Home » काशीविश्वनाथाला 1 लाख रुद्रांक्षांचा अभिषेक

काशीविश्वनाथाला 1 लाख रुद्रांक्षांचा अभिषेक

by Team Gajawaja
0 comment
Kashi Vishwanath
Share

उत्तरप्रदेशमधील काशी विश्वनाथ (Kashi Vishwanath) मंदिरात विशेष उत्सव सुरु झाला आहे.  उत्तरप्रदेश आणि अन्य राज्यात श्रावण महिना सुरु झाला आहे.  यावर्षी श्रावण महिना अधिक आला आहे. त्यामुळे तमाम शिवभक्तांसाठी ही मोठी पर्वणी असून यानिमित्तानं काशी विश्वनाथ मंदिरात भगवान शंकराला तब्बल 1 लाख रुद्राक्षांनी अभिषेक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असल्याची माहिती आहे.  8 जुलै रोजी पंतप्रधान मोदी काशीविश्वनाथाच्या (Kashi Vishwanath) महापुजेला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. याचवेळी पंतप्रधान मोदी लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रचारही सुर करणार असल्याची माहिती आहे. वाराणसी हा पंतप्रधान मोदी यांचा मतदार संघ आहे. याच मतदारसंघातून बाबा विश्वनाथाचा आशीर्वाद घेत पंतप्रधान मोदी 8 जुलै रोजी 2024 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरु करतील, अशी माहिती आहे.   

काशी विश्वनाथ (Kashi Vishwanath) मंदिर हे भगवान शिवाला समर्पित एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे एक मंदिर आहे. असे मानले जाते की, एकदा या मंदिराला भेट देऊन पवित्र गंगेत स्नान केले तर मोक्ष प्राप्त होतो. यासाठी श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. तोच श्रावण महिना अधिकचा आला तर त्याचे पावित्र्य अधिक वाढते. यावर्षी हा योग आला असल्यानं बाबा विश्वनाथाच्या दर्शनासाठी पुढच्या दोन महिन्यात साधारण 2 कोटी पेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. काशी विश्वनाथाची सध्या रोज महापूजा सुरु आहे. त्यात 8 जुलै रोजी श्रीकाशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग आणि शिव-पार्वतीच्या मूर्तीला 1 लाख रुद्राक्षांनी सजवण्यात येणार आहे. यावेळी सुमारे 1 तास बाबा विश्वनाथांची महाआरती होणार आहे. ही पूजा पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. 

या महिन्यात काशी विश्वनाथाच्या (Kashi Vishwanath) चरणी 2 कोटी भाविक काशीत येण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रशासनानं विशेष तयारी केली आहे. 50 हजार चौरस मीटरमध्ये पसरलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनानंतरचा हा दुसरा श्रावण महिना आहे. अधिक आणि श्रावण महिना मिळून 59 दिवस मंदिरात शिव महापुराण आणि शिवकथेचे पठण होणार आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महादेवाच्या स्पर्श दर्शनाला बंदी घालण्यात आली आहे. अन्य दिवसांत मात्र भाविक ज्योतिर्लिंगाला स्पर्श करू शकतील. यावेळी भाविकांसाठी मंदिर चौक परिसरात शिव महापुराणाचे आयोजन करण्यात आले आहे. वाराणसीचे प्रख्यात कथा व्यास ब्रज वल्लभ शास्त्री हे संपूर्ण 59 दिवस संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत शिवभक्तांना शिव महापुराण सांगणार आहेत. बाबा विश्वनाथ धाममध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम प्रथमच आयोजित करण्यात आला असून यासाठी देशभरातील भाविकांची गर्दी होत आहे.  

काशी विश्वनाथाच्या (Kashi Vishwanath) दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्यामुळे विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहाच्या चार दरवाजांवर विशेष पाईप लावण्यात आले आहेत. या  पाईपद्वारे शिवभक्त शिवलिंगाला थेट आपल्या हातानं जल, दूध आणि फुले अर्पण करु शकणार आहेत. मंदिरात चारही दरवाज्यातून भाविकांना प्रवेश आणि बाहेर पडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. श्रावण महिन्याचे यावेळी 8 सोमवार येत असून या सोमवारी मंदिराचे नियम वेगळे कऱण्यात आले आहेत.  बाकीचे 51 दिवस वेगळे नियम आहेत. त्यामुळे भाविकांनी या सर्वांची माहिती आधी घ्यावी असे आवाहन मंदिराच्या व्यवस्थापन समितीतर्फे करण्यात आले आहे.  

श्रावण महिन्यात बाबा विश्वनाथांचा विशेष शृंगार करण्यात येतो. यावेळी 8 सोमवार आणि 2 पौर्णिमा आहेत. हे 10 दिवस बाबांना वेगवेगळ्या रूपात सजवण्यात येणार आहे. 10 जुलै रोजी बाबांचा पहिला शृंगार होणार आहे. या सर्व सोहळ्यात काशी विश्वनाथ मंदिर आणि शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काशीमध्ये कांवडयात्रेकरुही मोठ्यासंख्येनं येतात. त्यांनाही यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. या कावडयात्रेकरुंसाठी क्यूआर कोड लावण्यात आला आहे. त्याचे स्कॅनिंग केल्यावर या यात्रेकरुंसाठी सोयीसुविधा, भोजन, मुक्काम आदी व्यवस्थेची माहिती उपलब्ध होणार आहे. (Kashi Vishwanath)

========

हे देखील वाचा : Bastille Day म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास

========

याशिवाय श्रीकाशी विश्वनाथ मंदिर आणि काशीच्या संदर्भात माहिती देणा-या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात येणार आहे. काशी विश्वनाथाच्या (Kashi Vishwanath) दर्शनासाठी येणा-या भाविकांच्या सुरक्षेची मोठी काळजी घेण्यात येणार आहे. दहशतवाद विरोधी पथकाचे कमांडो भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात असतील. तसेच गर्दीच्या 200 हून अधिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. आपत्कालीन वैद्यकीय सुविधेसाठी मंदिर चौकात तात्पुरते रुग्णालय बांधण्यात आले आहे. याशिवाय मंदिर परिसरातील हॉस्पिटलमधील काही खाटा या शिवभक्तांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. काशी विश्वनाथ कॅरिडोर झाल्यापासून येथे भक्तांची संख्या चारपटीनं वाढली आहे. वर्षभरात 7 कोटी भाविक येथे पोहचल्याची नोंद आहे. आता अधिकचा श्रावण महिना आल्यानं ही भाविकांची संख्या अजून वाढणार आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.