Home » अनवट प्रवासाचं किनवट!

अनवट प्रवासाचं किनवट!

by Correspondent
0 comment
Kinwat Wildlife Sanctuary | K Facts
Share

वर्षा सहलीसाठी माहिती गोळा करताना आडवाटेवरचं किनवटचं अभयारण्य सापडलं. नांदेडपासून १६० कि.मी. वर असणारं आणि थोडं यवतमाळ जिल्ह्यात व्यापणारं किनवटचं अभयारण्य मुंबईपासून तसं अनवट जागीच आहे. पैनगंगा याच अभयारण्यातून वाहते. परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, माहूर, आंबेजोगाई या ठिकाणांना जायचं ठरल्यावर किनवटला या साखळीत सहज गुंफता आलं. वनविभागाच्या विश्रामगृहात आरक्षणही मिळालं. मग आम्ही सात रंगांचे, सात सुरांचे, सात सोबती निघालो अनवट जगातल्या किनवटला.

परळी, आंबेजोगाई इथे यथासांग दर्शन घेऊन मजल- दरमजल करीत रात्री आठ पर्यंत किनवट गावात पोचलो. किनवट हे तसं तालुक्याचं महत्त्वाचं ठिकाण. किनवट आणि यवतमाळचा थोडा भाग नक्षलवाद्यांसाठी प्रसिद्ध. आमचं वनखात्याचं विश्रामगृह किनवटमधील राजगड नावाच्या ठिकाणी होतं. आता तिथे जायला फक्त १२ कि.मी. चा घाट राहिला होता. दोन्ही बाजूंना दाट वनराई, मिट्ट काळोख, दिवे नाहीत, घोंघावणाऱ्या वाऱ्याचा भेदक आवाज, फक्त मोटारीचे हेड लाइट्स. दोन-चार मैलांनंतर एखादी वस्ती. या सर्व गोष्टी आम्हांला गंभीर करू लागल्या. कुणीतरी हळूच रामरक्षा, मारुती स्तोत्र म्हणू लागलं. ते अभयारण्य होतं फक्त प्राण्यांसाठी. खरंतर आमच्यासाठी ते भयारण्य होतं. उगीच लहानपणी वाचलेल्या, सिनेमात पाहिलेल्या भुतांच्या गोष्टी आठवत होत्या. एका वळणावर गाडी येऊन थांबली. वनविभागाची पाटी आणि दूरवर एक दिवा दिसला. एवढ्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांचीच गाडी आमच्यासमोर थांबली. त्यांनी करून दिलेल्या सोयीमुळे किनवट अभयारण्यातले स्वस्त आणि मस्त वास्तव्य सुरू झालं. गरमागरम वरणभाताच्या भोजनाने सगळाच थकवा गेला आणि बंगल्यासमोर मस्त गप्पा रंगल्या.

उजाडता उजाडता मला जाग आली. माझ्या आधीच विनिता उठलेली. मग मी मंजिरी, विनिता निघालो प्रभातफेरीला. चोहीकडे नीरव शांतता.

BEAUTY OF MAHARASTRA KINWAT FOREST
BEAUTY OF MAHARASTRA KINWAT FOREST

त्याला ओरखडे आणणारा आमच्याच पावलांचा आवाज. झाडावरून एखादी खारूताई सहज रस्त्याच्या मधोमध येऊन पुन्हा दूर पळायची आणि इतक्यात ऐकू यायचा एखाद्या कोकिळेचा पंचम. मंद वाऱ्याची झुळूक पांघरत, गुणगुणत रपेट करून आलो. चहा व न्याहारी आटोपून जवळच्याच धबधब्यावर डुंबायला गेलो.

विश्रामगृहाची देखभाल करणाऱ्या जाधवकाकांकडून किनवटच्या अभयारण्याबद्दल बरीच माहिती मिळवली. वाघ, चितळ, सांबर, अस्वलं, नीलगाय असे प्राणी या अभयारण्यात आढळतात. इथले वनचर लोक रानात नुसते पायी हिंडले तरी त्यांना हे प्राणी काही करीत नाहीत. रात्री आपल्या सावधगिरीसाठी हे लोक आपल्या खोपटाच्या दाराशी छोटीशी शेकोटी पेटवून ठेवतात. पुढे ती रात्रभर धुमसत राहते. त्यामुळे वाघ, अस्वलं पुढे यायला धजावत नाहीत.

