Home » काय आहे कोको बेटांचे रहस्य?

काय आहे कोको बेटांचे रहस्य?

by Team Gajawaja
0 comment
Coco Island
Share

भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या चीननं गेल्या काही वर्षापासून भारताला खिंडीत पकडण्याची एकही संधी सोडलेली नाही. पाकिस्तानसारख्या आणखी एका शेजारी देशाला हाताला पकडून चीननं भारतावर कायम दबाव आणण्याचं राजकारण सुरु ठेवलं आहे. याशिवाय अरुणाचल सारख्या प्रदेशाबाबत चीनची वादग्रस्त विधाने आणि सिमाभागत होणा-या सैन्य हालचाली यामुळे भारतीय सैन्याला चीनबाबत चोवीस तास जागृत रहावे लागत आहे. याच चीननं आता आणखी एक पाऊल टाकलं आहे. त्यामुळे भारतीय गुप्तचर संस्थांमधून काळजी व्यक्त करण्यात येत आहे. चीननं आता चक्क भारतावर गुप्त पाळत ठेवण्यासाठी एक जाळंच विणलं आहे. यासाठी चीननं म्यानमारसारख्या देशातील कोको बेटांचा आधार घेतला आहे. मुख्य म्हणजे चीनच्या या गुप्त हालचालींना म्यानमारचीही सहमती आहे. त्यामुळे चीन भारताच्या अंतर्गत बाबींवर लक्ष ठेऊ शकणार आहे. चीननं म्यानमारमध्ये धावपट्टीचा विस्तार केला आहे. उपग्रहांवरुन घेतलेल्या छायाचित्रांमधून म्यानमारमध्ये चीनचे वाढते वर्चस्व आणि त्यातून भारतावर नजर ठेवण्याची चीनची मनीषा स्पष्ट झाली आहे.  

म्यानमार देशामधील कोको बेटे (Coco Island) ही पर्यटनासाठी ओळखली जातात. मात्र आता हीच कोको बेटे चीनचे आश्रयस्थान झाली आहेत. म्यानमारमधील या कोको बेटांचे महत्त्व मोठे आहे. म्यानमानरनं या बेटांवर चीनला धावपट्टी उभारायला परवानगी दिली आहे. वरवर ही साधी घटना वाटत असली तरी या घटनेचे परिणाम घातक होणार आहेत. विशेष म्हणजे, ही बेटे भारताच्या अगदी जवळ आहेत, परिणामी भारतावर नजर ठेवण्यासाठी चीनकडून या बेटांचा वापर करण्यात येईल, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. म्यानमारच्या लष्करी सरकारने चीनला परवानगी दिली तरी भारताने म्यानमारसमोर आपली भूमिका व्यक्त करत चीनच्या हेतूबाबात चिंता व्यक्त केली आहे.

कोको बेटे (Coco Island) बंगालच्या उपसागरात असलेल्या लहान बेटांचा समूह आहे. ही कोको बेटे बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्राला लागून आहेत. भारताच्या अंदमान आणि निकोबार बेटांच्या अगदी उत्तरेस असलेल्या या बेटांचे महत्त्व सुरक्षेच्या दृष्टीनं अधिक आहे.  प्रशासकीय दृष्ट्या, हा बर्माच्या यंगून विभागाचा एक भाग आहे. भौगोलिकदृष्ट्या हा अंदमान आणि निकोबार बेटांचा भाग आहे आणि त्याच्या सर्वात जवळच्या बिंदूवर म्हणजे, उत्तर अंदमान बेटापासून केवळ 20 किमी अंतरावर चीनने आपला गुप्तचर तळ उभारला आहे. भारत सरकारतर्फे यासंदर्भात म्यानमारला पुरावे सादर करण्यात आले आहेत. 

सॅटेलाइट फोटोंमध्ये या बेटांवरील धावपट्टीचा चीन विस्तार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा विस्तार म्हणजे, युद्ध विमानांचा वावर येथे चीन वाढवणार हे स्पष्ट झाले आहे. चीनची वाढती आक्रमकता पाहता, हा भारताच्या सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे. मुख्य म्हणजे, म्यानमारने चीनला बंगालच्या उपसागरातील या कोको बेटांवर (Coco Island) देखरेख आणि देखरेख सुविधा उभारण्याची परवानगी दिली आहे. यावर भारताने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. हा टप्पा भारतासाठी महत्त्वाचा आहे. कारण कोको बेटावर (Coco Island) जिथे चीननं विमानांची धावपट्टी विस्तारली आहे, तेथून ओडिशातील बालासोर चाचणी श्रेणीतून प्रक्षेपित केलेल्या भारताच्या क्षेपणास्त्रांचा तसेच विशाखापट्टणमच्या दक्षिणेकडील पूर्व समुद्रकिनारी असलेल्या सामरिक स्थळांचा चीन आढावा घेऊ शकतो. 

=======

हे देखील वाचा : जगातील अशी शाळा जेथे ४७० वर्षांपासून बदललेला नाही विद्यार्थ्यांचा युनिफॉर्म

=======

भारताने कोको बेटांचा (Coco Island) मुद्दा जनरल मिन आंग हलाईंग यांच्या नेतृत्वाखालील म्यानमार सरकारकडे नेला आहे. पण म्यानमार हा सध्या पूर्णपणे चीनच्या प्रभावाखाली गेला आहे. त्यामुळे या प्रश्नावर म्यानमारकडून समाधानकारक उत्तर मिळेल, अशी अपेक्षा सध्या तरी नाही. 2021 च्या सत्तापालटानंतर, चीनचे वर्चस्व या भागात वाढले आहे. त्याचे घातक परिणाम आता भारताच्या सुरक्षतेवर होत आहेत. चीनने म्यानमारला चार अब्ज डॉलर्सची मदत दिली आहे. 

बंगालच्या उपसागरात आणि हिंदी महासागरात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चीन-म्यानमार-बांगलादेश कॉरिडॉर तयार करण्यासाठी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमध्ये बांगलादेशसह म्यानमारचा समावेश करण्याचाही चीन प्रयत्न करत आहे. म्यानमारमध्ये चीनने आपल्या सैनिकांचा मुक्कामही वाढवला आहे. या छोट्याश्या बेटावर जवळपास 2000 चीनचे सैनिक आहेत. चीनने असेच धोरण श्रीलंका, पाकिस्तान सारख्या देशांमध्ये राबवले होते. त्यानंतर या दोन देशांची काय अवस्था झाली आहे, हे सर्व जगानं बघितले आहे. आता लष्करी राजवट असलेल्या म्यानमारलाही चीननं आपल्या अंकित केले आहे. काही वर्षात या  देशाचे भवितव्य काय असेल हे स्पष्ट होणार आहे. पण त्यापूर्वी त्यापासून भारताला निर्माण झालेला धोका काळजी करण्यासारखा आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.