जगातील प्रमुख विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्थांचा एक आंतरशासकीय मंच आहे, त्याला G20 असे नाव देण्यात आले आहे. या G20 चे अध्यक्षपद यावेळी भारताकडे असून, G20 च्या सर्व परिषदा यशस्वी होण्यासाठी भारताकडून सर्वोतपरी प्रयत्न होत आहेत. याचाच एक भाग म्हणजे भारताने जम्मू-काश्मीरमध्येही G20 बैठका घेण्याचे जाहीर केले असून त्यासाठी तारखा निश्चित केल्या आहेत. मात्र हे होत असताना पाकिस्तानचा संताप झाला आहे. अजूनही काश्मिरवर आपला हक्क सांगणा-या या पाकिस्तानचे दिवाळे निघाले तरी भारताप्रती भावना बदललेली नाही. तिच भावना पाकिस्तानच्या नेत्यांनी G20 च्या तारखा जाहीर केल्यावर बोलून दाखवली आहे. काश्मिरमध्ये होणा-या या G20 बैठका म्हणजे, आंतरराष्ट्रीय कराराचे उल्लंघन असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. भारताकडून या आरोपांना अद्याप उत्तर देण्यात आले नसले तरी, युक्रेनच्या मंत्र्यांनी मात्र पाकिस्तानला गप्प केले आहे. युक्रेनच्या मंत्र्यांनी भारताचा उल्लेख विश्वगुरु असा करत भारताची वाहवा केली आहे. तसेच रशिया-युक्रेन युद्धात मध्यस्थी करण्याचेही आवाहन केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे वाढणारे हे महत्त्व पाहता, पाकिस्ताननं काश्मिरप्रती कितीही ओरड केली तरी त्यांना फारसे महत्त्व मिळणार नाही याची जाणीव पाकिस्तानी नेत्यांनाही आहे.
भारत यावेळी G20 अध्यक्षपदाचे अध्यक्षपद भूषवत आहे. G20 यशस्वी करण्यासाठी भारताकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी विविध राज्यात बैठका घेण्यात येत आहेत. यानुसार जम्मू-काश्मिरमध्येही बैठका होत आहेत. पर्यटनावरील कार्यगटाची बैठक 22 ते 24 मे दरम्यान श्रीनगरमध्ये होणार आहे. या तारखा जाहीर झाल्यावर पाकिस्ताननं संताप व्यक्त केला आहे. हे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्त्वांचे उल्लंघन असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. जम्मू-काश्मीरवरील आपला बेकायदेशीर कब्जा कायम ठेवण्यासाठी भारताचे बेजबाबदार पाऊल असल्याचे पाकिस्ताननं म्हणत आपला संताप व्यक्त केला आहे.
भारताने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये G20 चे वर्षभर अध्यक्षपद स्वीकारले. त्यानंतर देशाच्या प्रत्येक राज्यात वेगवेगळे कार्यक्रम चालू आहेत. तसेच G20 च्या प्रतिनिधींचे स्वागत करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. या अनुषंगानं श्रीनगर येथेही G20 च्या प्रतिनिधी देशांच्या बैठका होणार आहेत. श्रीनगरमध्ये होणाऱ्या बैठकीची तयारी गेल्या वर्षीच सुरू झाली होती. सर्व 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये G-20 बैठका आयोजित केल्या जात आहेत. या बैठका यशस्वी होत असताना भारताचे आंतरराष्ट्रीय समुदायात वर्चस्व वाढत आहे, ही गोष्ट आपल्या शेजारील पाकिस्तानला मात्र खटकत आहे.
या दरम्यान युद्धग्रस्त युक्रेनच्या मंत्र्यानी भारताला G20 बाबत आवाहन केले आहे. युक्रेन मंत्री एमिने झापारोवा यांनी भारताला कीव ला G20 मध्ये सहभागी करुन घ्यावे आणि विचार मांडण्याची संधी द्यावी असे आवाहन केले आहे. युक्रेनचे उप परराष्ट्र मंत्री एमीन झापरोवा यांनी भारताचे विश्वगुरू म्हणून वर्णन केले आहे. शिवाय भारत रशिया-युक्रेन युद्धात मोठी भूमिका पार पाडू शकतो, असे आवाहनही केले आहे. एकूणच भारताचे जगातील वाढते वर्चस्व पाहता या युद्धात त्यांनी सामोपचाराची भूमिका पार पाडावी अशी युक्रेनची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जगाला सद्यस्थितीत कोणतेही युद्ध परवडणारे नसल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.
======
हे देखील वाचा : शाही राज्याभिषेकाची तयारी आता अंतिम टप्प्यावर…
======
गेल्या वर्षी 1 डिसेंबरपासून भारत G-20 चे अध्यक्षपद भूषवत आहे. या वर्षी 9-10 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे G-20 शिखर परिषद होणार आहे. भारतातील सर्व 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असलेल्या 56 शहरांमध्ये याच्या बैठका होत आहेत. G-20 किंवा ग्रुप ऑफ 20 हा जगातील प्रमुख विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्थांचा एक आंतरशासकीय मंच आहे. यामध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, यूके, अमेरिका आणि युरोपीय देशांचा समावेश आहे. या G20 च्या बैठकांमधून भारताचा आंतरराष्ट्रीय दबदबा वाढत आहे.
सई बने