Home » साॅइल सोऽल साहित्यिक 6

साॅइल सोऽल साहित्यिक 6

by Correspondent
0 comment
Share

‘आधीच्या दंगलीमध्ये जेव्हा आम्ही घराबाहेर जात असू तेव्हा दोन टोप्या जवळ बाळगत असू, हिंदू टोपी आणि रुमी टोपी. (मुस्लीम गोल टोपी). … या दंगलीमध्ये (चले जावच्या) आम्ही गांधी टोपीसुद्धा विकत घेतली. या टोप्या आम्ही आमच्या खिशात ठेवत असू आणि गरज पडेल तशा वापरत असू. धर्म पूर्वी हृदयात वास करायचा; पण आता, नवीन मुंबईमध्ये तो डोक्यावर चढवावा लागतो.’
(– सआदत हसन मंटो — ‘बातें’ – ‘मंटो के माज़मीन’)


मंटोचं टोपीबद्दलचं हे भाष्य वाचल्यावर एका प्रसिद्ध मराठी चित्रपट-गीताची आठवण येते. ‘या टोपीखाली दडलंय काय?’  एकंदरीत हे टोपी,फेटा-राजकारण एकूणच इतिहासात, समाजकारणात ब-याच उलथापालथी घडवून आणण्यात यशस्वी झालंय ही वस्तुस्थिती आहे. ऊन, वारा अशा नैसर्गिक त्रासांपासून डोकं, केस आणि पर्यायाने तब्येत शाबूत ठेवणं या साध्या गरजेतून निर्माण झालेली टोपी, मुंडासं, फेटा इत्यादी डोक्यावरची मानवनिर्मित कापडी शिरस्त्राणं आन, मान, शान आणि राजकीय दान यांची प्रतीकं कधी झाली हे कदाचित माणसालाही कळलं नसावं. धर्म, जात, पंथ, घराणी इत्यादींशी जोडली गेलेली ही शिरस्त्राणं, त्यांचा इतिहास, वर्तमान आणि त्यांना धारण करणारी डोकी हा एक अभ्यासाचा विषय होऊ शकेल.
एखाद्याला निसर्गतः मिळालेल्या जन्मावरून त्याच्या डीएनएमध्ये कोणता वंश, धर्म, जात, पंथ मिसळावा हे ठरतं. मग त्याचं नाव, बोलणं, चालणं, भाषा, सवयी, जीवनशैली इ. इ. या आडाख्यामध्ये फिट बसल्या की, एक शिक्का कपाळावर घेऊन तो फिरू लागतो. मग त्या शिक्क्यावरून आपल्या आयुष्याचं तत्त्वज्ञान बनवतो.त्या तत्त्वज्ञानाला संस्कृती-इतिहासनामक एक भलीमोठी पार्श्वभूमी असतेच. मग त्या शिक्क्यापायी तो शिक्केधारी आपलं अवघं आयुष्य पणाला लावतो.

पेहराव हे या सगळ्याच्या बाहेरचं आवरण, पण हे आवरणही त्याच्या ह्या अस्तित्वाला महत्त्वाचा हातभार लावतं. टोपी, फेटा इ. त्यातलेच महत्त्वाचे घटक. (आज शहरी मध्यम, उच्च मध्यम नि उच्च अशा वर्गवारींमध्ये केवळ काही सणावारांपुरते टोपी, फेटे उरले असले, तरी ते आहेत आणि त्या त्या जातीजमातीप्रमाणे त्यांचं  महत्त्वही आहे.)अशा वेळी मंटो जेव्हा एकच वाक्य लिहितो की, हृदयात वास करणारा धर्म आता नवीन मुंबईमध्ये डोक्यावर चढवावा लागतो, तेव्हा आपल्या धर्मनामक विचारसरणीचं बेगडी वास्तव समोर येतं. म्हणजे डोक्यावरची एक टोपी, डोक्यावरील केसांची रचना हे बाह्य घटक गर्दीच्या मानसशास्त्रात (क्राऊड सायकाॅलाॅजी), धर्माच्या नावाखाली तुमचा जीव वाचवण्यास, गमवण्यास कारणीभूत ठरू शकतात. इथे त्या टोपीखाली ‘खरा धर्म’ उघड होतो. 

