१९७१ हे वर्ष भारतीय क्रिकेटमध्ये नवीन दशकाच्या पाऊलखुणा घेऊन आले. वर्षाच्या सुरवातीलाच विजय मर्चन्ट यांच्या कास्टिंग वोट मुळे भारतीय क्रिकेटमध्ये नुसता नेतृत्व बदलच झाला नाही, तर चक्क सामाजिक स्थित्यंतर झाले. जवळ जवळ एक दशक असलेले नवाबी नेतृत्व अस्तंगत होऊन एका नवीन मध्यमवर्गीय नेतृत्वाचा उदय झाला.
१९७१ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कर्णधार निवडताना विजय मर्चन्ट यांनी मन्सूर अली खान ऐवजी मुंबईकर अजित वाडेकर यांना पसंती दिली आणि एका नव्या युगाची मुहूर्तमेढ केली. वाडेकरांच्या दिमतीला दोन तीन अपवाद वगळता पूर्णपणे नव्या दमाचा संघ देण्यात आला.
हा संघ वेस्ट इंडिजला पोहोचला त्यावेळी वेस्ट इंडिज कप्तान गॅरी सोबर्स यांनी जमेकाला भारतीय संघाचे स्वागत करताना वाडेकरांना हिणवले की, तुम्ही अजून एक पराभव स्वीकारण्याची तयारी करूनच आला असाल. हा किस्सा स्वतः वाडेकरांनी सांगितला होता.
पण त्याच सोबर्सचा नक्षा उतरवून भारताने विंडीजवरील पहिला कसोटी विजय आणि मालिका विजय विंडीजच्या भूमीवर साकारला. त्या पाठोपाठ इंग्लंड मध्ये इंग्लंडला प्रथमच पाणी पाजून इतिहास घडवला आणि वाडेकरांचा डंका सर्वत्र झाला व त्यांचे नाव भारतीय क्रिकेटच्या इतिहासात यशस्वी कर्णधार म्हणून कायमचे कोरले गेले.
अजित वाडेकर यांची आठवण होण्याचे कारण म्हणजे १ एप्रिल (१९४१) हा त्यांचा जन्मदिवस.
शालेय जीवनात अजित वाडेकर हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात. त्यांना मॅट्रिकच्या परीक्षेत गणितात पैकीच्या पैकी गुण मिळाले होते. त्यांना इंजिनीयरिंगला जाण्याची इच्छा होती, पण दैव योगाने ते रुईया कॉलेजमध्ये असताना राखीव खेळाडूच्या भूमिकेतून क्रिकेटमध्ये शिरले.
ते शालेय जीवनात क्रिकेट खेळले नव्हते. ते बॅडमिंटन खेळत असत. थोड्याच अवधीत ते कॉलेजच्या संघाचे तसेच विद्यापीठाच्या संघाचे कर्णधार बनले आणि काही काळातच मुंबईच्या रणजी संघाचे सदस्य झाले. १९५८-५९ मध्ये त्यांनी रणजी स्पर्धेत पदार्पण केले. रणजी स्पर्धेत त्यांनी धावांच्या राशी ओतायला सुरुवात केली.
म्हैसूर विरुद्ध सामना चालू असताना त्यांचे वडील इस्पितळात होते. आदल्या दिवशी वाडेकर नाबाद होते तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की, तुम्ही जर उद्या 300 धावा केल्या तर तीच मी माझी फी समजेन. आश्चर्य म्हणजे वाडेकरांनी त्रिशतक काढून डॉक्टरांचा विश्वास सार्थ ठरवला.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी त्यांना तब्बल आठ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. दरम्यान ते भारतीय स्टेट बँकेत अधिकारी म्हणून निवडले गेले. मनोहर हर्डीकरांच्या निवृत्तीनंतर त्यांनी मुंबई संघाचे नेतृत्व स्वीकारले. त्यांच्या नेतृत्वाखाली रणजी स्पर्धा जिंकण्याचा सिलसिला १९७३ सालापर्यंत चालू राहिला.
अशा पद्धतीने गॅरी सोबर्सच्या टीकेला अजित वाडेकर यांनी दिले प्रत्युत्तर –
१९६६-६७ मध्ये भारतातील विंडीजविरुद्धच्या मालिकेत मुंबई कसोटीत त्यांना भारताची कॅप मिळाली. या पहिल्या कसोटीची भेट म्हणून गॅरी सोबर्सने त्यांना नवीन कोरे बूट स्वतःच्या स्वाक्षरीसकट दिले होते कारण सरावाच्या वेळी सोबर्सने पाहिले की, वाडेकरांचे बूट फाटले होते.
