Home » १४ फुटांच्या मगरीला फाडणारी जगातली सर्वात प्रसिद्ध वाघीण!

१४ फुटांच्या मगरीला फाडणारी जगातली सर्वात प्रसिद्ध वाघीण!

by Team Gajawaja
0 comment
Tigress History
Share

रविवारी भारतीय वन्यजीवप्रेमींना एक आनंदाची बातमी मिळाली. ती म्हणजे, भारतात वाघांची संख्या जवळपास ३१६७ पर्यंत पोहोचली. हा भारताचा राष्ट्रीय प्राणी कधीकधी अशी कामगिरी करून जातो, ज्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेला, पर्यावरणाला आणि पर्यटनाला मोठा लाभ मिळतो. जंगलातील याच सर्वात धडधाकट, सुंदर आणि हिंस्र प्राणी असलेल्या वाघांची संख्या सध्या झपाट्याने वाढत आहे. पाहायचं झालं तर जगातील ७५% टक्के वाघ केवळ भारतात वास्तव्य करतात. त्यामुळे भारताला वाघांचा देश म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एकेकाळी अवैध आणि स्वतःच्या सुखासाठी करण्यात येणाऱ्या शिकारीमुळे भारतात वाघ हा प्राणीसुद्धा नामशेष होणाऱ्या प्रजातींच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला होता. मात्र ‘सेव्ह द टायगर्स’ आणि इतर वन्यजीव उपक्रमांमुळे वाघांची संख्या आता पुन्हा वाढली. मुळात भारताच्या या वाघांची प्रसिद्धी सातासमुद्रापार पोहोचवण्याचं काम खुद्द एका वाघिणीनेच करून दाखवलं ! (Tigress History)

ही ‘रॉयल बंगाल’ वाघीण (Tigress History) राजस्थानच्या सवाई मधोपुरच्या जंगलांमध्ये मे १९९७ दरम्यान जन्माला आली होती. विशेष म्हणजे तिचा दरारा केवळ जंगलातच नाही तर पाण्यातही होता. म्हणायचं झालं तर २००० च्या दशकात भारतात वाघांची लोकसंख्या वाढवण्यात तिने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याच कालखंडात म्हणजेच १९९८ ते २००३ दरम्यान १८१ वाघांची शिकार करण्यात आली होती. मात्र संकटाच्या काळात जगण्याची उमेद प्राण्यांमध्येही असते. साधारण वाघ हा प्राणी १० ते १५ वर्ष जगतो मात्र ती तब्बल वयाचे २० वर्ष फक्त जगलीच नाही तर तिने जंगलसुद्धा जगवलं. रणथंबोर राष्ट्रीय उद्यानासह भारतीय वाघांचा ठसा जागतिक पातळीवर घेऊन जाण्याचं श्रेयसुद्धा तिलाच जातं. आजतागायत जन्माला आलेली सर्वोत्कृष्ट वाघीण म्हणून तिचं नाव आदराने घेतलं जातं. त्या महान वाघिणीचं नाव ‘मछली’! (Tigress History)

ती आणि कुटुंब

मछली रणथंबोरच्या जंगलांमध्ये वाढलेली. तिच्या चेहऱ्यावर असलेल्या माशाच्या आकाराचे चिन्ह तिच्या आईच्या चेहऱ्यावरही होते. त्यामुळे तिच्याच आईचं नाव असलेलं मछली हे तिलाही देण्यात आलं. मछलीच्या आईने १९९७ साली तीन मादांना जन्म दिला होता, त्यात T-14, T-15 आणि T-16 असे बछडे होते. यातली T-16 म्हणजे मछली. तिच्या जन्मावेळी भारतात वाघांची संख्या जवळपास २ हजार इतकी होती. जन्मानंतर अवघ्या एका वर्षात ती पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरली होती. विशेष म्हणजे मछली जंगलात कमी हिंडायची आणि तलावांजवळ जास्त राहत होती. नावाप्रमाणेच तिचं सर्वाधिक आयुष्य पाण्यात आणि पाण्याजवळच गेलं. याच कारणाने तिचं नाव ‘लेडी ऑफ द लेक’सुद्धा पडलं. ११ वाघांची आई असलेल्या मछलीचे ६०% वंशज केवळ रणथंबोरमध्येच आहेत, हे आश्चर्य. तिने दिलेल्या बछड्यांपैकी ७ मादी तर ४ नर होते. आज रणथंबोरमधील सर्वात मोठा वाघ ‘उस्ताद’ हा सुद्धा तिचाच नातू. सरीस्का राष्ट्रीय उद्यान वाचवण्यातही तिचा खारीचा वाटा आहे. तिच्या दोन मादा पिल्लांना या उद्यानात सोडण्यात आले होते, यानंतर येथे वाघांची संख्या झपाट्याने वाढली. (Tigress History)