फाळणीच्या काळातील मुंबईचं वर्णन मंटोची लेखणी तटस्थपणे करताना दिसते, पण तिची अस्वस्थता एखाद्याच वाक्यातून एक मोठा गर्भितार्थ घेऊन समोर येते.आँखो देखा हाल अशा प्रकारच्या वर्णनातून निसर्गतः एक चित्रमय शैलीतील दृश्य ती शब्दांतून उभं करते.



‘मुंबई नेहमीच सुंदर दिसते; पण आता ती एखाद्या नववधूसारखी झगमगीत दिसत होती.दिव्यांच्या रोषणाईने ती झळकत होती. इतके दिवे होते चोहीकडे की मला वाटते या शहराने तोपर्यंत विजेवर इतका खर्च केला नसेल जेवढा त्या रात्री केला.
मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रामवे कंपनी – बेस्ट यांनी त्यांच्या एका ट्राम कारला उत्सवासाठी सजवले होते, तिला दिव्यांनी पूर्णपणे मढवले होते. काँग्रेसच्या तिरंग्यातील रंगांच्या दिव्यांनी ती झळाळत होती. ती रात्रभर शहरातल्या रस्त्यांवरून हिंडत होती. अनेक इमारतींवरही रोषणाई करण्यात आली होती. विशेषतः व्हाईटवेज आणि इव्हाना फ्रझरासारख्या ब्रिटिश मालकांच्या दुकानांवर दिवे चमकत होते.भेंडीबझारमधल्या थोड्या हिंदू दुकानांवर तिरंगा लावला होता. बाकी सगळ्या ठिकाणी मुस्लीम लीगचे इस्लामी झेंडे लावलेले दिसत होते. ….कोणा नवशिक्याने काढलेले जिनांचे पेंटिंग एका उपाहारगृहाच्या वर लावले होते. माझ्या मनातून ही दृश्ये पुसली जाऊ शकत नाहीत. 

ते आनंदात होते. कदाचित असे असेल की, इतर कोणत्या कारणांमुळे नाही तर अखेरीस आनंदी होण्यासाठी काहीतरी कारण मिळाल्यामुळे असेल.मी म्हटले तसे याचे काय करावे मला समजत नव्हते.” (‘योम-ए-इश्तिकलाल’).आपणच घडवलेल्या एका मोठ्या नरसंहारानंतर मागे उरलेल्यांनी ‘आपण जगलो’ या आनंदाप्रीत्यर्थ पुढचे क्षण साजरे करण्यासारखी आयुष्याची अपरिहार्यता नाही. ‘शो मस्ट (आणि मस्त) गो ऑन’ हे तर खरंच पण, ‘अॅट व्हाॅट काॅस्ट अँड फाॅर हूम’, अशीही दुसरी बाजू असू शकते, हे नाकारता येणार नाही. 

मंटो लिहितो की, 14 ऑगस्टला मुंबईत कुणीही मारला गेला नाही, कारण लोक त्यांचे स्वातंत्र्य साजरे करण्यात गर्क होते. ते स्वातंत्र्य म्हणजे काय असते, कसे मिळवले याचाजणू दोन्ही बाजूंनी विचार केला नव्हता आणि त्या दोन्ही बाजू ‘पाकिस्तान’ ‘हिंदुस्तान’जिंदाबादच्या घोषणा देत होत्या. मुंबईतील भारतीय स्वतःपुरताच, स्वतःभोवती हे माझं हिन्दुस्तान, हे तुझं पाकिस्तान कसं खेळत होता याबद्दल लहानलहान प्रतीकात्मक गोष्टी तो सांगतो. (यांतील काहींचा उल्लेख मागील लेखातही केला आहे.)

