Home » काशी नगरीतील पशुपतीनाथ

काशी नगरीतील पशुपतीनाथ

by Team Gajawaja
0 comment
Pashupatinath Temple
Share

नेपाळची राजधानी काठमांडूमधील भगवान पशुपतीनाथाचे मंदिर (Pashupatinath Temple) जगप्रसिद्ध आहे.  युनेस्कोच्या जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळ या मंदिराचा उल्लेख करण्यात आला आहे.  हे मंदिर नेपाळमधील शिवाचे सर्वात पवित्र मंदिर मानले जाते.  जगभरात काठमांडूनगर भगवान पशुपतीनाथाचे असेच मोठे आणि लोकप्रिय मंदिर (Pashupatinath Temple) भारतात आहे.  मध्यप्रदेशमधील मंदसौर येथेही भगवान पशुपतीनाथाचे मंदिर आहे.  पशुपतीनाथ हे भगवान शिवाचे समानार्थी नाव आहे.  मंदसौर येथील भगवान पशुपतीनाथाची पिंड ही अतिभव्य आहे.  चमकदार गडद तांब्याच्या अग्निमय खडकात कोरलेले हे भगवान शंकराचे रुप बघण्यासाठी मंदसौर मधील मंदिरात शिवभक्तांची गर्दी असते. 

मात्र या दोन मंदिरांशिवाय भारतात आणखी एका ठिकाणी भगवान पशुपतीनाथाचे मंदिर आहे.  हे मंदिर आहे, भगवान शंकराच्याच नगरीमध्ये.  भगवान शंकराची नगरी, काशीमध्ये प्रति पशुपतीनाथाचे मंदिर (Pashupatinath Temple) आहे.  हे मंदिर म्हणजे, काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिराची प्रतिकृती मानण्यात येते. वाराणसी येथील ललिता घाटावर काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिराप्रमाणेच मंदिर आहे.  या मंदिरात पशुपतीनाथाच्या भक्तांची गर्दी असते.  हे मंदिर काठमांडू येथील मंदिराची छोटी आवृत्ती आहे.  या मंदिरात प्रवेश केल्यानंतर पशुपतीनाथाच्या भक्तांना काशीमध्येच काठमांडू येथे गेल्याचा अनुभव येताे.  वाराणसीमधील हे पशुपतीनाथाचे मंदिर नेपाळी मंदिर, म्हणूनही प्रसिद्ध आहे.  मुख्य म्हणजे, या मंदिराच्या संवर्धनाचे काम नेपाळ सरकारतर्फे करण्यात येते.  

काशी म्हणजेच वाराणसीमधील हे भगवान पशुपतीनाथाचे मंदिर (Pashupatinath Temple) अतिशय भव्य आहे.  या मंदिरातील कलाकुसरही मुळ पशुपतीनाथ मंदिरासारखी करण्यात आली आहे.  भारतात राहणारे नेपाळी वंशाचे नागरिक या पशुपतीनाथ मंदिराला (Pashupatinath Temple) कायम भेट देतात.  काशी नगरी ही भगवान शंकराची नगरी म्हणून ओळखली जाते.  येथे भगवान विश्वेश्वराचे भव्य मंदिर आहेत.  तसेच काशीच्या गल्लोगल्लीमध्ये भगवान शंकराचे मंदिर आहे.  मात्र या सगळ्या मंदिरांपेक्षा ललिता घाटावरील भगवान पशुपतीनाथाचे मंदिर पूर्णपणे वेगळे आहे.  

ललिता घाटावर असलेले हे पशुपतीनाथ मंदिर दगडाने बांधलेले नसून नेपाळी लाकडाचा वापर करून बांधलेले आहे. नेपाळी लाकडापासून बनवलेले हे मंदिर अतिशय भक्कम असून त्याची वेगळी शैली बघण्यासाठीही अनेक भक्त मंदिरात येतात. मंदिराच्या गाभार्‍यात पशुपतिनाथाच्या रूपातील शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. येथे पुजा केल्यास काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिरात (Pashupatinath Temple) पुजा केल्यावर जे समाधान मिळते, तसेच या मंदिरातही मिळते.  त्यामुळे ज्यांना काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिरात जाणे शक्य होत नाही, ते भक्त आवर्जून काशी येथील या पशुपतीनाथ मंदिरात जाऊन भगवान शंकराच्या चरणी लीन होतात.  काशीनगरीमध्ये हे पशुपतीनाथ मंदिर नेपाळचे राजा राणा बहादूर साहा यांनी बांधले. वाराणसी ही भगवान शंकराची नगरी आहे.  येथे पशुपतीनाथाच्या रुपानंही भगवान शंकराचे मंदिर असावे, ही त्यांची इच्छा होती.  त्यामुळे राजा राणा बहादूर साहा स्वतः काशी नगरीत आले आणि मंदिर पूर्ण होईपर्यंत राहिले. 1800 ते 1804 या दरम्यान राजा राणा बहादूर साहा काशीमध्ये राहिले.  त्यांनी नेपाळच्या स्थापत्य आणि शिल्पानुसार हे मंदिर बांधले.  

या मंदिराच्या उभारणीसाठी गंगेच्या काठावरील घाटाची जमीन निवडण्यात आली आणि त्याचे बांधकाम सुरू झाले, हाच ललिता घाट होय.  मंदिर उभारणी दरम्यान 1806 मध्ये राजा साहा यांचा मृत्यू झाला. राजाला त्याच्या सावत्र भावानं मारल्याचं सांगण्यात येतं.  राजाच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र राजा राजेंद्र वीर विक्त्रस्मा साहा यांनी 1843 मध्ये या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले.  नेपाळमधील सत्ता संघर्ष या दरम्यान चिघळला होता.  त्यामुळे या मंदिराचे बांधकाम रखडले. जवळपास चाळीस वर्षांनी हे काशीमधील पशुपतीनाथाचे मंदिर पूर्ण झाले.  

==========

हे देखील वाचा : मनाली येथील बाबा बर्फानी अंजनी महादेव मंदिर

==========

या मंदिराच्या उभारणीसाठी खास नेपाळहून कारागिर आणण्यात आले होते.  फारकाय मंदिराच्या बांधकामात वापरलेले लाकूडही राजाने नेपाळमधून आयात केले होते.  या नेपाळच्या कारागिरांनी मंदिरात वापरलेल्या लाकडावर मुख्य पशुपतीनाथ मंदिराप्रमाणे (Pashupatinath Temple) नक्षीकाम केले. मंदिराला चारही बाजूंनी लाकडी दरवाजे असून भिंतीपासून छतापर्यंत सर्व काही लाकडापासून बनवलेले आहेत.  हे मंदिर लाकडापासून बनलेले असल्यामुळे याला काथवाला मंदिर असेही म्हणतात.  स्थानिक भाषेत काठ म्हणजे लाकूड.  टेराकोटा, लाकूड आणि दगड वापरून हे मंदिर नेपाळी स्थापत्य शैलीत बांधले आहे.  नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरात (Pashupatinath Temple) एक भव्य घंटा आहे.  तशीच घंटा या मंदिराबाहेरही आहे. मंदिराच्या दक्षिण दरवाजाबाहेर एक दगडी नंदी बैलही आहे. काशी कॅरिडोरच्या निर्मितीनंतर या पशुपतिनाथ मंदिरात येणा-या भक्तांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.