Home » पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसंदर्भात सध्या चर्चेत असलेलं एसपीजी (SPG) नक्की काय आहे?

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसंदर्भात सध्या चर्चेत असलेलं एसपीजी (SPG) नक्की काय आहे?

by Team Gajawaja
0 comment
एसपीजी SPG
Share

सोशल मीडियापासून चावडीपर्यंत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सध्या चर्चा आहे ती एसपीजी (SPG) आणि पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्याची. पंजाब दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा ताफा फिरोझपूरमध्ये शेतकऱ्यांनी अडवला.  तब्बल १५ ते २० मिनीटं पंतप्रधानांचा ताफा फ्लायओव्हरवर होता. देशाच्या राजकारणात ही पंधरा मिनीटं खूप महत्त्वाची ठरली. 

पंतप्रधानांची सुरक्षा सर्वोच्च आहे. पंतप्रधान तिथून परत फिरले, मात्र संपूर्ण देशात या घटनेचे पडदास उमटले. त्याचबरोबर आणखी एका गोष्टीची चर्चा सुरु झाली, ती म्हणजे एसपीजी (SPG). त्यानंतर पंतप्रधानांना सुरक्षा पुरवाणारे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे जवान सर्वत्र चर्चेचा विषय ठरले. अगदी हनुमानाची उपमाही या एसपीजी जवानांना देण्यात आली. अर्थात या जवानांचे शौर्य आणि त्यांना मिळणारे ट्रेनिंग बघता कोणत्याही धोक्याला ते दूर करु शकतात, याची खात्री पटते. 

‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’ म्हणजेच एसपीजी (SPG) ही भारत सरकारची एक एजन्सी आहे. भारताच्या पंतप्रधानांच्या संरक्षणाची जबाबदारी या ग्रुपवर आहे. ऑक्टोबर १९८४ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांची, त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी हत्या केली.  त्यानंतर देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेवर अनेक वादविवाद आणि चर्चा झाल्या. यासाठी गृह मंत्रालयाने ‘बिरबल नाथ’ समितीची स्थापना केली.  

India PM Narendra Modi trapped on Punjab flyover in security breach

या समितीने विशेष संरक्षण युनिट म्हणून पंतप्रधानाच्या संरक्षणासाठी स्वतंत्र एजन्सी उभारण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानुसार २ जून १९८८ मध्ये संसदेमध्ये एक अधिनियम संमत झाला. यामधूनच एसपीजीचा जन्म झाला. तत्कालीन इंटेलिजन्स ब्युरोचे संयुक्त संचालक (व्हीआयपी सुरक्षा) एस. सुब्रमण्यम हे एसपीजीचे पहिले संचालक होते.   

देशामध्ये एसपीजीचे तीन हजार विशेष जवान आहेत. पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा पुरवणे, हे एसपीजीचे मुख्य उद्दीष्ट आहे. पूर्वी पंतप्रधानांबरोबरच इतर महत्वाच्या व्यक्तींनाही ‘एसपीजी’ सुरक्षा दिली जात असे. मात्र एसपीजीच्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील कायद्यामध्ये २०१९ साली बदल करण्यात आला. यामुळे आता केवळ पंतप्रधानांना एसपीजी सुरक्षा पुरवली जाते.   

यापूर्वी पंतप्रधानांबरोबर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनाही १९९१ ते २०१९ पर्यंत २८ वर्षांसाठी एसपीजी संरक्षण देण्यात आले होते.  

एसपीजीची कार्यप्रणाली अत्यंत काटेकोर आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी त्यांच्या दौऱ्याचा सर्व तपशील राज्याच्या सर्वोच्च नेतृत्व आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला जातो. अगदी प्रत्येक मिनिटाचे नियोजन यात असते. या जवानांचे प्रशिक्षण अत्यंत खडतर असते. एसपीजी जवानांना अमेरिकेतील ‘स्टेट सीक्रेट सर्व्हिस एजंट्स’ या दर्जाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यात सातत्य असते.  

एसपीजीच्या जवानांसाठी विशेष कायदा करण्यात आला आहे. त्यानुसार या जवानांची शारीरिक कार्यक्षमता, निशाणेबाजी याबाबत सातत्यानं पडताळणी होत असते. नवीन क्षेत्रांमधील धोके रोखण्यासाठीही त्यांना अत्याधुनिक पद्धतीने प्रशिक्षण दिले जात असते.  