उदाहरणार्थ, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी घरासमोरचं झाड कापणा-या एका माणसाला मंटो ओरडतो,  त्यावर तो माणूस म्हणतो की, हे पाकिस्तान असून हे झाड आमच्या मालकीचं आहे.मंटोच्या घरासमोरच्या रस्त्यामधून एक जण विटा काढून नेताना मंटोला दिसतो. मंटो त्याला हटकतो तर तो मंटोवरच ओरडतो नि म्हणतो, हे पाकिस्तान असून तूमला काही बोलू शकत नाहीस.

घरासमोरचं झाड कापणं, घरासमोरच्या विटा काढून नेणं आणि हे करतानाची अरेरावी वृत्ती या उदाहरणांतून आपलं नक्की काय गेलं नि काय मिळालं?एक गुलामगिरी जाऊन दुसरी आणि स्वातंत्र्य नव्हे तर कायमस्वरूपाची स्वैराचारी वृत्ती ? असे जगण्यातले विरोधाभास.

‘ही एवढी माझी जागा, तू आता जा निघून तुझ्या तुझ्या जागेत,’ असं लहान मुलांच्याअल्लड भांडणाला जेव्हा देशपातळीवरचं स्वरूप मिळतं, तेव्हा होणारी स्थित्यंतरंमाणसाच्या वैयक्तिक पातळीपासून अवघं समाजमन ढवळून काढतात, हे इतिहासच नव्हे तर आजचा वर्तमानही सांगत आहे.
 
आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात मंटो मुंबई सोडून पाकिस्तानात गेला. गेला, पळून गेला,की घालवलं, इत्यादी प्रश्न तसे अजूनही काही प्रमाणात अनुत्तरित. त्यानं पाकिस्तानात जायचा मार्ग निवडला याचा राग म्हणा, वाईट वाटलं म्हणा इ. म्हणून आजही, इतक्या वर्षांनंतर त्याचं लेखन न वाचणारे अनेक जण आहेत. मंटो माहीत नसलेलेत्याहून अधिक संख्येने. (अर्थात तो माहीत असलाच पाहिजे, हे निकडीचं नाहीच.)

तर मंटो मुंबई सोडून पाकिस्तानात गेला, जशी गायिका नूरजहाँ गेली किंवा इतर अनेक.तसंच तिकडून इकडे साहिर, गुलज़ार आले, अमृता प्रीतम आली. ( झाली की देवाणघेवाण पूर्ण पुरेपूर मोबदल्यात, मग का तक्रार करा? असो.)
मंटो पाकिस्तानात गेला खरा, पण त्याची लेखणी मात्र ख-या अर्थाने बहरली मुंबईच्या वास्तव्यात. पाकिस्तानातील शेवटची सहा-सात वर्षं त्याने लेखन केलं, परंतु त्याच्या लेखणीला असलेला औपरोधिक, सटायर लेखनाचा स्पर्श मुंबईत अधिक प्रभावीपणे खुलला. पाकिस्तानातील वास्तव्यात त्याचं लेखन अधिकाधिक निराशेकडे झुकलं,असं अनुवादक आकार पटेल नमूद करतात.लेखक-कवीचा भोवताल हा त्याच्या लेखनावर किती आणि कशाप्रकारे प्रभावी ठरतो,याचं प्रत्यंतर मंटोची लेखणी सतत देते.  



मंटोनं मुंबई सोडण्याचं एक कारण त्याच्याच एका लेखात त्यानं नमूद केलं आहे.मंटो लिहितो,’अलीकडेच मला सरकारकडून नोटीस आली आहे : ‘तुम्ही नको असलेला माणूस आहात.तुम्हाला निर्वासित निवास म्हणून देऊ केलेले घर तत्काळ खाली करा किंवा आम्ही तुम्हाला ते सोडून जायला का लावू नये, याबाबत खुलासा करावा.’

