Home » टायटॅनिक सारखे दुसरे भव्य जहाज

टायटॅनिक सारखे दुसरे भव्य जहाज

by Team Gajawaja
0 comment
Titanic
Share

टायटॅनिक 10 एप्रिल 1912 रोजी जगातल्या सगळ्यात मोठ्या आकाराचे आणि राजेशाही थाटाचे जहाज आपल्या पहिल्या सागरी यात्रेसाठी निघाले.  या जहाजाची क्रेझ एवढी होती की, तेव्हा जहाजाचे तिकीट मिळवण्यासाठी युरोपमधील श्रीमंतांमध्ये स्पर्धा लागली होती.  मात्र आपल्या पहिल्या यात्रेला निघालेल्या या जहाजाची 15 एप्रिल 1912 रोजी हिमखंडाशी टक्कर झाली.  सर्वाधिक सुरक्षित असे जहाज असलेले टायटॅनिक यामुळे समुद्राच्या पोटात गडप झाले.  यात 1517 नागरिकांचा मृत्यू झाला.  या टायटॅनिकच्या शोकांतिकेला शंभरहून अधिक वर्ष उलटून गेली तरी त्या घटनेतील थरार काही कमी होत नाही.  टायटॅनिक च्या नावानं अनेक पुस्तके आली,  गुढ कथा आल्या, चित्रपट आले.  पण यामुळे टायटॅनिक जहाजाभोवतीचे गुढ अधिक वाढले गेले.  मात्र आता याच टायटॅनिक सारखे दुसरे भव्य जहाज तयार होत आहे.  टायटॅनिक हे एका समृद्ध शहरासारखे होते.  असेच दुसरे समृद्ध शहर तयार होत असून ऑस्ट्रेलिय अब्जाधिश या प्रोजेक्टचे प्रमुख आहेत. (Titanic)       

टायटॅनिकची भुरळ पडली नाही असा व्यक्ती नाही.  या शोकांतिकेला आता चांगल्या भविष्यात रुपांतरीत करण्याचा उद्देश ठेऊन ऑस्ट्रेलियन अब्जाधीशाने टायटॅनिक-2 हे मिशन चालू केले आहे. हे जहाजही मुळ टायटॅनिक सारखे भव्य असणार आहे.  यावरुन 2345 प्रवासी प्रवास करु शकणार आहेत बरोबर 112 वर्षांपूर्वी बुडालेले टायटॅनिक हे कायम वाईट स्मृती ठेऊन जगाच्या लक्षात राहिले आहे. आता या नावापुढे चांगल्या आठवणी देण्याचा मानस ठेऊन ऑस्ट्रेलियन अब्जाधीश आणि माजी खासदार क्लाइव्ह पामर हे नव्यानं टायटॅनिक  उभारीत आहेत.  1912 मध्ये बुडालेल्या टायटॅनिक जहाजाच्या धर्तीवर तसेच भव्य जहाज बांधण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.  टायटॅनिक-2 असे नाव देण्यात आलेल्या या जहाजासाठी क्लाइव्ह गेल्या आठ वर्षापासून प्रयत्नशील आहेत.  त्यांच्या या महत्त्वकांक्षी योजनेला कोव्हिडमुळे अडथळा आणला.  मात्र आता जगाला नव्या टायटॅनिकचा परिचय करुन देण्यासाठी त्यांनी नव्यानं टायटॅनिक-2 हा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. (Titanic)      

त्यासाठी त्यांनी सिडनी ऑपेरा हाऊस येथे या ड्रीम प्रोजेक्टचे थ्रीडी प्रेझेंटेशन केले.  यावेळी टायटॅनिक-2 च्या प्रतिकृतीच्या डिझाइनचे अनावरण झाले.  हे नवे टायटॅनिक प्रेमाचे चिन्ह असेल. जगाला प्रेमाचा संदेश देण्यासाठी हे नवे टायटॅनिक काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे टायटॅनिक 833 फूट लांब आणि 105 फूट रुंद असेल. जहाजात 9 डेक असतील. त्याच्या 835 केबिनमध्ये सुमारे 2345 प्रवासी एकाचवेळी प्रवास करु शकणार आहेत.  अर्थातच हे टायटॅनिकही पहिल्या टायटॅनिकसारखे राजेशाही थाटाचे असल्यामुळे या जहाजावर सुरुवातीला तरी फक्त फर्स्ट क्लासचाच दर्जा ठेवण्यात येणार आहे.  फारकाय या जहाजावरुन जे प्रवासी प्रवास करतील त्यांना त्यांच्या पोशाखासाठीही राजेशाही थीम देण्यात येणार आहे. (Titanic)     

हे टायटॅनिक पूर्ण करण्यासाठी क्लाइव्हने 2012 मध्ये ब्लू स्टार लाईन नावाची कंपनीही सुरू केली. पण या टायटॅनिक -2 प्रोजेक्टला पहिल्यांदा फटका बसला तो पेमेंटसंदर्भात झालेल्या अडथळ्यांमुळे. पेमेंट विवादामुळे 2015 मध्ये हा प्रोजेक्ट स्थगित करण्यात आला.  2018 मध्ये पामर यांनी पुन्हा टायटॅनिक-2 प्रोजेक्ट लॉन्च केला.  मात्र त्यानंतर आलेल्या कोविड-19 साथीचा परिणाम टायटॅनिकला भोगावा लागला.  या जहाजामध्ये ज्यांना गुंतवणूक करायची होती, त्यांनी आपला हात अखडता घेतला.  कोविडमुळे सर्वच सेवा थांबवण्यात आल्या होत्या. (Titanic)     

============

हे देखील वाचा : 28 वर्षांपूर्वी वीर सावरकर यांच्या भुमिकेसाठी ‘या’ अभिनेत्याने घेतली नाही फी

============

अशावेळी या राजेशाही जहाजावर कोण प्रवास करणार, असा सवाल करण्यात आला.  गुंतवणूकदार मागे हटल्यानं हा टायटॅनिक-2 प्रोजेक्ट पुन्हा बंद झाला. मात्र आता नव्यानं या प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली आहे.  हे भव्य जहाज 2027 पर्यंत पूर्ण होईल, असा दावा पामर यांनी केला आहे.  कोविडच्या भीतीनं ज्या गुंतवणूकदारांनी जहाज बांधणीमधील गुंतवणूक थांबवली होती, ते आता पुन्हा यात उत्सुक आहेत.  शिवाय अन्यही व्यावसायिक या टायटॅनिकच्या निर्मितीमध्ये उत्सुक असल्यानं आता जोमानं हा प्रोजेक्ट पूर्ण होईल, असा विश्वास पामर यांनी व्यक्त केला आहे. पामर हे स्वतः ऑस्ट्रेलियाच्या राजकरणातही सक्रीय आहेत.  युनायटेड ऑस्ट्रेलिया पक्षाचे ते नेते आहेत. आपण करत असलेले टायटॅनिक-2 हे जगात शांततेचे प्रतिक म्हणून ओळखले जाईल, असा त्यांचा दावा आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.