पहिल्याच डावात भोपळा काढल्यानंतर तंबूत परतताना सोबर्स वाडेकरांना म्हणाला, “तरुण मुला बूट बदलले तरी नशीब बदलले नाही.” दुसऱ्या सामन्यातही वाडेकर अपयशी ठरले. पण मद्रास कसोटीत दुसऱ्या डावात हॉल, ग्रिफिथ सोबर्स यांच्यासमोर काढलेल्या ६७ धावांनी त्यांना तारले आणि त्यांनी भारतीय संघातील स्थान अबाधित राखले.
१९६७ मध्ये भारत इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला व याच मालिकेत अजित वाडेकर भरवशाचे फलंदाज म्हणून नावारूपास आले .त्यांनी एकूण तीन अर्धशतके मारली. लीड्स कसोटीत फॉलो ऑन मिळाल्यावर भारताने चिवट झुंज देऊन दुसऱ्या डावात ५१० धावा केल्या. यात वाडेकरांचा वाटा ९१ धावांचा होता.
१९६७-६८ मध्ये भारत ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडच्या जोड दौऱ्यावर गेला. यात मेलबर्न कसोटीत वाडेकरांचे शतक केवळ एक धावेने हुकले. आदल्या दिवशी ते ९७ धावांवर नाबाद होते. मला आठवते की, मी वाडेकरांपेक्षा जास्त बेचैन होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मराठी बातम्या मोठ्या अपेक्षेने ऐकल्या आणि वाडेकर ९९ धावांवर बाद झाल्याचे ऐकले तेव्हा वाडेकरांना झाले नसेल, एवढे दुःख मला झाले होते. मात्र खुद्द ब्रॅडमन यांनी वाडेकरांच्या या खेळीबद्दल त्यांची पाठ थोपटली. या हुकलेल्या शतकाची आठवण सांगताना ते म्हणाले की, ते आदल्या दिवशीच शतक पूर्ण करू शकले असते, पण रुसी सुरती दर अष्टकाच्या (त्यावेळी ऑस्ट्रेलियात आठ चेंडूची एक ओव्हर असे) शेवटच्या चेंडूवर धाव घेत होता, त्यामुळे त्यांना बॅटिंगची संधी मिळत नव्हती.
न्यूझीलंड विरुद्ध मालिकेत वाडेकरांची फलंदाजी बहरली वेलिंग्टन कसोटीत त्यांनी आपले पहिले व एकमेव शतक साजरे केले. त्यांनी १४३ धावा काढल्या. त्यापूर्वी दुनेदिन कसोटीतही दोन्ही डावात अर्धशतके काढून संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. अत्यंत थंड वातावरणात बोचऱ्या वाऱ्यासोबत न्यूझीलंडच्या दर्जेदार वेगवान माऱ्यासमोर भारताने ही मालिका ३-१ फरकाने जिंकली. हा भारताचा परदेशातील पहिला मालिका विजय होता. वाडेकरांनी भारतातर्फे सर्वाधिक ३२८ धावा करून या विजयात मोठा वाटा उचलला.
१९६९ च्या हिवाळ्यात बिल लॉरीचा ऑस्ट्रेलियन संघ भारतात आला. या मालिकेत वाडेकरांनी एकूण ३ अर्धशतके केली. तिसऱ्या दिल्ली कसोटीत फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर दुसऱ्या डावात नाबाद ९१ धावा करताना बेदी व विश्वनाथाच्या साथीने त्यांनी भारताला सात विकेट्सनी सामना जिंकून दिला .
१९७१ च्या वेस्ट इंडिजच्या विजयी दौऱ्यात वाडेकरांचे नेतृत्वगुण उठून दिसले.त्यांनी विंडीजला पहिल्याच कसोटीत फॉलो ऑन दिला, तर दुसरी कसोटी चक्क जिंकली. यानंतरच्या इंग्लंड दौऱ्यात मात्र वाडेकरांनी आपल्या विंडीजमधील फलंदाजीतील अपयशाची भरपाई केली. लॉर्ड्सच्या पहिल्या कसोटीत पहिल्या डावात त्यांनी ८५ धावांची आक्रमक खेळी केली. तिसऱ्या ओव्हल कसोटीत दोन्ही डावात अनुक्रमे ४८ आणि ४५ धावा करून भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.
