Home » सौदी अरेबिया बुर्ज खलिफापेक्षा दुप्पट उंच इमारत बांधणार

सौदी अरेबिया बुर्ज खलिफापेक्षा दुप्पट उंच इमारत बांधणार

by Team Gajawaja
0 comment
Burj Khalifa
Share

दुबई मध्ये फिरायला गेल्यावर पर्यटकांचं पहिलं आकर्षण असतं ते बुर्ज खलिफा (Burj Khalifa)…जगातील सर्वात उंच इमारत. दुबईतील या गगनचुंबी इमारतीला बघण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येतात. बुर्ज खलिफा होण्यापूर्वी एवढ्या उंचीची इमारत होऊ शकते का, यावरही कोणाचा विश्वास नव्हता. मात्र बुर्ज खलिफाची शानदार इमारत तयार झाल्यावर अवघ्या जगाचे डोळे दिपले होते. आता या बुर्ज खलिफाचा थोडा भाव कमी होणार आहे. कारण दुबईच्या बाजुचे सौदी अरेबिया बुर्ज खलिफापेक्षा (Burj Khalifa) दुप्पट उंच इमारत बांधणार आहे. सौदीच्या क्राऊन प्रिन्स यांनी ही घोषणा केली असून बुर्ज खलिफापेक्षा दुप्पट असलेली ही इमारत सौदी अरेबियाच्या राजधानीत, रियाध येथे उभारण्यात येणार आहे.  त्यामुळे बुर्ज खलिफाचा आता उंचीच्या बाबतीत दुसरा नंबर होणार आहे.  

सौदी अरेबियाने बुर्ज खलिफाच्या (Burj Khalifa) दुप्पट आकाराची,  2 किमी लांब असलेली जगातील सर्वात उंच इमारत बांधण्याची योजना आखली आहे.  त्यामुळे जगातील सर्वात उंच इमारत म्हणून बुर्ज खलिफाचा असलेला मान मात्र थोडा कमी होणार आहे. 828 मीटर उंचीची ही इमारतही आता लहान होणार आहे. सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी  बुर्ज खलिफापेक्षा (Burj Khalifa) उंच इमारत बांधण्याची तयारी केली आहे.  2000 मीटर (2 किमी) उंचीसह, ही इमारत आतापर्यंत बांधलेली सर्वात उंच ‘मानवनिर्मित संरचना’ असेल.  

सौदी अरेबियाची राजधानी असलेल्या रियाधमध्ये 2 किमी उंच गगनचुंबी इमारत उभी रहाणार आहे. ही इमारत दुबईच्या बुर्ज खलिफापेक्षा अडीच पट उंच असेल. ही इमारत रियाधमध्ये 18 स्क्वेअर किलोमीटर परिसरात बांधली जाणार आहे. ही इमारत सौदी अरेबियातील मोठ्या पुनर्विकासाचा केंद्रबिंदू ठरेल असा विश्वास क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी व्यक्त केला आहे. सौदीच्या MEED च्या अहवालानुसार या इमारतीच्या बांधकामासाठी एकूण $5 अब्ज खर्च केले जाणार आहेत. याशिवाय या टॉवरच्या डिझाईनसाठी स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे.  आकाशाला स्पर्श करणा-या या इमारतीसाठी ज्या कंपनीचे डिझाइन निवडले जाईल, त्या कंपनीला US $ 1 दशलक्ष एवढे बक्षीसही दिले जाणार आहे.  स्किडमोर, ओविंग्ज अँड मेरिल, एड्रियन स्मिथ आणि गॉर्डन गिल आर्किटेक्चर या रिअल इस्टेट क्षेत्रातील बड्या कंपन्या या स्पर्धेअंतर्गत या जगातल्या उंच इमारतीचे डिझाइन्स तयार करण्यासाठी तयारी करत आहेत.  ही इमारत बुर्ज खलिफापेक्षा अडीच पट उंच, वर्ल्ड ट्रेड सेंटरपेक्षा चारपट आणि बिग बेनपेक्षा सुमारे 20 पट उंच असेल.  अशाप्रकारे सौदी अरेबिया या बाबतीत दुबई, अमेरिका आणि ब्रिटनच्याही पुढे जाणार आहे.  जगात आता 4 मेगाटॉल इमारती आहेत.  दुबईचा बुर्ज खलिफा मेगाटॉलमध्ये अव्वल आहे. त्यानंतर क्वालालंपूरमधील मर्डेका 118, शांघायमधील शांघाय टॉवर आणि मक्का येथील मक्का रॉयल क्लॉक टॉवर यांचा नंबर लागतो.

=========

हे देखील वाचा : प्राचीन काळात मिळायच्या ‘या’ सर्वाधिक क्रूर शिक्षा

=========  

सौदी अरेबियामध्ये उभारण्यात येणारी ही भव्य इमारत किती वर्षात तयार होणार हा प्रश्न आहे.  बुर्ज खलिफा बांधण्यासाठी जवळपास 6 वर्षे लागली.  बुर्ज खलिफाच्या (Burj Khalifa) बांधकामासाठी दररोज सुमारे 12,000 मजूर काम करायचे.  इमारतीचे काम जानेवारी 2004 मध्ये सुरू झाले आणि ऑक्टोबर 2009 मध्ये बुर्ज खलिफाचे काम पूर्ण झाले. बुर्ज खलिफा (Burj Khalifa) 4 जानेवारी 2010 रोजी सर्वांसाठी खुला करण्यात आला.  जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफाच्या नावावर 7 जागतिक विक्रम आहेत.  जगातील सर्वात उंच इमारत, सर्वात उंच लिफ्ट, सर्वात उंच मजला अशा विक्रमांचा त्यात समावेश आहे.  याशिवाय बुर्ज खलिफाच्या बाबतीत अनेक गम्मतशीर गोष्टीही सांगितल्या जातात.  या उंच इमारतीच्या सर्व खिडक्या स्वच्छ करण्यासाठी तब्बल 3 महिने लागतात.  बुर्ज खलिफाचा बाहेरील भाग 26,000 काचेच्या पॅनल्सने झाकलेला आहे.  इमारतींमधील काचेचे फलक ऊन, उष्णता यासारख्या गोष्टींपासून संरक्षण करण्यासाठी बनवले आहेत.  बुर्ज खलिफा 95 किमीवरूनही पाहता येते.  बुर्ज खलिफा बनवण्यासाठी पाच A380 विमानांच्या वजनाएवढे अॅल्युमिनियम आणि 1 लाख हत्तींच्या वजनाएवढे काँक्रीट वापरण्यात आले आहे.  बुर्ज खलिफा (Burj Khalifa) बांधण्यासाठी सुमारे $1.5 बिलियन खर्च आला.  बुर्ज खलिफामध्ये एकूण 163 मजले आहेत.  ज्यामध्ये 58 लिफ्ट आणि 2957 पार्किंग स्पेस, 304 हॉटेल्स, 37 ऑफिस फ्लोर आणि 900 अपार्टमेंट आहेत. आता बुर्ज खलिफाचाच एवढा आवाका असेल तर सौदी अरेबियाच्या रियाधमध्ये उभारण्यात येणा-या त्याच्यापेक्षा दुप्पट इमारतीमध्ये किती लिफ्ट असतील आणि  किती फ्लोर असतील याची उत्सुकता आणि  चर्चा मात्र रंगली आहे.   

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.