भारतीय क्रिकेट संघ १५ डिसेंबरला भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना झाला. आता २६ डिसेंबरपासून आफ्रिकेत भारताची ३ सामन्यांची कसोटी मालिका रंगेल. भारताची दक्षिण आफ्रिकेतील ही आठवी कसोटी मालिका असेल.
वर्णद्वेषी धोरणामुळे १९७० नंतर दक्षिण आफ्रिकेला कसोटी क्रिकेटमधून अर्धचंद्र दिला गेला, पण त्यापूर्वी आशियाई संघ आणि वेस्ट इंडिज सोडून इतर संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामने खेळत असत. १९९१ मध्ये वर्णद्वेषी धोरणाचा त्याग केल्यावर दक्षिण आफ्रिकेचे कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले. त्यांनी हे पुनरागमन साजरे केले ते भारताचा दौरा करून. या दौऱ्यात ३ एकदिवसीय सामने झाले.
त्यानंतर १९९२ च्या अखेरीस भारतीय संघ प्रथमच दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामने खेळण्यासाठी दाखल झाला. अझरुद्दीन भारताचा कर्णधार होता तर केप्लर वेसल्स आफ्रिकेचा कप्तान होता. या मालिकेपासून भारताच्या आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकांचा संक्षिप्त आढावा घेणे येत्या मालिकेच्या पार्श्वभूमीवर उचित ठरेल.
१९९२-९३ ची मालिका
चार सामन्यांची ही मालिका आफ्रिकेने १-० अशी जिंकली.डर्बन येथे भारत आफ्रिकेविरुद्धचा आपला पहिला कसोटी सामना खेळला. याच कसोटीत प्रवीण आमरेने पदार्पणातच शतक (१०३ धावा) मारण्याचा भीमपराक्रम केला. तो भारफातर्फे आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. प्रवीण नंतर याच मालिकेत सचिन तेंडुलकर व कपिल देव यांनी सुद्धा शतके ठोकली.
याच दौऱ्यात सचिन तेंडुलकर हा तिसऱ्या पंचाने धावबाद ठरवलेला क्रिकेटच्या इतिहासातील पहिलाच फलंदाज ठरला. अनिल कुंबळेने जोहान्सबर्ग कसोटीत दुसऱ्या डावात ४४ षटकात केवळ ५३ धावा देऊन ६ बळी घेत आपल्या उज्वल कारकिर्दीची जणू मुहूर्तमेढ रोवली. अनिल आफ्रिकेविरुद्ध एका डावात पाचवा अधिक विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. श्रीनाथ याच मालिकेत कपिलचा गोलंदाजीतील वारसदार म्हणून प्रकाशात आला.
१९९६-९७ ची मालिका
ही ३ सामन्यांची मालिका आफ्रिकेने २-० अशा फरकाने जिंकली. पहिल्या सामन्यात दुसऱ्या डावात भारताचा ६६ धावात धुव्वा उडाला त्यातील नाबाद २७ धावा एकट्या राहुल द्रविडच्या होत्या. दुसऱ्या केप टाऊन कसोटीत पहिल्या डावात ५ बाद ५८ अशा घसरगुंडीनंतर सचिन व अझर यांनी झंझावाती फलंदाजी करून २२२ धावांची केलेली भागीदारी अविस्मरणीय होती. डोनाल्ड, कलूस्नर, मॅकमिलन या द्रुतगती गोलंदाजांची या दोघांनी जी पिटाई केली ती केवळ अवर्णनीय होती. सचिनने १६९ धावा ठोकल्या, तर अझरने ११५.
याच मालिकेत तिसऱ्या कसोटीत राहुल द्रविडने आपले कसोटीतील पहिलेवहिले शतक (१४८ धावा) झळकावले. दुसऱ्याही डावात त्याने ८१ धावा काढल्या. ३५६धावा विजयासाठी हव्या असताना आफ्रिकेची स्थिती ७ बाद ९५अशी होती, पण कालीनानचे शतक व क्लू स्नरचे अर्धशतक यांच्या जोरावर आफ्रिकेने कसोटी अनिर्णित राखली. हातातोंडाशी आलेला विजय हुकल्यामुळे सचिन अक्षरशः रडला असे त्याचे संघ सहकारी सांगतात.
२००१-०२ ची मालिका
ही अधिकृत दोन सामन्यांची मालिका आफ्रिकेने १-० अशी जिंकली.पहिल्याच सामन्यात सेहवागने पदार्पणातच शतक (१०५ धावा) ठोकून आपल्या आगमनाची वर्दी दिली. त्याने शतकवीर सचिनबरोबर मिनिटाला धाव गतीने द्विशतकी भागीदारी केली. सचिनने १५५ धावा काढल्या. ही मालिका वादग्रस्त ठरली ती मॅच रेफ्री माईक डेनिस याच्या काही निर्णयांमुळे. त्यांनी सचिन व राहुल यासारख्या खेळाडूंवर चेंडू कुरडतडल्याचा आरोप केला आणि त्यांना शिक्षा ठोठावली. भारताने याचा निषेध म्हणून तिसरी कसोटी खेळण्यास नकार दिला. ती कसोटी झाली पण अनधिकृत ठरवली गेली त्यामुळे रेकॉर्ड्समध्ये तिची नोंद झाली नाही.
