माणिक वर्मा हे नाव ऐकलं की आपल्याला आठवतो मंत्रमुग्ध करणारा, तरल, कोमल आवाज. त्यांच्या स्वभावाप्रमाणेच त्यांचा आवाजही अगदी शांत, सोज्वळ आणि हाच वागण्या बोलण्यातला साधेपणा त्यांच्या गाण्यात सहज उतरत असे.
माणिक बाईंनी अनेक भावगीते, भक्तीगीते गायली. त्यांच्या गायकीची सुरुवात झाली ती शास्त्रीय संगीतापासून. हिराबाई बडोदेकर यांच्याकडे माणिक बाईंनी किराणा घराण्याच्या गायकीचा अभ्यास केला. त्यानंतर सुरेशबाबू माने, पं. जगन्नाथ बुवा पुरोहित, पं. भोलानाथ भट्ट अशा अनेक गुरूंकडे आग्रा आणि ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचाही त्यांनी अभ्यास केला.
ग दि मां ची लेखणी आणि बाबूजी अर्थात सुधीर फडके यांचं संगीत असलेल्या गीतरामायणातील गाणी माणिक वर्मा (Manik Varma) यांच्या आवाजात होती. माणिक वर्मा यांनी एकलव्याचा निष्ठेने बालगंधर्वांची गायकी, त्यांची गायन शैली आत्मसात केली. पण याच बालगंधर्वांनी जेव्हा माणिक वर्मा यांना कान्होपात्रा या पुनरुज्जीवित करण्यात येणाऱ्या नाटकात कान्होपात्रेच्या भूमिकेसाठी विचारले असता त्यांनी नकार दिला. याचं कारण त्यावेळी त्यांच्या मुली लहान होत्या आणि त्याचबरोबर नाटकात काम करायचं नाही हे माणिक वर्मा यांनी आधीच ठरवलं होतं.
विजय पताका श्रीरामाची, अमृताहूनी गोड, कौसल्येचा राम, ही आणि अशी अनेक भक्तीगीते माणिक वर्मा यांनी गायली. इतकंच नव्हे तर घननिळा लडिवाळा, सावळाच रंग तुझा, हसले मनी चांदणे आणि इतर अनेक भावगीते त्यांनी गायली, त्याच बरोबर त्यांच्या गायनाने त्यांनी अनेक नाट्यगीतेही अजरामर केली. माणिक बाईच्या आवाजात पंजाबी ढंगाची फिरत होती आणि लखनवी ठुमरीचा बाज होता.
माणिक वर्मा यांना 1974 साली मानाचा असा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. याच बरोबर माणिक वर्मा यांच्या नावाने अनेक पुरस्कार देण्यात येतात. 2002 साली नौशाद यांना माणिक वर्मा पुरस्कार दिला होता. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पुणे शाखा दरवर्षी संगीत क्षेत्रातील एका व्यक्तीला माणिक वर्मा पुरस्कार देते. तसेच स्वरानंद प्रतिष्ठान हे शास्त्रीय किवा सुगम संगीताच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘बहुस्पर्शी गायिका माणिक वर्मा’ पुरस्कार देते, पुणे भारत गायन समाज हा माणिक वर्मा यांच्या स्मरणार्थ माणिक वर्मा हा पुरस्कार देतो. २०१३साली सुनीता खाडिलकर यांना हा पुरस्कार मिळाला होता.
माणिक वर्मा यांना चार मुली; राणी वर्मा, भारती आचरेकर, वंदना गुप्ते आणि अरुणा जयप्रकाश. यातील राणी वर्मा या गायन क्षेत्रात आहेत, भारती आचरेकर या ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री आहेत, तर वंदना गुप्ते या नाट्य आणि चित्रपट अभिनेत्री आहेत. आपापल्या क्षेत्रात यांनी उत्तम नाव कमावलं आहे. माणिक वर्मा यांनी शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भावगीत, भक्तीगीत हे सगळे गायनप्रकार गात असतांनाच पुढचं पाऊल या राजा परांजपे दिग्दर्शित चित्रपटात जाळीमंदी पिकली करवंद ही लावणीसुद्धा गायली होती.
माणिक वर्मा म्हणजे मराठी संगीताला मिळालेलं अनमोल रत्न होतं. अशा या माणिक बाईंचा आज जन्मदिवस. आज जरी त्या आपल्याबरोबर नसल्या तरी त्यांचं गाणं हे कायम त्यांची आठवण करून देतं.
– सई मराठे