एसपीजी भारताबरोबरच परदेशातही पंतप्रधानांना सुरक्षा पुरवतात. तेथील भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय घडामोडींचीही या जवानांना माहिती ठेवावी लागते. या जवानांना कधीही सुट्टी घेता येत नाही. याशिवाय या सेवेचा राजीनामाही त्यांना देता येत नाही. महत्वाचे म्हणजे एसपीजी टीममधील कोणीही सोशल मिडीयावर तुम्हाला दिसणार नाही.  

Kfacts SPG एसपीजी

राजकीय पक्ष, कामगार युनियन किंवा सामाजिक संस्थेमध्येही त्यांना सामिल होता येत नाही. अगदी थेट पंतप्रधानांसोबत हे जवान असतात, त्यांच्या या सेवेदरम्यान अनेक अनुभव त्यांना येतात. मात्र त्यावर पुस्तक किंवा कोणतंही लिखीत साहित्य त्यांना प्रकाशित करता येत नाही. याबरोबरच या जवानांना कायद्याचं संरक्षणहीअसतं. या सर्व ड्युटीदरम्यान जवानांनी केलेल्या कोणत्याही कारवाईबाबत त्यांना जाब विचारण्यात येत नाही. कोणतीही कायदेशीर कारवाई या जवानांवर होत नाही कारण भारताच्या पंतप्रधानांची सुरक्षा ही सर्वोच्च असते.  

या एसपीजीच्या ताफ्यातील गाड्याही विशेष असतात. डझनभर गाड्यांचा हा ताफा सर्वसामान्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. यामध्ये बीएमडब्ल्यू सेव्हन सीरीजच्या सिडान, ६ बीएमडबल्यू एक्स थ्री आणि एक मर्सिडीज बेन्झ यांचा समावेश आहे. 

हे ही वाचा: ज्या इंग्रजांनी भारतीयांना पाण्यात पाहिले त्यांच्याच देशात ‘या’ शास्त्रज्ञाचे अविष्कार प्रचंड लोकप्रिय झाले

शरद पवारांच्या मंत्रिमंडळातील या मंत्र्याने पैश्याची बॅग घेण्यास नकार दिला, पण पुढे झाले भलतेच काही! 

आपत्कालीन स्थितीमध्ये रुग्णवाहिका म्हणून वापरता येईल अशापद्धतीची विशेष रचना मर्सिडीज बेन्झ आणि टाटा सफारी जॅमरसारख्या गाड्याही या ताफ्यात आहेत. या गाड्यांचे टायरही विशिष्ट पद्धतीचे असतात. क्षेपणास्त्रे आणि बॉम्बपासून बचाव करण्यासाठी कारमध्ये प्रगत उष्णता सेन्सर बसवलेले असतात. हल्ल्याच्या वेळी स्फोट होऊ नये म्हणून इंधन टाक्या ‘केवळर-सील’ केलेल्या असतात. या गाड्यांच्या केबिनही अद्ययावत असतात व रासायनिक, जैविक हल्ला झाला, तर ऑक्सिजन पुरवठाही होऊ शकेल, अशी व्यवस्था गाड्यांमध्ये आहे.  

हे देखील वाचा: ‘कल हो ना हो’ चित्रपटासंबंधित १३ अशा गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नसतील

हा सगळा लवाजमा असताना याचे बजेटही तेवढेच मोठे आहे. गेल्यावर्षी एसपीजीचं बजेट ४२९ कोटी ५ लाख असल्याची माहिती आहे. मात्र एसपीजीच्या बाबतीत अन्य गोष्टीही सुरक्षेच्या कारणास्तव राखीव ठेवण्यात येतात. आता पंतप्रधानांबाबत झालेल्या घटनेमुळे हे जवान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.  अगदी त्यांचे गॉगल स्कॅनर असलेले आहेत ते त्यांच्या शूजमध्ये कॅमेरे लपवलेले असतात, इथपर्यंतच्या चर्चा सध्या सोशल मिडीयावर रंगत आहेत. 

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.