Home » Pashupatinath Temple ‘या’ कारणामुळे पशुपतिनाथ मंदिराचे दर्शन केल्याशिवाय केदारनाथाची यात्रा पूर्ण होत नाही

Pashupatinath Temple ‘या’ कारणामुळे पशुपतिनाथ मंदिराचे दर्शन केल्याशिवाय केदारनाथाची यात्रा पूर्ण होत नाही

by Team Gajawaja
0 comment
Pashupatinath Temple
Share

भगवान शिवशंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांचा महिमा अपार आहे. या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर भारताबाहेर आहे आणि ते म्हणजे नेपाळच्या काठमांडूजवळील श्री पशुपतिनाथाचे मंदिर (Pashupatinath Temple). युनोस्काच्या यादिमध्ये जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून गौरविलेले हे मंदिर भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांना साधणारा धार्मिक दुवा आहे. पांडवकालीन इतिहास आणि भगवान शंकराच्या अस्तित्वाचे अनेक पुरावे येथे सापडतात. यामुळे या मंदिरात कायम जगभरातील शिवभक्तांचा ओढा असतो.  

नेपाळची राजधानी काठमांडूपासून तीन किलोमिटर अंतरावर देवपाटन गावाजवळील बागमती नदीच्या किनारी श्री पशुपतिनाथ मंदिराची भव्य वास्तू आहे. स्थापत्यशास्त्राचा अत्यंत चांगले उदाहरण म्हणूनही या मंदिराचा गौरव होतो.  

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या या मंदिरात अनेक परंपरा पार पूर्वापार चालत आल्या आहेत आणि त्यांचे आजही तेवढ्याच काटेकोरपणे पालन होते. १५ व्या दशकामध्ये राजा प्रताप मल्ल यांनी दक्षिण भारतातून, मंदिरासाठी चार पुजारी आणि मुख्य पुजारी यांची नेमणूक केली होती. आजही ती परंपरा पाळत दक्षिण भारतातील पुजारीच येथे पशुपतीनाथाची पूजा करतात.   

Uttarakhand Char Dham Devasthanam Management Board

या मंदिरात, स्वयम् भगवान शंकर आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असतात, अशी धारणा आहे. आजही येथे अनेक रहस्यमयी कथा मंदिराबाबत सांगितल्या जातात.  भगवान शिव येथे पशुपती स्वरुपात विराजमान आहेत. पशु म्हणजे जीवन आणि पती म्हणजे स्वामी. जीवनाचा स्वामी म्हणून येथे शिवशंकराची पूजा करण्यात येते. हे मंदिर म्हणजे भारतातील केदारनाथ मंदिराचा अर्धा भाग मानण्यात येते. 

जे भक्त केदारनाथाची यात्रा करतात त्यांनी पशुपतीनाथाचे दर्शन केले नाही, तर त्यांची यात्रा अर्धीच झाल्याचे मानण्यात येते. 

पशुपतीनाथाच्या मंदिरात (Pashupatinath Temple) स्थापित शिवलिंगाचे पाच वेगवेगळी मुखे आहेत. प्रत्येक दिशेला असणाऱ्या  या शिवशंकराच्या मुखांचा अर्थही व्यापकपणे सांगण्यात येतो. दक्षिणमुखी शिवलिंगाला अघोर मुख म्हटले जाते. पश्चिममुखी शिवलिंगाला सद्योजात, पूर्वमुखी शिवलिंग तत्वपुरुष आणि पश्चिममुखी शिवलिंग अर्द्धनारीश्वर म्हणून ओळखले जाते. तर, वरच्या बाजुला असलेले ईशान मुख हे निराकार मुख म्हणून ओळखले जाते.  

भगवान पशुपतीनाथाचे हे सर्वश्रेष्ठतम मुख मानण्यात येते. हे शिवलिंग अत्यंत किंमती मानण्यात आले आहे.  त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे हे संपूर्ण शिवलिंग पारस या चमत्कारी दगडाचे असल्याची मान्यता आहे.  पारसाला लोखंडाचा स्पर्श झाला की त्याचे सोने होते.  त्याचप्रमाणे या शिवलिंगापुढे लीन झाल्यावर भक्तांचे जीवन सफल होते अशी धारणा आहे. 

