Home » जिथे सागरा धरणी मिळते – भाग २

जिथे सागरा धरणी मिळते – भाग २

by Correspondent
0 comment
Ganpatipule | K Facts
Share

आंजर्ले, श्रीवर्धन’ दिवेआगर, हरिहरेश्वर, दिघी, कर्दे, धोपावे, दाभोळ, गुहागर, रत्नागिरी, गणपतीपुळे (Ganpatipule) अनेक पर्यटन स्थळं कोकण किनारपट्टीवर आहेत आणि अस्सल कोकणी माणूस इथे वास्तव्य करून आहे. उच्चभ्रू समाज इथे जास्त संख्येने आहे. राजापुरपासून पुढे तळकोकण म्हणावं असा विभाग सुरु होतो.

कणकवली, वैभववाडी जवळचं कुणकेश्वर हे शंकराचं महात्म्य असणारं ठिकाण तसंच पुढे मालवण सिंधुदूर्ग वेंगुर्ले ही मोक्याची समुद्री ठिकाणं आता पर्यटन विकासाला हातभार लावत स्वतः ही समृद्ध होतायत. पेडणे हे महाराष्ट्रातील शेवटचं सीमेवरचं गाव. डच व पोर्तुगीजांच्या पाऊलखुणा आजही मिरवणारं गोवा (Goa) हे किती छोटंसं राज्य आहे, पण केवळ तेथील समुद्रकिनारे हा आजही नुसते भारतीयच नव्हे तर परदेशी पर्यटकांचा आकर्षणाचा विषय आहे.

सर्वात जास्त सागरी पर्यटन असलेलं गोवा येथे मीरामार बीच, कलंगुट बीच व तत्सम अनेक समुद्रकिनारे गोव्यात आहेत. तिथेही उंची मदिरा, मासे, मटण यासाठीच लोक जातात. आमचे बाबा एक संस्कृत सुभाषित म्हणत असत. “मनो मधुकरो मेघो मानिनी मेनी मरुत् । मा मदो मर्कटो मत्स्यो मकारा दश चंचल:॥

Kunkeshwar Temple - Devgad, Sindhudurg
Kunkeshwar Temple – Devgad, Sindhudurg

वर उल्लेखलेल्या मकारांवरुन तो श्लोक आठवला.

कर्नाटक राज्य आणि समुद्रकिनारे असं समीकरण मांडत काही व्यावसायिक पर्यटन कंपन्यांनी चक्क “कोस्टल कर्नाटक” या नावाने सहल आखली आहे. कारवार पासून ते थेट मंगलोरपर्यंतचा समुद्री पट्टा यात समाविष्ट होतो. कारवारला तर रवींद्रनाथ टागोर यांच्या नावाने एक मोठी चौपाटी आहे. ते बंगालहून कधी तिथे कर्नाटकात गेले असतील हा एक अभ्यासाचाच विषय होईल. गोकर्ण म्हणजे तर दक्षिण काशी. रावण लंकेत शिवलिंग स्थापन करण्यासाठी शिवपिंडी नेत असताना नारद व बालगणपती यांनी कट कारस्थान करून ती शिवपिंडी जमिनीवर टेकवतात. शंकराने लंकेत पोचेपर्यंत कुठे ही शिवलिंग खाली जमिनीवर न ठेवण्याचा इशारा दिला होता. पण तसे घडते तर रावणाला अमरत्व प्राप्त होण्याचा धोका ध्यानात घेता गणपती व नारदाने खेळी खेळून ती पिंडी जमिनीवर टेकवली.

रावणाने ती उचलायचा प्रयत्न करताना तिला गाईच्या कानाचा आकार मिळाला व गोकर्ण महाबळेश्वर असे त्या स्थानाला नाव मिळाले. इथेच जवळ एक टेकडी आहे. त्यावरून समुद्रकिनारा अतिशय मोहक दिसतो. विशेष म्हणजे एका ठिकाणी तो सागरकिनारा चक्क ॐ आकाराच्या सारखा  तयार झालेला दिसतो. त्याला ओम् बीच असंच म्हणतात. इथून ६०/७० कि.मी पुढे मुर्डेश्वर या ठिकाणी अप्रतिम असा शिवाचा १० मजली उंच पुतळा प्रस्थापित केलेला आढळतो. निळ्या रंगात रंगवलेला पुतळा व हे स्थान जरी मानव निर्मित आहे तरी खुप सुरेख आहे. मागे अथांग सागर, दूरवर नजर जाते तिथवर पाणीच पाणी आणि लाटेवर हेलकावणारे छोटे मचवे आणि नौका.

