Home » पाकिस्तानमध्ये पुन्हा नवाझराज…

पाकिस्तानमध्ये पुन्हा नवाझराज…

by Team Gajawaja
0 comment
Nawaz Sharif
Share

दिवळखोर झालेल्या पाकिस्तानमध्ये पुन्हा नेतृत्व बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांचे बंधू असलेले शाहबाज शरीफ सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. पण शहबाज खान यांना पाकिस्तानमध्येच विरोध वाढत आहे. सध्या पाकिस्तानमध्ये महागाई अत्यंत वाढली आहे. सर्वसामान्य जनतेची मोठी कुचंबणा होत आहे. अशातच पाकिस्तानची आंतराष्ट्रीय पतही पार धुळीला मिळाली आहे, त्यामुळे या देशाला कुठूनही कर्ज मिळत नाही. नुकतेच फ्रान्सच्या दौ-यावर गेलेले शाहबाज शरीफ यांच्यावर टीकाच जास्त झाली. या सर्व वादात आता शाहबाज शरीफ यांनी आपल्या भावाला पाकिस्तानात आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. 2019 पासून उपचाराच्या निमित्तानं लंडनमध्ये असलेल्या नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांच्यावर पनामा पेपर्ससंदर्भात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले, त्यानंतर ते आता पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये परत येणार अशी माहिती आहे. 

पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) नेते आणि फेडरल मंत्री जावेद लतीफ यांनी ही माहिती दिली. नवाझ शरीफ सप्टेंबरमध्ये पाकिस्तानात परत येणार असून त्यांच्याच नेतृत्वात पाकिस्तानमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी खुद्द नवाझ शरीफ दुबईत दाखल झाले आहेत. त्यांची मुलगी मरीयम शरीफ हिने दुबईमध्ये बैठक आयोजित केली होती. या बैठकीला शरीफ यांच्या पक्षाचे सगळे नेते उपस्थित होते. पाकिस्तानमध्ये नवाझ शरीफ परत आले तर त्यांना अटक होऊ शकते. पण हा कायदाच आता बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाझचे सुप्रीमो आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि पक्षाच्या उपाध्यक्ष मरियम नवाझ शरीफ यांनी दुबईच्या राजघराण्यातील सदस्यांची भेट घेतली. इथेच पाकिस्तानच्या सत्तेवर पुन्हा येण्यासाठी नवाझ शरीफ (Nawaz Sharif) पुन्हा तयारी करीत आहेत.  

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ (Nawaz Sharif) लवकरच पाकिस्तानात परतणार असल्याची माहिती आहे. नवाझ यांनी पाकिस्तानत पुन्हा यावे यासाठी नॅशनल असेंब्लीने संसद सदस्याच्या अपात्रतेची मर्यादा कमाल पाच वर्षांपर्यंत मर्यादित ठेवणाऱ्या कायद्यात सुधारणा केली आहे.  त्यामुळे आजीवन बंदी असलेल्यांना सार्वजनिक पदासाठी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवाझ शरीफ आणि आयपीपी प्रमुख जहांगीर खान तरीन यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने 2017 मध्ये या दोन्ही नेत्यांना कुठल्याही निवडणुका लढवण्यासाठी अपात्र ठरवले होते. पण हा कायदाच बदलल्यानं नवाझ शरीफ पाकिस्तानात परतल्यानंतर केवळ निवडणूकच लढवू शकणार नाहीत, तर ते जिंकले तर ते पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. आता बदलेल्या कायद्यानुसार कोणत्याही खासदाराला 5 वर्षांपेक्षा जास्त काळ अपात्र ठरवता येणार नाही. त्यामुळे नवाझ शरीफ पाकिस्तानच्या पंतप्रधानपदासाठी तयारीला लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी दुबईमध्ये बैठक घेतली. (Nawaz Sharif) 

2017 मध्ये, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पनामा पेपर्स प्रकरणात नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांना अपात्र ठरवले. त्यानंतर त्यांना कोणतीही निवडणूक लढवता आली नाही. पण हा कायदा बदलल्यानं शरीफ यांची मुलगी, मरियम नवाझ आपल्या वडिलांच्या पंतप्रधानपदासाठी तयारी करु लागली आहे. नवाझ शरीफ हे आतापर्यंत 3 वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान राहिले आहेत. 2019 मध्ये लाहोर उच्च न्यायालयाने नवाझला उपचारासाठी चार आठवड्यांसाठी परदेशात जाण्याची परवानगी दिली होती. नवाझ शरीफ 19 नोव्हेंबर 2019 रोजी लंडनला गेले,  ते पाकिस्तानमध्ये परतलेच नाही, त्यांच्यावर अटकेची तलवार आहे. 

==========

हे देखील वाचा : बराक ओबामा मोदींवर का रुसले याच कारण आलं समोर

==========

2018 मध्ये, न्यायालयाने नवाझ यांना अल-अझिझिया स्टील मिल भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवले असून सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय एव्हनफिल्ड प्रॉपर्टी प्रकरणी 11 वर्षांची शिक्षा आणि 80 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामुळे नवाझ पाकिस्तानमध्ये आले की त्यांना लगेच अटक होऊ शकते,  पण नवाझ थेट पाकिस्तानला येण्याऐवजी दुबईतून सर्व सूत्र हलवतील अशी शक्यता अधिक आहे.   पाकिस्तानचे सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना तेथील जनतेनेच नाकारले आहे. शरीफ यांना बदलण्याची मागणी होत आहे.  या पार्श्वभूमीवर निवडणुका झाल्यास त्यात शरीफ यांच्या पक्षाला मोठा धक्का बसू शकतो. त्यामुळे शाहबाज यांच्याऐवजी शरीफ यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका होण्याची शक्यता आहे. अर्थात या दोन्ही ही भावांवर करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे. त्यात माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षानंही शरीफ कुटुंबियांवर अनेक आरोप केले आहेत. एकीकडे पार रसातळाला पोहचलेला सर्वसामान्य आणि दुसरीकडे राजकीय फायद्यासाठी लढत असलेले मोजके राजकारणी असे चित्र सध्या पाकिस्तानमध्ये पाहावयास मिळत आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.