१९७२-७३मध्ये टोनी लुईसचा दुय्यम इंग्लिश संघ भारतात आला. ही पाच सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकून वाडेकरांनी आपल्या नेतृत्वाखाली मालिका विजयाची हॅट्ट्रिक साधली. यानंतरचा १९७४ चा इंग्लंड
अशा पद्धतीने गॅरी सोबर्सच्या टीकेला अजित वाडेकर यांनी दिले प्रत्युत्तर
दौरा मात्र भारतासाठी व वाडेकरांसाठी अत्यंत क्लेशदायी ठरला. भारताने थंड हवामान व हिरव्यागार खेळपट्ट्यांवर मालिका ३-० अशा फरकाने तर गमावलीच पण लॉर्ड्सच्या दुसऱ्या डावात सर्व बाद ४२ धावांची नामुष्कीही पत्करली. वाडेकार सहा डावात मिळून १०० धावा सुद्धा जोडू शकले नाहीत. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, वाडेकर ही संबंध मालिका बोट मोडलेले असताना खेळले.
भारतात परतल्यावर पराभवाचे खापर त्यांच्यावर फोडण्यात आले. त्यांना पश्चिम विभागाच्या संघामधून सुद्धा वगळण्यात आल्यावर त्यांनी निवृत्ती पत्करली .
वाडेकर एकूण ३७ कसोटी सामने खेळले त्यात त्यांनी एकूण २११३ धावा ३१.०७ च्या सरासरीने काढल्या. ते उत्कृष्ट क्ष्रेत्ररक्षक होते. त्यांनी कसोटीत एकूण ४६ झेल टिपले. मला अजूनही त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या रेडपाथचा तसेच कोलकत्ता कसोटीत अंडरवूडचा सूर मारून टिपलेला झेल आठवतो. ते स्लिप तसेच शॉर्टलेग मधील तरबेज क्षेत्ररक्षक होते आणि आपल्या चपळ फिल्डिंगमुळे फिरकी मार्याची धार त्यांनी वाढवली होती.
====
हे देखील वाचा: क्रिकेटच्या दुनियेतला अवलिया ‘इंजिनियर’!
====
वाडेकरांनी इनमीन १६ कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले. ज्या काळात एखादा सामना जिंकायची जिथे मारामार होती तेथे सलग तीन मालिका जिंकणे हा भीम पराक्रम होता. वाडेकर स्वभावाने अत्यंत शांत होते. ओवलवर १९७१ मध्ये अबिद अलीने विजयी चौकार मारला तेव्हा ते गाढ झोपले होते. एकनाथ सोलकरने आठवण सांगितली की, ते स्वतः बाद झाल्यावर कधी सामना बघत बसत नसत. ते मस्तपैकी सिगार शिलगावून पुस्तक वाचत असत. मैदानावर काय चालले आहे, ते सोलकर त्यांना सांगत असे. ते काहीसे विसराळू पण होते. एकदा बस लगेच मिळाली म्हणून ते क्रिकेटचे किट न घेताच मॅच खेळायला गेले.
वाडेकर निवृत्त झाल्यावर त्याना क्रिकेट बोर्डाने बेनेफिट मॅच दिली. याच सामन्यात लिलीचा चेंडू जावेद मियाँदादच्या कपाळावर लागला होता. वाडेकर हे आक्रमक डावखुरे फलंदाज होते. ते सर्व प्रकारचे फटके खेळत. त्यांचा कव्हर ड्राईव्ह, पूल आणि हुक हे फटके प्रेक्षणीय असायचे. त्यांच्यात डावखुऱ्या फलंदाजांचा नैसर्गिक रुबाब होता.
====
हे देखील वाचा: दी ॲशेस! तब्बल १३९ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या ॲशेस मालिकेची रंजक कहाणी
====
वाडेकरांनी स्टेट बँकेतील नोकरी अतिशय प्रामाणिकपणे केली व ते वरिष्ठ पदावरून निवृत्त झाले. मुंबई क्रिकेट अससोसिएशनमध्ये ते सक्रिय होते.१९९२ ते १९९४ दरम्यान ते अझरुद्दीनच्या भारतीय संघाचे पूर्ण वेळ प्रशिक्षक होते आणि येथे सुद्धा त्यांनी यशस्वी प्रशिक्षक म्हणून ठसा उमटवला. ते काही काळ भारतीय क्रिकेट निवडसमितीचे अध्यक्ष होते.
त्यांना साहित्य, कला, संस्कृती यांची आवड होती. झी टीव्ही च्या नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमाला निमंत्रित म्हणून ते सपत्नीक हजेरी लावायचे. असे हे सुसंस्कृत, सुविद्य आणि सभ्य व्यक्तिमत्व दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी वयाच्या ७७ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेले. पण त्याच दरम्यान भारताचे माजी पंतप्रधान अटलजी यांचेही निधन झाल्याने वाडेकराना त्यांना साजेसा निरोप रसिक देऊ शकले नाहीत हे दुर्दैव. त्यांच्या निधनामुळे भारताच्या क्रिकेट इतिहासातील एक सोनेरी पान गळून पडले.
– रघुनंदन भागवत