२००६-०७ ची मालिका
ही मालिका आफ्रिकेने २-१ अशा फरकाने जिंकली. जोहान्सबर्गमधील पहिली कसोटी १२३ धावांनी जिंकून भारताने आफ्रिकन भूमीवरील आपला पहिला विजय नोंदवला. ही कसोटी गाजवली ती श्रीशांतने. त्याने पहिल्या डावात ४० धावात ५ विकेट्स काढल्याने आफ्रिकेचा डाव ८४ धावात गडगडला. दुसऱ्या डावात सुद्धा श्रीशांतने ३ गडी बाद करून भारताच्या विजयाचा मार्ग प्रशस्त केला. गांगुलीने संघात पुनरागमन करताना दोन्ही डावात अर्धशतके काढली. भारत तिसरा सामनाही जिंकू शकला असता पण कुंबळे/हरभजनची फिरकी शेवटच्या दिवशी चालली नाही.
२०१०-११ ची मालिका
ही मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. पहिल्या कसोटीत पहिल्या डावात भारताचा १३६ धावात खुर्दा उडाला. भारत पहिल्या डावात ४८४ धावांनी मागे पडल्यावर दुसऱ्या डावात गौतम गंभीर, सचिन तेंडुलकर व धोनी यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने ४५९ धावांचा पल्ला गाठला. सचिनने नाबाद १११ धावा काढल्या, पण तरी भारताचा डावाने पराभव टळला नाही. दुसऱ्या कसोटीत भारताने वचपा काढला व आफ्रिकेचा ८७ धावांनी पराभव केला. या कसोटीत जलद गोलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर स्पिनर हरभजनने पहिल्या डावात ४ व सामन्यात एकूण ७ बळी मिळवले. लक्ष्मणने दुसऱ्या डावात लाजबाब ९६ धावा फटकावल्या. तिसऱ्या अनिर्णित कसोटीत पहिल्या डावात सचिनने आपले कसोटी क्रिकेटमधील अखेरचे शतक (१४६ धावा) नोंदवले.
२०१३-१४ ची मालिका
ही दोन सामन्यांची मालिका आफ्रिकेने १-० अशी जिंकली.पाहिल्या कसोटीत कोहलीने पहिल्या डावात शतक (११५धावा) झळकावले, तर दुसऱ्या डावात त्याचे शतक थोडक्यात हुकले (९६ धावा). पुजाराने दुसऱ्या डावात शतक केले (१५३ धावा) चौथ्या डावात आफ्रिकेने ४५७ धावांचे लक्ष्य जवळजवळ गाठले होते. सामना संपला तेव्हा आफ्रिकेने ७ बाद ४५० धावापर्यंत मजल मारली होती. अश्विन या डावात पूर्ण निष्प्रभ ठरला. दुसऱ्या कसोटीत भारत हरला पण मुरली विजय(९७ धावा) आणि अजिंक्य राहणे(९६ धावा) यांची थोडक्यात हुकलेली शतके मनाला चुटपुट लावून गेली.
२०१७-१८ ची मालिका
ही मालिका सुद्धा आफ्रिकेनेच २-१ अशी जिंकली. याच सामन्याद्वारे जसप्रीत बुमराहने कसोटीत पदार्पण केले. पहिल्या दोन कसोटीत भारत चांगली लढत देऊन हरला. पहिल्या कसोटीत हार्दिक पंड्याने स्टेन, मॉर्केल, फिलँडर यांच्यावर प्रतिहल्ला चढवून ९३ धावा काढल्या.तर दुसऱ्या कसोटीत विराट कोहलीने पहिल्या डावात शतक (१५३ धावा) काढले.तिसरी कसोटी भारताने ६३ धावांनी जिंकली.बुमराहने पहिल्या डावात तर शमीने दुसऱ्या डावात प्रत्येकी पाच बळी घेऊन भारताच्या विजयात मोठे योगदान दिले.
हे ही वाचा: भारत-न्यूझीलंड मालिका २०२१- भारताने काय कमावले व काय गमावले?
आफ्रिकेतील जलद व उसळत्या खेळपट्ट्यांवर भारत आत्तापर्यंत फक्त ३ सामने जिंकू शकला आहे. दक्षिण आफ्रिका हाच एकमेव देश आहे जिथे भारत आजपर्यंत मालिका जिंकू शकलेला नाही. सध्याचा आफ्रिकन संघ स्मिथ, मॉर्केल, स्टेन, फिलँडर, इम्रान ताहीर, हाशिम आमला यांच्या निवृत्तीमुळे कमकुवत झाला आहे. याचा फायदा घेऊन भारत आफ्रिकेत पहिला मालिका विजय मिळवणार का, याबद्दल उत्सुकता आहे. भारतीय संघाला शुभेच्छा.
– रघुनंदन भागवत
(लेखक क्रीडा अभ्यासक आहेत)
टीप: या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.