Sri Mahabaleshwar Temple, Gokarna
Sri Mahabaleshwar Temple, Gokarna

संध्याकाळी गेलात तर संध्यारंग न्याहाळत अनुभवलेला सूर्यास्त. मरवंथे, भटकल, उडुपी असे कर्नाटकातले सागर किनारे पार करत आपण केरळ मधे शिरतो ते कासारगोड नावाच्या गावापासून. त्यात कोझीकोड हे एक केरळच्या उत्तर दिशेला असलेलं महत्वाचं सागरी ठिकाण. इथेच आमची वायनाड सहलीची पहिली संध्याकाळ व्यतीत केली आम्ही उभे होतो तो हाच कोझीकोड चा सागर किनारा. पुढे कोचीन हे तर सागर जंक्शन म्हणावं इतकं महत्वाचं स्थान. इथून पश्चिमेला आता भारताच्याच अक्षांश रेखांशात येणारी लक्षद्वीपची बेटं. आणि पूर्वेला संपूर्ण हिरवा डोंगराळ केरळचा जंगली प्रदेश. कोट्टायमच्या समुद्रकिनाऱ्यालगत पुढे लगेचच बॅकवाॅटर्स आत येऊन तयार झालेला खाडी प्रदेश व त्यावर वसलेलं कुमाराकोम. दोन तीन दिवसांच्या विश्रांतीसाठी अत्यंत लायक ठिकाण. कुमाराकोमचा पल्याडचा तीर म्हणजे अँलेप्पी. पुढे त्रिवेंद्रमला तामिळनाडू ची पश्चिम हद्द सुरु होते. इथला मानाचा केंद्रबिंदू म्हणजे कन्याकुमारी. (Kanyakumari) जगभर सर्वत्र अथांग सागर पसरलाय. पण तीन दिशांनी तीन समुद्र एकत्रित येऊन संगम करतात तो फक्त माझ्या भारतात.

पश्चिमेहून येणारा अरबी समुद्र, समोरून लंकेच्या दिशेने येणारा हिंदी महासागर व पूर्वेच्या विभागातून येणारा बंगालचा उपसागर. तीन बाजूनी तीन समुद्र माझ्या भारतमातेचे इथे नित्य क्षणोक्षणी पाय धुताना दिसतो… इथे उभं राहून सागराच्या कातळांवर धडकुन फुटणा-या लाटा पहाताच सावरकरांचे शब्द नकळत ओठावर रुंजी घालतात. भूमातेच्या चरणतला तुज धूता। मी नित्य पाहिला होता ॥

Kanyakumari
Kanyakumari

बरोबर पौर्णिमा धरून आपण कन्याकुमारीला गेलो तर पश्चिम क्षितीजाची सूर्यास्ताची संध्या अनुभवतानाच पूर्वेला किंचित काळोखी कडा दाटतानाच आपली धवलप्रभा उजळत तिथे चंद्रोदय होताना दिसतो. अतिशय मनोरम असा देखावा शहरी भागात केव्हाच नाही बघायला मिळणार. उद्याच्या दिवसाची सकाळ हेच दृश्य उलटपक्षी घेऊन येतो. पश्चिमेचा चंद्रास्त आणि पूर्वेचा अरुणोदय. किती समृद्ध आहोत नैसर्गिक दृष्ट्या आपण. ते आपणच टिकवायला हवं. आपलं भाग्य आहे हे मोठं. इथून रेल्वेने आता कन्याकुमारीपर्यत ते रामेश्वर असा प्रवास करता येतो. पूर्वी गाडी नव्हती. रस्त्याने जावं लागे. रामेश्वरचा समुद्र म्हणजे प्रत्यक्ष राम सीतेचा निवास असलेली पवित्र जागा. सेतू बंधनात नंतर रावण युद्धात यश कीर्ती संपादन करण्यासाठी राम सीतेने इथे शिवाराधना केली. ज्योतिर्लिंग स्थापन केले. हनुमान व सर्व वानरगण इथे होते तेव्हा. इथूनच आणखी पूर्वेला अंदमान निकोबार आहेत. समुद्रातील भारतीय बेटं. मद्रासहून इथे जायला बोटी सुटतात. अडीच दिवसांचा प्रवास करून अंदमान -पोर्ट ब्लेअरच्या किनाऱ्यावर पोचता येतं. अन्यथा सर्वच महत्वाच्या शहरांतून थेट विमानसेवा सोपी आहे. तीन तासात अंदमान. आता याच पूर्वेकडील किनारपट्टीवरून वरच्या दिशेला सरकत गेलो तर महत्वाचं प्रसिद्ध स्थळ म्हणजे पाँडिचरी. योगी अरविंद घोष यांचा आश्रम आणि सागरतीर ही महत्वाची आकर्षणं. आणखी वरती मग महाबलीपुरम् कांचीपुरम् ही नगरं म्हणजे उत्तम पर्यटन स्थळं आहेत.

