नीरजा भनोतचा जन्म चंदीगढमध्ये झाला. आई रमा भनोत आणि वडिल हरीश भनोत यांची मुलगी नीरजा. हरीश भनोत हे मुंबईमध्ये पत्रकार होते. नीरजाचे शिक्षण चंदीगडमधील ‘सेक्रेड हार्ट सेकंडरी स्कूल’, मुंबईमधील बॉम्बे स्कॉटिश स्कूल आणि सेंट झेविअर्स महाविद्यालय येथून झाले. नीरजाने क्रॅक जॅक बिस्कट, गोदरेज बेस्टो, अमूल सारख्या जाहिरातींमध्ये मॉडेल म्हणून काम केले आहे.
मार्च १९८५ मध्ये नीरजाचे लग्न झाले. पतीसोबत ती गल्फमध्ये स्थायिक झाली. पण हुंडा मागणीच्या दबावामुळे ती दोन महिन्यातच माहेरी मुंबईला परतली. नंतर तिने पॅन ॲम कंपनीत एअर हॉस्टेस पदाससाठी अर्ज केला. निवड झाल्यानंतर ती काही काळ मायामी येथे प्रशिक्षणासाठी गेली. आणि पॅन ॲममध्ये कंपनीत रुजू झाली.
अखेर तो ‘काळा दिवस’ अखेर उजाडला. म्हणजेच आजचा दिवस ५ सप्टेंबर १९८६.
पाकिस्तानमधील कराची विमानतळावर मुंबई ते अमेरिका जाणाऱ्या Pan Am 73 एयरलाइन्सच्या विमानाला ४ अतिरेक्यांनी वेठीस धरले. त्या विमानात ४०० प्रवासी होते. नीरजा सुद्धा याच विमानात होती. अतिरेक्यांना ते विमान त्यांना इस्रायलमधल्या कोणत्या तरी इमारतीला धडकावयाचे होते.
नीरजाने पासपोर्ट गोळा केले पण शिताफीने त्यातील अमेरिकन प्रवाश्यांचे पासपोर्ट लपवून बाकीचे पासपोर्ट अतिरेक्यांना दिले. प्रवाश्यांना जेवण देण्याच्या बहाण्याने विमानातील आपत्कालीन दरवाजाबद्दल माहिती देणारी पत्रक प्रवाश्यांपर्यंत पोहोचवले. थोड्या वेळाने विमानातील इंधन संपले आणि विमानात अंधार पसरला. या परिस्थितीचा फायदा घेऊन नीरजाने विमानाचे सर्व आपत्कालीन दरवाजे उघडले. प्रवाश्यांनी देखील पटापट विमानाबाहेर उड्या मारल्या.
ती विमानातून बाहेर पडणार एतक्यात तिला एका लहान मुलांचा रडण्याचा आवाज ऐकायला आला. नीरजा त्या मुलांना शोधून विमानाच्या बाहेर पडत होती तेवढ्यात तो एक अतिरेकी नीरजाच्या समोर आला. नीरजाने त्या मुलांना आपत्कालीन दरवाजाच्या बाहेर फेकून दिले आणि त्या अतिरेक्याने झाडलेल्या गोळ्या अंगावर घेतल्या. त्यातच नीरजाला वीरमरण आले.
अवघ्या २१ व्या वर्षी ‘अशोक चक्र’ ही वीरता पदवी मिळणारी नीरजा भनोत पहिली भारतीय महिला आहे. पाकिस्तानने ‘तमगा-ए-इन्सानियत’ हा सर्वोच्च पुरस्कार दिला. अमेरिकेने ‘जस्टिस फॉर व्हिक्टम ऑफ क्राईम ॲवार्ड’ हा वीरता पुरस्कार देऊन नीरजाला सन्मानित केले.
नीरजाचं प्रेम हे फक्त भारत देशापुरतं मर्यादित नव्हतं. समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव तीला होती. म्हणूनच यातून घडला तीचा प्रेरणादायी आणि थक्क करणारा प्रवास.
‘वीरंगणा नीरजा भनोत’च्या कर्तृत्वाला ‘कलाकृती मिडीया’चा मानाज मुजरा!