जर मी ‘नको असलेली व्यक्ती’ म्हणून आता जाहीर केला गेलो असेन तर मग सरकारनेमला उंदीर म्हणून जाहीर करून मारून टाकायचे हक्कही स्वतःजवळ ठेवले असणार.असो, मी तूर्तास तरी इथे पाकिस्तानमध्ये सुरक्षित आहे.’ (मंटो — ‘योम-ए-इश्तिकलाल’)आपल्या अस्तित्वाला नाकारलं जाणं, यापेक्षा अधिक अपमानास्पद गोष्ट ती कुठली?त्या अस्तित्वाच्या असण्याकरताच तर असतो सगळा हट्ट.

पुढे मंटो एकाच वाक्यात, मुंबईमध्ये सत्तर वर्षांपूर्वीही रुजलेल्या,’पैसा टाका आणि काम करून घ्या’ वृत्तीचा उल्लेख करतो. (मंटोच्या आईचा दफनविधी या प्रसंगातही तो आला आहेच.)आज त्या वृत्तीचा महावटवृक्ष झालेला आपण पाहतोच आहोत. आजच्या जागतिक आपत्तीच्या काळातही ही पैसेकाढू वृत्ती मोठ्या प्रमाणात अनुभवण्यास मिळते, तेव्हा ‘अप्रूप’ वाटतं, त्या वृत्तीचं आणि मंटोच्या लेखणीचं.

मंटो लिहितो,’फाळणीच्या वेळी मी मुंबई सोडली तेव्हा पहिल्यांदा कराचीला आलो. इथे गोष्टी इतक्या वाईट होत्या की मी ताबडतोब लाहोरला जायचे ठरवले. रेल्वे स्टेशनवरचा तिकीट देणारा कारकून म्हणाला,’तिकीट शिल्लक नाही.’
आता मला मुंबईची सवय होती. तिथे पैसे टाकले की सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणून मग मी विचारले,”हवे तर आणखी घ्या आणि मला तिकीट द्या.”

कडक सुरात तो म्हणाला,” हे पाकिस्तान आहे. असली गोष्ट मी पूर्वी केली असती. कितीही किंमत मोजलीत तरी तुम्हांला तिकीट मिळणार नाही.”आणि मला नाहीच मिळाले.”(मंटो — ‘योम-ए-इश्तिकलाल’)

[ वरील प्रसंगाच्या संदर्भात पाकिस्तानातील वर्तमानकालीन परिस्थितीविषयी वक्तव्य करण्याचा अधिकार नाही,  कारण तेवढा तेथील सामाजिक अभ्यास नाही. परंतु मुंबईबद्दल मात्र भाष्य करू शकतो.]
‘पैसे टाकले की सगळ्या गोष्टी मिळतात.’ या  सामाजिक कर्करोगाची सुरुवात करणारी मुंबई… नव्हे मुंबईकर. आज या कर्करोगाने संपूर्ण देश, सर्व पातळ्यांवर पोखरला आहे,हे उघड, कटू सत्य. (मुंबईला एक प्रकारे अशी दुष्कीर्ती मिळवून देणारे कोण, हा प्रश्नविचारणं म्हणजे स्वतःचा मूर्खपणा सिद्ध करणं. असो.)



तर अशी ही सत्तर वर्षांपूर्वीची मुंबई. मंटोच्या लेखणीतून परखडपणे उतरली, त्यामुळे मंटोची लेखणीही टीकेचा विषय बनली.तेव्हापासून धगधगणारी मुंबई अजूनही धगधगतेच आहे. आजही हजारो लेखण्यांना मुंबईचा भोवताल, तिच्याबद्दल लिहिण्यास प्रवृत्त करतआहे, कलाकृती घडवल्या जात आहेत. टीकेचा विषयही बनत आहेत. या सगळ्या लेखण्या, मंटोच्या लेखणीसारख्या उद्याच्या मुंबईच्या इतिहासाचा असाच एक दस्तऐवज ठरतील.

(क्रमशः—)

( लेखातील मंटोची अवतरणे- संदर्भ –‘मी का लिहितो?’ — संपादन श्री. आकार पटेल, अनुवाद – वंदना भागवत, 
परवानगीसह साभार — सकाळ प्रकाशन, पुणे, प्रथम आवृत्ती, 2016)

– © डाॅ निर्मोही फडके.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.