मद्रास किनारा तर दाक्षिणात्य चित्रनिर्मिती करता राखीव असल्यागत वाटतो. मोठमोठे सेट्स उभारून कायमस्वरूपी तिथे चित्रिकरण होतं. आणखीन वरच्या दिशेला मग काकिनडा सागर किनारा प्रसिद्ध आहे. दत्तप्रभूंचा प्रथम अवतार मानलेले श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म याच विभागातला. इथून केवळ दहा बारा कि.मी.अंतरावरती असलेलं पीठापूर ही त्यांची जन्म भूमी. अतिशय लहानसं गाव. पण दत्तप्रभूंच्या अवताराने महापावन भूमी. महाराष्ट्रातून इथे दर्शनाला जाणारे हजारो भाविक आहेत. अन्नावरम्, सिंहाचलम् वगैरे आणखी इथली धार्मिक श्रद्धा स्थानं. आता आणखी आणखी उर्ध्वदिशेकडे विशाखापट्ट्णम्, मच्छलीपट्टणम् हे सागर किनारे आहेत. फक्त तेवढेच मी अद्याप पाहिले नाहीत. ‘गाझी अटॅक’ नावाचा एक सुरेख चित्रपट मध्यंतरी पाहण्यात आला. त्यात पी एन् एस गटही या पाकिस्तानी युद्धनौकेने आपली आय एन एस विक्रांत उध्वस्त करण्याचा जो डाव रचला होता तो आपल्या भारतीय नौदलाच्या जवानांनी कसा उधळून लावला त्याचं उत्तम चित्रण होतं. सगळं युद्ध पाण्याखाली झालं. त्यात विशाखापट्ट्णमची सामुद्रधुनी, तिथलं नौदल, आपल्या युद्ध नौका, पाणबुडया यावर विस्तृत चित्रण व माहिती पाहायला मिळाली. आता विशाखापट्ट्णमला जाण्याचा ध्यासच लागलाय म्हणा ना.

Jagannath Temple, Puri
Jagannath Temple, Puri

आणखी वर वर जाता जगन्नाथपुरी (Jagannath Temple, Puri) हे सुरेख नगर समुद्रतीरावर वसलेलं आढळतं. भारतातील जे चार दिशांचे चारधाम आहेत त्यात जगन्नाथ पुरी हे पूर्वेकडील धाम. आम्ही नुकताच तिथल्या वास्तव्यात रमणीय सूर्योदयाचा आनंद लुटला. सूर्याचा असा लाल बुंद गोळा पूर्व क्षितिजावरून पाण्याखालून येताना पाहणं हा अवर्णनीय आनंद आहे. रसिक वाचकांना वाटेल की मी सागर पर्यटन विशेषांकच लिहितोय की काय. पण असा एखादा खास दिवाळी अंक असायला हरकत नाही ना. आणि सरकार तथा प्रवासी कंपन्यांनी मनावर घेतल्यास अशा मोठ्या चार पाच आठवड्यांच्या सहली आयोजित केल्यास उत्तम होईल. द्वारका ते पुरी अशी पर्यटन सहल आयोजित करुन अगदी निवडक पण महत्वाच्या ठिकाणांना भेटी देत देत पुरी पर्यंत एक १५ ते २० दिवसांचा कार्यक्रम आयोजित केल्यास नक्की प्रतिसाद उत्तम मिळेल. मोठमोठया क्रुझ बोटींचा वापर, अद्ययावत सुखसुविधा, अगदी टायटॅनिक सारखी बोट वापरून एक आगळी वेगळी सहल ही भारत सर्व जगात मोठ्या दिमाखाने मिरवेल. आम्ही लहानपणी सिंदबादच्या साहसी समुद्र सफरी, कोलंबस, वास्को-द-गामा यांच्या कथा, सागरी दर्यावर्दी खलाशी व त्यांचे साहस अशा पुस्तकांतून कल्पक सागरी पर्यटन अनुभवलंय. ते प्रत्यक्षात उतरावं.

मी कोझीकोडच्या समुद्र किनाऱ्यावर उभा राहून, संपूर्ण भारत देशाला तीन बाजूस विळखा घालून सांभाळणाऱ्या महासागराची अथांगता न्याहाळत, हे आठवत होतो का? कदाचित… हो… माणसानं सागराकडून एक उदात्त तत्वज्ञान शिकून घ्यावं की, आपण सागराप्रमाणे तटस्थ असावं भरतीचा माज नाही, ओहोटीची लाज नाही.

॥ शुभं भवतु ॥

पं.युधामन्यु गद्रे.
Yudhamanyu@gmail.com

=====

हे देखील वाचा: “जिथे सागरा धरणी मिळते” – भाग १

====


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.