राजस्थानच्या भूमीवरील किल्ले जगप्रसिद्ध आहेत. मात्र याच राजस्थानमधील अनेक मंदिरेही जगविख्यात आहेत. यामध्ये भगवान शंकाराच्या मंदिरांची संख्या अधिक आहे. या सर्वांमध्ये चित्तौडगडमधील निसर्गाच्या कुशीत असलेले गंगेश्वर महादेवाचे मंदिर हे शिवभक्तांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. हे मंदिर हजारो वर्ष जुने असल्याचे सांगण्यात येते. शिवाय हे शिवमंदिर (Shiva temple) जवळपास 125 फूट खोल गुहेमध्ये आहे. या गुहेमधील शिवमंदिरात जाण्यासाठीचा रस्ता आणि तेथील सर्व निसर्ग बघण्यासाठीही शिवभक्तांची गर्दी असते. चितौडगड येथील या शिवमंदिराची वाट अतिशय अवघड असली तरी त्या मंदिरात भक्तांची चांगलीच गर्दी असते. या मंदिरात अनेक राजकीय नेतेमंडळीही भगवान शंकराच्या चरणी लीन होण्यासाठी येतात. या मंदिरात येणा-या प्रत्येक भक्ताची इच्छा भगवान शंकर पूर्ण करतात, अशी मान्यता आहे. (Shiva temple)
गंगेश्वर महादेव महादेव मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत. हे मंदिर असलेल्या बांबोरी शहराच्या उत्तरेस 8 किलोमीटर अंतरावर बिनोटा नावाचे एक नगर आहे. येथे प्राचीन काळी राजा चकवावेन राहत होता. हा राजा गंगामातेचा परम भक्त होता. राजा राज गंगा नदित स्नान करुन गंगेची पूजा करायचा. या राजाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन एका गायीच्या रुपात गंगामाता राजाला भेटायला आली. त्यावेळी गंगेच्या रुपातील त्या गाईच्या गुराख्याने इथेच थांब असे सांगितले. गायीच्या रुपातील गंगामाता त्याच भागात एका खोल गुहेत स्थायिक झाली. गंगामातेची ही गोष्ट जेव्हा राजाला कळली तेव्हा राजाने त्या स्थानावर जाऊन गंगामातेची आराधना केली. त्यावेळी गंगामाता प्रगट झाली. राजाने गंगामातेला आपल्या राज्यात, राजवाड्याजवळ येण्याची विनंती केली. तेव्हा गंगामातेनं त्याला नकार देत मी या गुहेतच यापुढे राहीन पण गुहेत असतांना तुझ्या वाड्याच्या पायरीवर वाहून जाईल, असे वरदान राजाला दिले. त्याच दिवसापासून गंगेचे पाणी बांबोरीच्या गुहेतून जाते आणि बिनोटा येथील गोमुखातूनही जाते. (Shiva temple)
येथेच गंगेश्वर महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर संवत 949 मध्ये बांधण्यात आल्याचे सांगण्यात येते. हे मंदिर 1100 वर्षांहून अधिक जुने आहे. या मंदिरात सुमारे 800 वर्षांपासून केवळ नाथ समाजाचे पुजारीच पूजा करतात. 125 फूट खोल गुहेत असलेल्या या मंदिरात ऑक्सिजन इतका कमी आहे की भाविकांची गर्दी वाढली तर श्वास घेणेही त्रासदायक ठरते. तरीही या मंदिराला शिवभक्त भेट देतात. या मंदिराचा महिमा इतका आहे की अत्यंत कठीण जागी मंदिर असले तरी या भागात एक हेलिपॅडही उभारण्यात आलेला आहे. कारण या मंदिराला भेट देण्यासाठी सामान्यांपासून ते राजकारण्यांपर्यंत अनेकांची गर्दी होते. विशेषतः श्रावणी सोमवारी गंगेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आणि माता गंगेचे पूजन करण्यासाठी भाविकांची गर्दी होते. चितौडगडच्या निंबाहेरा भागात असलेल्या या गंगेश्वर महादेव मंदिराची गुहा नैसर्गिक आहे. या मंदिरात पावसाळ्याच्या दिवसात संपूर्ण पाणी भरते. त्यामुळे मंदिर तात्पुरते भक्तांसाठी बंद करण्यात येते. मात्र श्रावण महिन्यात पुन्हा मंदिराची साफसफाई करुन आणि पाण्याचा उपसा करुन मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात येते. आत्ताही या मंदिरात श्रावण महिन्याच्या सोमवारसाठी विशेष पुजेचे आयोजन करण्यात आले आहे. (Shiva temple)
========
हे देखील वाचा : गुप्त काळातील पंचमुखी शिवलिंग…
========
गंगेश्वर महादेवाचे मंदिर (Shiva temple) असलेली ही गुहा अतिशय अदभूत आहे. या गुहेत, सुमारे 8 किमी अंतरावर असलेल्या पायरीमध्ये बांधलेल्या गोमुखातून पाण्याचा धबधबा पडतो, जो जमिनीच्या आतील या गुहेशी एकमेकांशी जोडलेला आहे. मंदिरात पुजेसाठी येणा-या भाविकांसाठी दगडी पायऱ्या आणि रेलिंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या पाय-या थेट शिवलिंगापर्यंत भक्तांना घेऊन जातात. गंगेश्वर महादेवापर्यंत जाण्यासाठी गुहेमध्ये मध्यभागी सुमारे 10 फूट खोल खड्डा आहे. हा खड्डा ओलांडण्यासाठी पूलही बनवण्यात आला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला गुहेच्या भिंतीतून पाणी वाहू लागते, तर चांगला पाऊस झाल्यावर गुहा पूर्णपणे पाण्याने भरलेली असते. सध्याही या भागात चांगला पाऊस झाल्यामुळे गंगेश्वर महादेवाची गुहा पाण्यामुळे पूर्णपणे भरली होती. मात्र येणारा श्रावण महिना आणि भक्तांची गर्दी पाहता प्रशासनानं येथे मोठ्या प्रमाणात साफसफाई केली आहे.
सई बने