१० फेब्रुवारी १९१० रोजी, नारायण भागवत यांच्या घरी एका मुलीचा जन्म झाला. ती त्यांची पहिली मुलगी होती अत्यंत प्रेमाने त्यांनी तिचे नाव दुर्गा ठेवले. दुर्गा भविष्यात काय इतिहास घडवणार आहे हे त्यांना ठाऊक नव्हते.
गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झालेल्या दुर्गाबाईंनी (Durga Bhagwat) स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. पण जास्त दिवस त्यात सामील होऊ शकल्या नाहीत. पुढे अभ्यास सुरु ठेवण्याचा विचार करून त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे शिक्षण घेत असतातांनाही त्यांनी खादी वस्त्र वापरणे मात्र बंद केले नव्हते. पुढे त्या आपल्या संशोधनासाठी मध्यप्रदेशात गेल्या. आदिवासींच्या जीवनाचा अभ्यास करणं हा त्यांचा उद्देश होता. तिथलं जनजीवन बाईंनी जवळून अनुभवलं. तिथल्या लोकांसोबत त्यांच्या भावना, त्यांचं जगणं, त्यांचं कल्पनातीत दारिद्रय़ यांविषयी संवाद साधला.

त्या अनुभवाविषयी लिहिताना बाईंनी म्हटलंय, “फाशी जाणाऱ्या आदिवासीने अखेरची इच्छा म्हणून वरण भात, माशाचं कालवण मागवून घेतले आणि जेलरने ते आणून दिल्यानंतर स्वत: ते न खाता आपलं प्रेत घ्यायला येणाऱ्या आपल्या मुलालाच ते जेवण देण्यास सांगितले. दारिद्रय़ाचं हे असलं भयंकर रूप पाहिलं आणि मी पुष्कळ काही समजून गेले. मी भारतातला खरा माणूस पाहिला. संस्कृतीचा ‘श्री गणेश’ मी शिकले. भारताचाच नव्हे, तर जगाचा मूळ माणूस मी तिथेच पाहिला. तेव्हापासून निखळ माणूस मी इथेतिथे हुडकू लागले.”
मध्यप्रदेशात वास्त्यव्यात असतांनाच दुर्गाबाईंची प्रकृती खालावली. अन्नातून विषबाधा झाल्याचं समोर आलं. तब्ब्ल सहा वर्षे त्या अंथरुणाला खिळून होत्या. ज्याचा परिणाम म्हणजे त्यांना पीएचडी सोडावी लागली. पण अंथरुणावर असतानाही त्यांनी लिहिणे वाचणे काही सोडले नाही. इतकंच नाही तर अत्यंत बारकाईने त्यांचं निरीक्षण चालू असे. क्षणोक्षणी बदलणारं हवामान त्या काळजीपूर्वक पाहत असत, निसर्गात होणाऱ्या सूक्ष्म बदलांची त्या नोंद घेत, याच विषयावर पुढे त्यांनी ‘ऋतुचक्र’ हे पुस्त्तक लिहले. त्यांच्या अनेक प्रसिद्ध पुस्तकांतील ‘ऋतुचक्र’ हे महत्वाचं पुस्तक आहे. भारतातील सर्व ऋतूंच्या वैशिष्ट्यांवर या पुस्तकात विश्लेषण केले आहे. विशेषत: झाडे, वेली, पाना – फुलांवर, वेगवेगळ्या ऋतूंचा होणारा परिणाम कसा असतो याविषयीच सुरेख वर्णन यात वाचायला मिळते. ललित लेखनाचा उत्तम नमुना म्हणजे दुर्गाबाईंचं ‘ऋतुचक्र’.
१९७५ साली झालेल्या ५१व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दुर्गाबाईंनी भूषविले होते. कुसुमावती देशपांडेनंतर या पदावर पोहोचणाऱ्या त्या दुसऱ्या महिला. त्यावेळी त्यांनी इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीलाही कडाडून विरोध दर्शविला. जयप्रकाश नारायण यांच्या अटकेचा निषेध व्यक्त करण्यातही त्या मागे राहिल्या नव्हत्या. ज्याचा परिणाम म्हणून त्यांना कारागृहात धाडले गेले. १९७७ मध्ये आणीबाणी संपली तेव्हा दुर्गाबाईंनी कॉंग्रेसविरूद्ध प्रचार सुरू केला. आजीवन त्या काँग्रेसविरोधक जरी असल्या तरी इंदिरा गांधींना थोरोबद्दल प्रेम वाटते, त्याच्यावर त्यांनी कविता केली म्हणून दुर्गाबाईंनी इंदिरा गांधींचे कौतुकही केले होते. जनता पक्षाचे सरकार आल्यावर त्यांनी बाईंना महाराष्ट्रातील मंत्रिपद देऊ केले होते, पण ते माझे काम नाही म्हणून बाईंनी स्पष्ट नकार दिला. एवढेच नव्हे तर त्यांनी कोणत्याही सरकारकडून पुरस्कार, अनुदान किंवा सन्मान घेतले नाही. अत्यंत मानाचा असा ज्ञानपीठ पुरस्कार देखील बाईंनी नाकारला होता.
दुर्गाबाई आयुष्यभर अविवाहित राहिल्या. गौतम बुद्ध, आदि शंकराचार्यांना त्या आपले आदर्श मानीत. लोकसाहित्य, बालसाहित्य, बौद्धसाहित्य, इत्यादी विषयांत त्यांनी विपुल लेखन केले आहे. धर्म, परंपरा, लोककथा यांविषयीचा त्यांचा ‘पैस’ हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. महाभारत वाचल्यानांतर, अभ्यासल्यावर त्यांनी त्यावर आधारित ‘व्यासपर्व’ हे पुस्तक लिहिले. व्यासपर्वात द्रौपदीबद्दल लिहितांना बाईं म्हणतात, “प्रीती आणि रती, भक्ती आणि मैत्री, संयम आणि आसक्ती या भावनांच्या द्वंद्वातला सूक्ष्म तोल द्रौपदीच्या व्यक्तिमत्त्वात जसा आढळून येतो तसा मला अन्य कोणत्याही पौराणिक स्त्रीमध्ये आढळत नाही. द्रौपदीच्या मनाचे तडफडणे हे भारतातल्या विलक्षण सुंदर अशांततेचा मूलस्रोत आहे.”

दुर्गाबाईंनी स्वयंपाक आणि हस्तकलेवर आधारित लेख देखील लिहिले. त्यांच्या सर्व प्रकारांच्या लिखाणाला वाचक आणि समीक्षकांनी भरपूर दाद दिली आहे. त्यांना इंग्रजी, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, पाली या भाषाही चांगल्या अवगत होत्या. रवींद्रनाथ टागोरांच्या ‘गीतांजली’चे संस्कृतमध्ये अनुवाद करण्याचे कार्य दुर्गा भागवत यांनी केले. ७ मे २००२ रोजी दुर्गाबाईंचे निधन झाले. अशा या विदुषीला त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
शब्दांकन: धनश्री गंधे.