श्रीकांत नारायण
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा महाविस्तार होऊन अवघे दोन दिवस पूर्ण होतात न होतात तोच महाराष्ट्रात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी खास पत्रकारपरिषद घेऊन आपली खदखद व्यक्त केली. वास्तविक, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात पंकजाताईंच्या भगिनी प्रीतम मुंडे यांचे ‘अपेक्षित’ नाव दिसले नाही म्हणून आपण नाराज नाही हे सांगण्यासाठी त्यांनी ही खास पत्रकारपरिषद घेतली होती. परंतु आपला ‘अपेक्षाभंग’ झाला असेच जणू काही त्यांना सांगायचे होते की काय असे वाटत होते. त्यांच्या देहबोलीवरून तरी तसे ते स्पष्ट दिसत होते.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यापूर्वी काही दिवस आधी महाराष्ट्रातून संभाव्य मंत्री ज्यांची नावे आघाडीवर होती त्यामध्ये नारायण राणे (Narayan Rane) यांच्याबरोबरच प्रीतम मुंडे यांचेही नाव होते. सुरुवातीला डॉ. भागवत कराड यांचे नावही कोठे दिसले नव्हते मात्र जेंव्हा विस्तार घोषित करण्यात आला त्यावेळी प्रीतम मुंडे यांचे नाव ऐनवेळी गळाले आणि भागवत कराड यांचे नाव झळकले आणि साहजिकच पंकजाताई यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेचच पंकजाताई नाराज असल्याच्या बातम्या प्रसृत झाल्या आणि त्याचा ‘सामना’ करण्यासाठी पंकजाताईंना तातडीने पत्रकारपरिषद घ्यावी लागली.
केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झालेले औरंगाबादचे खासदार भागवत कराड हेही वंजारी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. विशेष म्हणजे हेच भागवत कराड स्व. गोपीनाथ मुंडे यांचे एकेकाळी चेले होते. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनीच त्यांना राजकारणात आणले. एका दृष्टीने ते मुंडे परिवारातीलच आहेत त्यामुळे प्रत्यक्षात पंकजाताईंना आनंदच व्हायला हवा होता. ( तसे पंकजाताईंनी कराड यांचे अभिनंदन केलेच आहे म्हणा …)
मात्र बीडच्या खासदार प्रीतम मुंडे या तर गोपीनाथ मुंडे यांच्या खऱ्या वारसदार. त्या त्यांच्या कन्याच असल्यामुळे केंद्रीय मंत्रिपद परिवाराऐवजी घरातच मिळाले असते तर फार चांगले असते असे पंकजाताईंना वाटणे स्वाभाविकच आहे. मात्र त्यांची साफ निराशा झाली आणि त्यांना आपल्या भगिनींचे (प्रीतमताईंचे ) जंगी स्वागत करण्याची संधी मिळण्याऐवजी ”कराड यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे मी नाराज नाही” असा खुलासा करण्याची पाळी त्यांच्यावर आली.
खा. प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांचे नाव चर्चेत असतानाही त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नाही यामागे ‘झारीतील शुक्राचार्य’ नेमका कोण आहे हे पंकजाताईना चांगले ठाऊक आहे. मात्र त्याचे नाव सांगण्याचे तूर्तास तरी त्यांनी धाडस केले नाही. त्यासंदर्भात पत्रकारपरिषदेत ‘टीम नरेंद्र’, ‘टीम देवेंद्र’ असा प्रत्यक्षपणे उहापोहही झाला. मात्र आपणास त्या ‘टीम’ बाबत फारशी माहिती नाही.
भाजपमध्ये तसे काही नसावे तसेच मला राजकारणातून संपवावे असे भाजपला वाटत नसावे असे सांगून पंकजाताईनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला खरा मात्र त्यासंदर्भात थोडे मागे वळून पाहणेही आवश्यक आहे. मागील विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून त्यांनी आपलेच चुलत बंधू धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती त्यावेळी मतदान तोंडावर आले असताना, ” यावेळी पंकजाताईना निवडणूक अवघड जाणार अशी दबक्या आवाजात चर्चा होती. आणि शेवटी त्याप्रमाणेच घडले. त्यामुळे त्यामागे कोणती ‘टीम’ होती हेही निवडणूक निकालानंतर पंकजाताईंना चांगलेच ठाऊक झाले असावे.