=====

हे ही वाचा: हिंदुराष्ट्र: जगातील ‘या’ १० देशात आहेत सर्वाधिक हिंदू; पाच नंबरचा देश तर हिंदूंचं करतोय धर्मांतर

=====

पांडव आणि पशुपतीनाथाच्या मंदिराची कथा सांगण्यात येते.  महाभारताच्या युद्धात पांडवांनी आपल्याच नातेवाईंकांना मारले. रक्तपात केला. यामुळे भगवान शंकर क्रोधित झाले. शंकरांचा क्रोध शांत करण्यासाठी त्यांची माफी मागावी असा सल्ला श्रीकृष्णांनी पांडवांना दिला. गुप्त काशीमध्ये पांडव आणि शिवशंकर समोरासमोर आले होते, पण पांडवांना बघून शिवशंकर तिथून गायब झाले. तेच स्थान आज केदारनाथ धाम म्हणून ओळखले जाते.  

Pashupatinath temple opened after four and a half months - myRepublica -  The New York Times Partner, Latest news of Nepal in English, Latest News  Articles

शंकराचा शोध घेत पांडव पशुपतीधामला पोहचल्यावर शंकरांनी रेडयाचे रुप घेतले आणि ते कळपात सामिल झाले. मात्र पांडवांनी त्यांना ओळखले. आपली ओळख पटल्याचे जाणून शिवशंकर स्वतःला जमिनीमध्ये सामावून केदारनाथच्या दिशेने जाऊ लागले. पण त्याचवेळी भीमानं त्यांची मान पकडून त्यांना थांबवले. भोलेनाथ यामुळे प्रसन्न झाले आणि त्यांनी पांडवांना आशीर्वाद दिला. पण यात शिवशंकराचा देह वेगळ्या ठिकाणी आणि मुख वेगळ्या ठिकाणी विभागले गेले. जिथे त्यांचा देह राहिला ते स्थान म्हणजे केदारनाथ आणि शिवशंकराचे मुख जिथे राहिले तेच पशुपतीनाथ धाम म्हणून प्रसिद्ध झाले. त्यामुळेच पशुपतीनाथाचे दर्शन केल्यावर केदारनाथ धाम यात्रा करावी लागते.  

नेहमी शिवशंकराच्या मंदिरात गेल्यावर प्रथम त्याच्या वाहनाचे, म्हणजे नंदिचे दर्शन घ्यावे लागते. मात्र पशुपतीनाथाच्या मंदिरात गेल्यावर नंदिचे दर्शन घेतल्यास पुढचा जन्म प्राण्याचा मिळतो, अशी आख्यायिका सांगितली जाते. याच मंदिराच्या बाहेर मोठा घाट आहे. त्याचे नाव ‘आर्य’ घाट आहे. मंदिराच्या आत कुठल्याही कामासाठी फक्त याच घाटाचे पाणी वापरण्यात येते. अन्य कुठल्याही घाटाचे पाणी मंदिरात वर्ज मानण्यात आले आहे.  

=====

हे ही वाचा: भारतातील ‘या’ ५ मंदिरांमध्ये पुरुषांना प्रवेश नाही (Men are not allowed)

=====

पशुपतीनाथाच्या मंदिराबाबत (Pashupatinath Temple) अनेक आख्यायिका आहेत. कायम भक्तांच्या मेळ्यात राहणाऱ्या या शिवशंकराचे दर्शन घेण्यासाठी साधूही तेवढ्याच संख्येनं येतात. शिवरात्रीच्या दिवशी येथे होणारा सोहळा पाहण्यासारखा असतो. तो संपूर्ण आठवडाच भक्तांसाठी मोठ्या पर्वणीचा असतो. भारत आणि नेपाळला जोडणाऱ्या या मंदिरात भारतीयांचे कायम आस्थेनं स्वागत होते.  

– सई बने 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.