क्रोकोडाईल किलर

आजपर्यंत भारताच्या जंगलात कोणत्याही वाघाने (Tigress History) असा कारनामा केला नव्हता, तो मछलीने करून दाखवला होता. रणथंबोरमधील राजबाग, पदम आणि मलिक लेक या ठिकाणी तिचं राज्य होतं. २००३ साली रणथंबोरमधील एका तलावातील जवळपास १४ फुटांच्या मगरीने मछलीच्या एका बछड्यावर हल्ला केला होता. यावेळी मछलीने या हल्ल्यातून बछड्याला सोडवलं, मात्र दोघांमध्ये तुंबळ युद्ध झालं आणि या युद्धात मछलीने त्या अजस्त्र मगरीचा फडशा पाडला. मगरीशी लढताना मछलीला आपले शिकारीचे दोन दात गमवावे लागले, मात्र तरीही तिचा धाक काही कमी झाला नाही. मछली जिवंत असेपर्यंत कोणत्याही नर वाघाने कधीही तिच्या बछड्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्नसुद्धा नाही. ती आतापर्यंत जंगलाची राणी बनली होती. विशेष म्हणजे मछली तिच्या शिकारी कौशल्यामुळेही प्रसिद्ध होती. शिकार करण्याची तिचं स्वतःच एक तंत्र होतं जे आजपर्यंत इतर वाघांमध्ये (Tigress History) पाहायला मिळालं नाही. एका वाघासोबत लढत असताना डोळ्याला जखम झाल्यामुळे तिला आपला एक डोळासुद्धा गमवावा लागला होता.

जागतिक कामगिरी

मछली ही जगातली एकमेव वाघीण (Tigress History) आहे, जिच्यावर ५० मिनिटांची डॉक्युमेंटरी तयार करून ती नॅशनल जिओग्राफिक आणि अ‍ॅनिमल प्लॅनेट या वाहिन्यांवर प्रक्षेपितसुद्धा करण्यात आली आहे. याशिवाय तिच्यावर तयार करण्यात आलेल्या एका चित्रपटाला ‘बेस्ट एनव्हायरमेंटल फिल्म ऑफ द इयर’चा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. मछलीवर ‘रणथंबोर क्वीन’, ‘टायगर फुटरेज’, ‘डेंजर – द टायगर पॅरडाइज’, ‘क्वीन ऑफ द टायगर’, असे अनेक चित्रपट बनवले गेले होते. भारत सरकारने मछलीवर पोस्टल तिकीटसुद्धा सुरू केलं आहे. ट्रॅव्हल टूर ऑपरेटर्सच्या माहितीनुसार मछलीमुळे रणथंबोरमधील आणि राजस्थानमधील पर्यटन व्यवसायाला दरवर्षी तब्बल ६५ कोटी रुपयांचा लाभ मिळत होता. केवळ एका वाघिणीमुळे ६५ कोटी… विचार करून तरी बघा ! २००९ साली मछलीला बीबीसीचा ‘लाईफटाईम अच्हीव्हमेंट अवॉर्ड’देखील देण्यात आला होता. या पुरस्काराने सन्मानित होणारी ती पहिली वाघीण होती. जगात सर्वात जास्त छायाचित्र काढण्यात आलेली वाघीण ते प्रसिद्धीच्या बाबतीत जगभरातील वाईल्डलाईफ प्रेमींना भुरळ पाडणारी वाघीण, असा तिचा प्रवास फार थक्क करणारा आहे. २०१४ दरम्यान वयाच्या १७व्या ती अचानक जंगलातून गायब झाली. तिचा शोध घेण्यासाठी तब्बल २०० वनरक्षकांचा ताफा जंगलभर पसरला. महिन्याभराच्या भल्या मोठ्या शोध मोहीमेनंतर अखेर ती सापडली.

