Home » भगवान शिवाचे जगातील सर्वात उंच मंदिर; हे मंदिर पांडवांनी बांधले आहे…

भगवान शिवाचे जगातील सर्वात उंच मंदिर; हे मंदिर पांडवांनी बांधले आहे…

by Team Gajawaja
0 comment
Share

जगातील सर्वात उंच शिवमंदिर म्हणून ज्या मंदिराची ख्याती आहे ते म्हणजे उत्तराखंड राज्यातील चोपटा  येथील तुंगनाथ मंदिर. या मंदिराबाबत श्रीराम, पांडव आणि गणेश यांच्याशी निगडित कथाही सांगितल्या आहेत. मिनी स्वित्झर्लंड असा या परिसराचा उल्लेख होतो. मे महिन्यानंतर तुंगनाथ मंदिराची यात्रा सुरु होते, ती नोव्हेंबर महिन्यापर्यंत चालू असते.  

दिवाळीनंतर या मंदिराची द्वारे बंद करण्यात येतात. त्यानंतर बर्फाखाली गेलेला हा भाग मे महिन्यानंतर पुन्हा शिवभक्तांनी गजबजू लागतो. कधी तुफान बर्फवृष्टी, तर कधी पाऊस…आणि सोबतीला बोचरी थंडी, एवढं असूनही या तुंगनाथ मंदिरात हजारो शिवभक्त दर्शनासाठी जातात कारण शिखरांचा स्वामी म्हणून गौरविलेले हे तुंगनाथ मंदिर म्हणजे जगातील भगवान शिवाचे सर्वोच्च मंदिर आहे. त्यामुळे मंदिरापर्यंतचा प्रवास कितीही अवघड असला तरी भगवान शंकराचे भक्त तो पूर्ण करतात आणि आपल्या आराध्याच्या दर्शनानं पावन होतात.  

तुंगनाथ मंदिर चोपटा हे उत्तराखंडच्या तुंगनाथ पर्वतावर स्थित आहे. हिमालयाच्या कुशीत असलेली चोपटा व्हॅली ही पर्यटकांना आकर्षित करते. येथूनच 4.5 किलोमीटरचा ट्रेक केल्यावर 12,074 फूट उंचीवर असलेल्या तुंगनाथ शिव मंदिराचे दर्शन होते. हा प्रवास नेहमी हवामानावर अवलंबून असतो. बर्फवृष्टी आणि पाऊस यांचे कोणतेही वेळापत्रक येथे सांगता येत नाही. त्यामुळे येणाऱ्या भाविकांना या दोघांचीही तयारी ठेऊन हा तुंगनाथ मंदिर (Tungnath Temple) ट्रेक पार पाडावा लागतो. त्यात अत्यंत उंचावर असलेल्या या मंदिर परिसरात भाविकांच्या निवासाची व्यवस्था नाही. त्यामुळे सूर्यदयापूर्वी निघून भगवान शंकाराचे दर्शन केल्यावर पुन्हा परतण्याची घाई करावी लागते. पण या प्रवासात शिवभक्तांना कधी थकवा जाणवत नाही कारण हा परिसर नितांत सुंदर आहे. अगदी स्वर्ग बघितल्याचा अनुभव आल्याचे तुंगनाथ मंदिराला भेट दिलेले भक्त सांगतात.  

हिवाळ्याच्या महिन्यांत पायवाट आणि उतार बर्फाने झाकलेले असतात आणि त्यावर लाल आणि गुलाबी रंगाच्या छटा असलेल्या रोडोडेंड्रॉनच्या फुलांची बहार असते. याशिवाय अन्य रानफुलांनीही हा परिसर सजलेला असतो. त्यामुळे पर्यटक उत्साहानं हा ट्रेक पूर्ण करतात आणि तुंगनाथाचे दर्शन घेतात. तसेच याच परिसरात श्रीरामांनी तपर्श्चया केली असल्याच्या आख्यायिकाही प्रसिद्ध आहेत. 

ही तुंगनाथ यात्रा सुरु होते ती भगवान गणेशाच्या दर्शनापासून. तुंगनाथ मंदिराच्या वाटेवर असलेल्या या गणेश मंदिरात शिवभक्त यात्रा सुखरुप होण्याचा आशीर्वाद मागतात. अशानं भगवान गणेश स्वतः भक्तांसोबत येऊन त्यांना मार्गदर्शन करतात, असे स्थानिक सांगतात. या तुंगनाथ मंदिराची (Tungnath Temple) बांधणी स्वतः पांडवांनी आपल्या हातांनी केल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे.  