वास्तविक गोपीनाथ मुंडे यांच्या ‘वारसदार’ म्हणूनच पंकजा आणि प्रीतम या मुंडे भगिनींना भाजपमध्ये स्थान आहे हे उघड सत्य आहे. एकेकाळी महाराष्ट्रात भाजपमध्ये महाजन-मुंडे यांचाच शब्द अंतिम होता. महाजन यांच्या अकाली मृत्यू झाल्यानंतरही काही काळ गोपीनाथ मुंडे यांनी पक्षावर आपले वर्चस्व कायम ठेवले होते. परंतु राजकारणात कधी फासे उलटे पडतील याचा नेम नसतो त्यामुळे एक वेळ अशी आली होती की, गटबाजीला कंटाळून वैफल्यग्रस्त झालेल्या गोपीनाथ मुंडे यांनाही भाजप सोडून जाण्याची इच्छा झाली होती. मात्र त्यांनी तसा निर्णय घेतला नाही.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत ते बीड मतदारसंघातून निवडून आले आणि नरेन्द्र मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात मंत्रीही झाले. मात्र दुर्देवाने थोड्याच दिवसातच त्यांचा दिल्लीत अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेचा अर्थातच पंकजा आणि प्रीतम मुंडे या भगिनींना फायदाच झाला. प्रीतम मुंडे बीड लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा लोकसभेवर प्रचंड मतांनी निवडून आल्या तर पंकजाताई मागील विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून निवडून येऊन देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्रीही झाल्या.
महत्वाकांक्षी असलेल्या पंकजाताईंनी एकीकडे मंत्री म्हणून काम करतांना मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे भासवित दुसरीकडे पक्षात मुंडे गटाचे पुनरुज्जीवनही केले. मात्र त्यांची हीच महत्वाकांक्षा त्यांना नडली असावी. त्याचा परिणाम म्हणून त्यांचे हळूहळू खच्चीकरण सुरू झाले. खुद्द पंकजाताईंनाच गोपीनाथ मुंडे यांचे प्रेरणास्थान असलेल्या ‘भगवान गडावर’ येण्यास मज्जाव करण्यात आला. ( त्यामागे कोणती ‘टीम’ होती हेही त्यांना चांगले माहित असावे ) त्याला प्रतिशह देण्यासाठी म्हणून त्यांनी स्वतंत्रपणे ‘गोपीनाथ गड’ स्थापन करून वंजारी समाजावरील आपले वर्चस्व पुनर्स्थापित करण्याचा प्रयत केला.
वंजारी समाज ‘ओबीसी’ मध्ये असल्याने ‘ओबीसी’ च्या हक्कांसाठीच्या लढ्यात पंकजाताईही उतरल्या. अलीकडेच लोणावळा येथे काँग्रेसमधील ओबीसी नेत्यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या ‘चिंतन शिबीरा’लाही त्यांनी हजेरी लावली. भाजपमध्ये ‘मी, मी’ करणाऱ्यांना हीच बाब खटकली असावी आणि त्यामुळेच मुंडे भगिनींचे खच्चीकरण करण्यात येत असावे. प्रीतम मुंडे यांचे नाव ऐनवेळी मंत्रिमंडळातून वगळणे हा कदाचित त्याचाच एक भाग असावा.
आता पंकजाताईंनी खास पत्रकारपरिषद घेऊन आपण पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाबद्दल नाराज नाहीत असा खुलासा केला असला तरी त्यांनी आपली खदखद व्यक्त केली. एकूणच पाहता आगामी काळात भाजपमधील त्यांची वाटचाल खडतरच असेल असे दिसून येते. कदाचित एकनाथ खडसे यांच्यानंतर त्यांचा नंबर लागू शकतो त्यामुळे राजकारणात टिकून राहण्यासाठी पंकजाताईंना यापुढे फार सावधगिरीची पावले टाकावी लागणार आहेत हे निःसंशय.
– श्रीकांत नारायण
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.