अखेरचा काळ

मगरीसोबत लढत असताना आधीच तिचे शिकारीचे दोन दात तुटले होते, त्यांनतर वृद्धपणामुळे २०१४ साली तिचे उर्वरित दोन दातही तुटले. आता ती शिकारसुद्धा करू शकत नव्हती, त्यामुळे वन विभाग तिच्यासाठी शिकारीच्या रुपात लहान-सहान जनावर पाठवत होता, जे ती सहज खाऊ शकेल. कायद्यानुसार असे करण्यावर बंदी आहे. मात्र तिला जिवंत ठेवणं फार गरजेचं होतं. अखेरच्या दोन वर्षात दररोज एक गार्ड तरी मछलीच्या देखरेखीसाठी जवळपास असायचा. २०१६ साली ती २० वर्षांची झाली होती. दातही नव्हते, एक डोळासुद्धा नव्हता आणि वृद्धपणामुळे शरीरात पूर्वीसारखी शक्तीही उरली नव्हती. फॉरेस्ट ऑफिसरच्या माहितीप्रमाणे १२ ऑगस्ट २०१६ रोजी तिने शेवटचं काहीतरी खाल्लं होतं. मछलीच्या आयुष्याचे मोजकेच दिवस उरले होते, त्यामुळे तिच्या आसपास सतत फॉरेस्ट ऑफिसर आणि वन रक्षक मोठ्या ताफ्यासोबत असायचे. अखेर १८ ऑगस्ट २०१६ रोजी तिने प्राण सोडला. एका जंगलातल्या प्राण्यासाठी यावेळी संपूर्ण वन खात्याचे कर्मचारी ढसाढसा रडले होते. यावेळी पोलीस दलासह वन खात्याच्या ७० वनरक्षकांनी तिला मानवंदना (गार्ड ऑफ ऑनर) दिली. राष्ट्रीय प्राणी या नात्याने तिरंगा ध्वजात लपेटून तिची मोठी अंत्ययात्रा काढण्यात आली आणि हिंदू संस्कृतीनुसार तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जंगलात असा पराक्रम गाजवणारी आजतागायतच्या इतिहासात मछली ही एकमेव वाघ (Tigress History) असावी. जगात दोन प्रकारचे वन्यजीवप्रेमी आहेत… एक ज्यांनी मछलीला पाहिले आहे आणि एक जे मछलीला पाहू शकले नाहीत.

========

हे देखील वाचा : धोनीचा ‘तो’ गगनचुंबी षटकार होणार ऐतिहासिक!

========

परिसंस्था (Ecosystem) संतुलित ठेवण्यासाठी आणि जंगलाचं अस्तित्व अबाधित राखण्यासाठी वाघ या प्राण्याची आपल्याला सर्वाधिक गरज आहे. त्यामुळे वाघ वाचवणं आणि वाढवणं हे मनुष्य प्राण्यांचं कर्तव्य असलं पाहिजे. वाघांच्या जगातील ७-८ प्रजातींपैकी बाली वाघ आणि कॅस्पियन वाघ हे समूळ नामशेष झाले आहेत. जावा, सुमात्रा, सायबेरियन आणि भारतीय उपजाती नष्ट होण्याच्या वाटेवर आहेत. सध्या जगात जवळपास ४००० वाघ शिल्लक उरले आहेत. सध्याची लोकसंख्या ७६७ कोटी इतकी आहे. याचा अर्थ १.९० कोटी लोकांच्या तुलनेत केवळ एकच वाघ ! हा फरक पाहून तरी वाघ वाचवणं किती महत्त्वाचं आहे, हे तुमच्या लक्षात येईलच ! त्यामुळे वाघांबाबत जनजागृती पसरवणे, त्यांची शिकार थांबवण्यासाठी प्रयत्न करणे, पर्यावरणाला त्यांची गरज का आहे, याची माहिती लोकांपर्यंत देणे, हे आपल्या हातात आहे आणि ते आपण निश्चितच करू शकतो.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.