इथलं प्रमुख पीक म्हणजे बाजरी. काळी जमीन. पण पाण्याची मात्र टंचाई. उन्हाळ्यात ५-६ मैल चालून पाणी आणावं लागतं. पण चालण्याचा व्यायाम, रानमेवा, ताजी शुद्ध हवा यामुळे इथे रोगराई नाही. जंगलाचा बहुतांश भाग सागाच्या झाडांचा, पांढरट रंगाचं खोड आणि सालं. तिथे बदामाची झाडंही बरीच दिसली. पानं कुसकरली की हाताला लाली येते रक्तासारखी. या अभयारण्यात सागाच्या झाडांची मोठी खरेदी-विक्री चालते. सागाच्या ओंडक्यांची मोठी चळत जिकडे तिकडे रचलेली होती. या अभयारण्यातले रहिवासी म्हणजे बंजारा समाज. आजही दूरदर्शन, केबल, इंटरनेट, मोबाईल यांपासून दूर असलेला, निव्वळ निसर्गाच्या छायेत वावरणारा समाज. रंगीबेरंगी आरसे लावलेल्या चोळ्या आणि घागरे घातलेल्या बंजारणी आम्ही पाहिल्या. हातभर बांगड्या, गळाभरून माळा आणि लचकत चालताना पायातल्या घुंगरांचा आवाज. टिपिकल कारवाँ सिनेमातल्या अरुणा इराणींसारख्या. जाधवकाकांनी बरीच माहिती दिली. उद्या सकाळी गर्द झाडीत नेण्याचे कबूल करून ते आपल्या कामाला गेले आणि आम्ही जवळच २२ कि.मी. अंतरावरील उणकेश्वर येथील गरम पाण्याचे कुंड, शंकर मंदिर, वनौषधी संग्रहालय पाहून माहूर गडाकडे प्रयाण केले. दत्त जन्मस्थान, साडेतीन शक्तिपीठातली रेणुका माउली यांचं दर्शन घेऊन चार वाजेपर्यंत परतलो. तेव्हा गरम मसाल्याचा रस्सा, पोळ्या, भात, मांसाहारांसाठी रसरशीत गावठी कोंबडी या सर्व गोष्टी पांडुरंग खानसाम्याने तयार ठेवल्या. अशोकचा मिरचीचा ठेचा आणि पुरणपोळ्या सोबत होत्याच. शेताजवळ बसूनच ताव मारला.

Kinwat Wildlife Reserve
Kinwat Wildlife Reserve

आता एव्हाना मला समोरचे संध्यारंग खुणावत होते. निळेशार क्षितिज, त्यावरची केशरी, सोनेरी झालर आणि पायाखालची हिरवळीतली नागमोडी तांबडी पायवाट, रानात चरायला गेलेल्या गुरांचा परतावा आणि हवेतील पावसानंतरची गारवाई. आत्मानंद यापेक्षा वेगळा तो काय असणार? आजची १५ ऑगस्टची सकाळ. तिथले मोठे राजकीय अधिकारी, वनरक्षक, त्यांचे सहकारी आणि आम्ही एकत्रितपणे ध्वजवंदन केलं. मी अचानक ४-५ देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम केला. सगळेच अंतर्मुख झाले.

अधिकारी निघून गेले आणि जाधवकाका आमच्यासोबत जंगलात यायला मोकळे झाले. आत्तापर्यंत नुसत्याच रानवाटा तुडवल्या, पण आता मात्र हातांनी झाडाझुडपांची झाडी बाजूला करत पायांनी चाचपडत आम्ही त्यांच्यामागून जात राहिलो. खोल दरीपर्यंत जाऊन आलो. पावलं न वाजवता चालताना एके ठिकाणी हरीण पाहिलं. अस्वलाने रात्री जमीन उकरलेल्या जागा, वाघांचे ठसे, सापांची बिळे सगळं खुलासा करून जाधवकाकांनी दाखवलं आणि सर्वांत रमणीय जागा म्हणजे एवढ्या उंचावर आपोआप तयार झालेलं छोटं सरोवर. संथ निळं पाणी, शांत निवांत जागा. दुपारच्या रखरखीत उन्हातही विलक्षण आल्हाद आणि प्रसन्नता. निर्झराचं पाणी पिऊन थोडावेळ तिथेच विसावलो. या रानवाटा तुडवताना मन कधीच थकणार नव्हते. परतीच्या प्रवासाला लागलो. औंढा नागनाथमार्गे परभणी आणि परभणी-मुंबई रेल्वे. रस्ता मागे पळत होता. 

“शुभं भवतु”

लेखक – युधामन्यु गद्रे

Contact: yudhamanyu@gmail.com


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.