=======

हे देखील वाचा : ओखलेश्वर हनुमान मंदिरामध्ये घडला चमत्कार.. हनुमानाच्या मूर्तीने केली पापण्यांची उघडझाप

=======

हजारो वर्ष जुने असलेले हे मंदिर दरवर्षी काही महिने बर्फाखाली जाते, मात्र त्याच्या बांधकामावर काहीही परिणाम होत नाही. पांडवांनी अत्यंत भक्तींनी हे शिवाचे मंदिर बांधले असून या जागी त्यांनी तपर्श्चया केल्याची कथा आहे. पांडवांनी कुरुक्षेत्राच्या युद्धात केलेल्या नरसंहारामुळे भगवान शिव खूप संतापले होते.  त्यांना प्रसन्न करण्यासाठी पांडवांनी हे मंदिर बांधल्याचे सांगण्यात येते. आपल्या भावांच्या हत्येच्या पापापासून मुक्त होण्यासाठी पांडवांनी पाच केदार बांधले. त्यापैकी तुंगनाथ मंदिराला (Tungnath Temple)शिखरांचा स्वामी म्हणतात. 

या मंदिरात भगवान शिवाच्या हृदयाची आणि हातांची पूजा केली जाते. या मंदिराच्या पूजेची जबाबदारी येथील एका स्थानिक व्यक्तीकडे देण्यात आली आहे.  या स्थानाबाबत आणखी एक आख्यायिका सांगितली जाते. रावणाचा वध केल्यानंतर ब्रह्महत्येच्या शापातून मुक्त होण्यासाठी श्रीरामाने येथे भगवान शिवाची तपश्चर्या केली. तुंगनाथपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या चंद्रशिलेवर येऊन प्रभूरामचंद्रांनी तप केला होता. चंद्रशिला चौदा हजार फूट उंचीवर बांधलेली आहे. इथून बद्रीनाथ, नीलकंठ, पंचचुली, सप्तचुली, बंदरपंच, हाथी पर्वत, गंगोत्री आणि यमनोत्रीही दिसतात. हा सर्वच भाग अत्यंत सुंदर आहे.  

तुंगनाथ मंदिराचे दरवाजे मे महिन्यात उघडतात आणि दिवाळीच्या वेळी बंद होतात. साधारण भाऊबिजेनंतर या मंदिराचे दरबाजे बंद करण्यात येतात. यावेळी मंदिर परिसरात तुफान बर्फवृष्टी होते.  त्यामुळे अनेकवेळा मंदिर बर्फाखाली जाते.  हिवाळ्यात बर्फवृष्टी होत असल्याने शिवलिंग येथून चोपटा येथे आणले जाते. यादरम्यान ग्रामस्थ शिवाला ढोल वाजवून उत्साहाने चोपटा येथे नेतात. अक्षय्य तृतीयेला मंदिराचे दरवाजे पुन्हा भाविकांसाठी उघडण्यात येतात. तेव्हा येथे मोठा उत्सव साजरा केला जातो.  

तुंगनाथ मंदिरात (Tungnath Temple)जाण्यासाठी  चोपटा येथे जावे लागते. मंदिराची चढाई चोपट्यापासूनच सुरू होते. तीन तासांच्या पायी ट्रेकनंतर तुंगनाथ मंदिरापर्यंत पोहचता येते. तुंगनाथ मंदिरात चढण्यासाठी घोडा किंवा खेचराची सोय आहे. मात्र हे सर्व करतांना भाविकांनी आपला फिटनेसही विचारात घ्यावा लागतो. उबदार कपडे, मजबूत काठी आणि बर्फावर चालता येऊ शकतील असे शूज हा ट्रेक करताना आवश्यक असतात.

तुंगनाथचे शिखर हे तीन प्रवाहांचे उगमस्थान आहे. त्यातून अक्षकामिनी नदी तयार होते. अनेक ब्रिटीश अधिकारी या चोपटा व्हॅलीच्या प्रेमातच पडले होते.  ब्रिटीश राजवटीत हे अधिकारी या भागात फुलांचा बहर आला की भेट द्यायचे. एक ब्रिटीश अधिकारी ऍटकिन्सन म्हणाले होते की, ज्याने आपल्या आयुष्यात चोपटा पाहिला नाही, त्याचे आयुष्य व्यर्थ आहे. 

तुंगनाथ मंदिर (Tungnath Temple)आणि चोपटाला भेट देण्यासाठी सध्याचे महिने सर्वात उत्तम समजले जातात. कारण आता या चोपटा व्हॅलीमध्ये सर्वत्र रानफुलांचा बहर आलेला असतो  आणि बर्फाचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे ज्यांना ट्रेक करायचे आहे आणि जगातील सर्वात उंच शिवमंदिराचे दर्शन करायचे आहे, त्यांनी तुंगनाथ मंदिराला नक्की भेट द्यावी.  

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.