश काढण्याचा अधिकार दिला जातो. या सर्व नियमात वेळोवेळी सुधारणाही करण्यात आल्या आहेत.  (What is whip?)

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात, 1985 मध्ये 52 वी घटनादुरुस्ती करण्यात आली. त्यातून पक्षांतरबंदीचा कायदा अस्तित्वात आला. एखाद्या विधिमंडळ अथवा संसद सदस्याने पक्ष सोडल्यास,  व्हीपविरोधात मतदान केले अथवा केले नाही, तर तो पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र ठरतो.  एक तृतीयांश आमदार फुटले, तर त्याला विभाजन असे म्हणतात.  

====

हे देखील वाचा – ‘एकदा काय झालं!!’चा सेट ‘प्लास्टिक फ्री’!

====

पुढे 2003 मध्ये झालेल्या 91 व्या घटनादुरुस्तीत ही तरतूद काढून टाकण्यात आली. नवीन काद्यानुसार आता दोन तृतीयांशपेक्षा कमी आमदारांनी पक्षापासून वेगळं होऊन नवा पक्ष स्थापन केला किंवा एखाद्या पक्षात गेल्यास त्यांना अपात्र ठरविले जाऊ शकते. विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या सभापतींना हे अधिकार देण्यात आले आहेत. या सर्वांत व्हिपचे महत्त्व वाढले आहे. 

व्हीप हा संबंधित पक्षाच्या सर्व आमदारांना बंधनकारक असतो. कुठल्याही आमदाराने हा आदेश धुडकावून पक्षाच्या भूमिकेविरोधात मतदान केले, तर त्याचे सभासदत्व धोक्यात येऊ शकते अथवा तो अपात्र होण्याचा धोका असतो. या आमदारावर पक्षशिस्तीची कारवाई होऊ शकते. काही परिस्थितीत पक्षाच्या विरोधात गेल्यामुळे त्या व्यक्तीवर पक्षाची शिस्त भंग केल्याबाबत कारवाई देखील करण्यात येऊ शकते.  (What is whip?)

व्हिप एकूण तीन प्रकाचे असतात. त्यात वन लाईन व्हिप, टू लाईन व्हिप आणि थ्री लाईन व्हिप असे प्रकार असतात. वन लाईन व्हिपमध्ये पक्षादेशाची माहिती देण्यात येते. टू लाईन व्हिपमध्ये मतदान करताना सभागृहात उपस्थित राहावे, असे निर्देश सभासदांना दिले जातात. मात्र मतदान कसे करावे याबाबात आदेश नसतात. थ्री लाईन व्हिपमध्ये सदस्यांना पक्षाच्या धोरणानुसार मतदान करण्याचे आदेश देण्यात येतात. (What is whip?)

गेला आठवडाभर व्हिप जारी केला आहे, असे कायम सांगण्यात येत होते. म्हणजेच आमदरांनी आपल्या पक्षाच्या धोरणानुसार चालावे असा आदेशच त्यांना देण्यात येत होता. तर, गेल्या आठवड्यात सतत कानावर पडणारा ‘व्हिप’ का महत्त्वाचा आहे कळलं का?

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.