Home » राम मंदिराच्या भव्यतेचा दुसरा टप्पा

राम मंदिराच्या भव्यतेचा दुसरा टप्पा

by Team Gajawaja
0 comment
Ram Mandir
Share

२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.  तेव्हापासून अयोध्येतील या रामलल्लांना बघण्यासाठी, त्यांना वंदन करण्यासाठी लाखो भक्त अयोध्येत दाखल होत आहेत.  हे भक्त प्रभू रामांचे विलोभनीय रुप पाहून मोहीत होत आहेत, तसेच त्यांच्या मंदिराची भव्यता पाहूनही आश्चर्य व्यक्त करीत आहेत.  मात्र सध्या जे मंदिर आहे, त्यापेक्षाही प्रभू श्रीरामांचे मंदिर पुढील वर्षात भव्य स्वरुपात होणार आहे.   राममंदिराचा हा पहिला टप्पा भक्तांसाठी खुला करण्यात आला आहे.  राममंदिर हे तीन टप्प्यात होणार असून त्याच्या उभारणीचा दुसरा टप्पा आता सुरु झाला आहे.  या दुस-या टप्प्यात रामायण काळातील महापुरुषांच्या भव्य मुर्ती सप्तमंडपामध्ये बसवण्यात येणार आहेत.  (Ram Mandir)

अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या मंदिरातील सप्तमंडपाचे काम सुरू झाले आहे. या सप्तमंडपाचा पाया खोदण्यात आला आहे.  येथे रामायण काळातील महापुरुषांची मंदिरे बांधली जाणार आहेत.  भगवान रामांच्या आयुष्यात या सातही महापुरषांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. यापैकी पहिले मंदिर असणार आहे ते प्रभू श्रीरामांच्या गुरुंचे, म्हणजे महर्षी वशिष्ठ यांचे.  महर्षी वशिष्ठ हे राजा दशरथ यांचेही गुरू होते.  ते प्रभू रामचंद्रांसह, लक्ष्मण, भरत आणि शत्रूघ्न यांचे गुरु होते. 

त्यानंतर ऋषी विश्मामित्र यांचे मंदिर असणार आहे. विश्मामित्रांनी प्रभू रामांना शस्त्रांस्त्रांचे प्रशिक्षण दिले.  ऋषी विश्ममित्र यांनी प्रभू राम आणि लक्ष्मण यांना घेऊन होम हवन केले.  ऋषी विश्वामित्रांच्या यज्ञात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून रामाने मारीच आणि सुबाहू या राक्षसांचाही वध केला होता.  विश्वामित्रच राम आणि लक्ष्मणासह जनकपूरला गेले होते.  तिथे प्रभू रामांनी जनक राजांनी ठेवलेला पण पूर्ण केला.  तिथे माता जानकीसोबत प्रभू रामांचा विवाह झाला. (Ram Mandir)

महर्षी अगस्त्य यांचेही मंदिर उभारण्यात येणार आहे. भगवान शिवाचे महान भक्त म्हणून त्यांचा उल्लेख कऱण्यात येतो.  महर्षी अगस्त्य हे राजा दशरथाचे कुलगुरू वशिष्ठ, यांचे बंधू होते. रावणासोबत युद्ध करण्याआधी  प्रभू राम त्यांच्या आश्रमात गेले होते. असे म्हणतात की अगस्त्य ऋषींनी समुद्रात लपलेल्या राक्षसांचा नाश करण्यासाठी समुद्राचे सर्व पाणी प्राशन केले. रामायणया महाकाव्य ज्यांनी शब्दबद्ध केलं, त्या महर्षी वाल्मिकींचेही भव्य मंदिर या परिसरात असणार आहे.

भिल्ल समाजात जन्मलेल्या महर्षी वाल्मिकी यांचे खरे नाव रत्नाकर होते. पौराणिक कथेनुसार, रत्नाकर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी लोकांना लुटत असे, परंतु नंतर महर्षी नारद यांच्या भेटीमुळे त्यांच्या विचारात परिवर्तन आले. त्यांनी राम नामाचा जप सुरु केला.  एवढा की त्यांच्याभोवती मुंग्यांचे वारुळ तयार झाले.  महर्षी वाल्किकी यांच्या आश्रमातच लव आणि कुश या प्रभू श्रीरामांच्या पुत्रांचा जन्म झाला.  

श्रीराम मंदिराच्या संकुलात निषादराज यांचेही मंदिर असणार आहे.  निषादराज हा रिंगवरपूरचा राजा होता.  त्याचे नाव गुह होते. प्रभू राम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह वनवासाला जात असताना निषादराज गुह यांनीच या तिघांनाही गंगा नदी पार करण्यास मदत केली. वनवासानंतर श्रीरामांनी पहिली रात्र निषादराजच्या घरी घालवली.  प्रभू श्रीरामांनी आपल्या राज्यारोहण समारंभात निषादराजला मानाचे आमंत्रण पाठवून त्याचा आदर सत्कार केला होता. 

याशिवाय जटायूंचेही मंदिर असणार आहे. जटायू हा अरुण देव यांचा मुलगा होता. रावण सीतेचे अपहरण करून तिला लंकेत घेऊन जात असताना जटायूने ​​सीतेला रावणापासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला आणि रावणाशी युद्ध केले. संतप्त होऊन रावणाने त्यांचे पंख छाटले. सीतेच्या शोधात राम आणि लक्ष्मण तिथे पोहोचले तेव्हा जटायूनेच त्यांना सीतेच्या अपहरणाची संपूर्ण माहिती सांगितली. (Ram Mandir)

प्रभू श्रारामांच्या आयुष्यातील अशा महत्त्वपूर्ण सात महर्षींचे मंदिर या मंदिर परिसरात उभारणीचे काम आता सुरु झाले आहे.  त्याबरोबरच १७ एप्रिल रोजी होणा-या दुर्गा नवमी आणि रामनवमीसाठीही विशेष तयारी सुरु झाली आहे.  रामनवमीला अयोध्येत भक्तांचा पूर येणार आहे.  त्यामुळे ज्यांना रामनवमीला अय़ोध्येत येता येणार नाही, त्यांना घरबसल्या रामल्लांचे दर्शन घेता येणार आहे.  प्रसार भारती राम मंदिर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करणार आहे.

===========

हे देखील वाचा : ख-या सूर्यासारख्या खोट्या सूर्याची निर्मिती ?

===========

शहरात १०० हून अधिक ठिकाणी एलईडी टीव्हीची व्यवस्था करण्यात येत आहे. थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून राम भक्तांना घरी बसून दर्शन घेता येणार आहे. उन्हाचा तडाखा पाहता अनेक व्यवस्था करण्यात येत आहेत.  रामलल्लांच्या दर्शनासाठी पाहता सात लाईनची व्यवस्था करण्यात येणार आहे.  रामनवमीला येथे काही कार्यक्रमही होणार आहेत.   सोहर, वाढाई गीते आणि भक्तिगीतेही गायली जाणार आहेत. मंदिराचीही विशेष सजावट करण्यात येत आहे.  त्यासाठी 50 क्विंटल देशी-विदेशी फुले येणार आहेत.  राम मंदिरासोबतच कनक भवन आणि हनुमानगढीचीही भव्य सजावट करण्यात येत आहे.

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.