“होय, मी आरोपी क्रमांक एक आहे….” बाबरी मशिद पाडल्यावर ज्यांच्यावर यासंदर्भात आरोप ठेवण्यात आले, त्यावेळी आपल्या आरोपांबद्दल छातीठोकपणे सांगणारी व्यक्ती म्हणजे आचार्य धर्मेंद्र (Aacharya Dharmendra). रामजन्मभूमी चळवळीशी संबंधिक असलेलं एक प्रमुख नाव. गोरक्षणासाठी 52 दिवस उपोषण करणारे आचार्य धर्मेंद्र परखड हिंदुत्ववादी आणि वक्ते म्हणून परिचित होते. त्यांचं वयाच्या 80 व्या वर्षी निधन झालं आहे. विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाचे सदस्य असलेल्या आर्चाय धर्मेंद्र यांचे कार्य विस्तृत आहे. धर्मग्रंथांचे ते अभ्यासक होते. श्री राम मंदिर आंदोलनात सक्रीय सहभाग असलेल्या श्रीपंचखंड पीठाधीश्वर आचार्य धर्मेन्द्र यांचे कार्य कायम स्मरणात राहील असेच आहे.
9 जानेवारी 1942 रोजी गुजरातमधील मालवाडा येथे जन्मलेल्या आचार्य धर्मेंद्र (Aacharya Dharmendra) यांच्या वडिलांचे नाव होते महात्मा रामचंद्र वीर महाराज. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वडिलांचा प्रभाव होता. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी वजरंग नावाचे वृत्तपत्र सुरू केले. गांधीवादाला विरोध करत वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी “भारताचे दोन महात्मा” नावाचा लेख प्रकाशित केला होता.
१९५९ मध्ये त्यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला’ या काव्यसंग्रहाला प्रतिसाद म्हणून गोशाळा हे काव्य लिहिले. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. त्यानंतर ते विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळात सहभागी झाले. श्रीराम मंदिर आंदोलनाच्या काळात आचार्य धर्मेंद्र यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. बाबरी मशिदीचा ढाचा पाडल्यानंतर, मी आरोपी क्रमांक एक आहे, असे जाहीर वक्तव्य त्यांनी केले होते. आचार्य धर्मेंद्र राम मंदिराच्या मुद्द्यावर मोकळेपणाने बोलत असत.
गोरक्षणासाठी आचार्य धर्मेंद्र (Aacharya Dharmendra) यांनी केलेले कार्य महत्त्वाचे होते. 1966 मध्ये देशातील सर्व गोभक्त समाज, ऋषीमुनी आणि संस्थांनी एकत्र येऊन एक महान सत्याग्रह चळवळ सुरू केली. गोरक्षणासाठी सुरु झालेल्या या आंदोलनात आचार्य धर्मेंद्र यांनी 52 दिवसांचे उपोषण केले होते. याशिवाय अनेक जनजागरण यात्रेत आचार्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांचे वडील महात्मा रामचंद्र वीर महाराज यांच्याप्रमाणे त्यांनीही आपले संपूर्ण आयुष्य उपोषण, सत्याग्रह, आंदोलने आणि भारत मातेची सेवा यासाठी वाहून घेतले होते.
ऑक्टोबर 1984 मध्ये राम जानकी रथयात्रेच्या निमित्ताने जनजागृतीसाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे एप्रिल 1984 मध्ये पहिली धर्मसंसद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये आचार्य धर्मेंद्र यांनी सीतामढी ते दिल्ली या राम जानकी रथयात्रेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. आचार्य धर्मेंद्र त्यांच्या परखड वक्तृत्वासाठीही प्रसिद्ध होते. याशिवाय हिंदी कवी म्हणूनही ते परिचित होते.
जयपूर मधील वनगंगेच्या तीरावर असलेल्या मैद नावाच्या एका छोट्या गावात आर्चाय राहत होते. गृहस्थ असूनही त्यांच्या पंथातील ऋषीमुनी आणि संतांप्रमाणे जनसामान्यांकडून त्यांना आदर मिळत होता. मुघल सम्राट औरंगजेबाने हिंदूंवर लादलेल्या अंत्यसंस्कार कराच्या निषेधार्थ स्वतःचे बलिदान देणारे महात्मा गोपाल दासजी हे त्यांचे पूर्वज होते.
========
हे देखील वाचा :ईराणमध्ये महिलांनी कापले केस तर जाळला हिजाब, कारण ऐकून व्हाल हैराण
========
जिझिया कराची अपमानास्पद वसुली आणि धर्मनिष्ठ सैनिकांच्या अत्याचारामुळे संतप्त झालेल्या स्वामी गोपालदासांनी धर्मासाठी प्राण अर्पण करण्याच्या संकल्पाने प्रेरित होऊन दिल्ली गाठली. मुघल बादशहाच्या दरबारात जाऊन जुलमी औरंगजेबला हिंदूंवर अत्याचार न करण्याची ताकीद त्यांनी दिली. परिणामी स्वामी गोपालदास यांना मारण्याचे आदेश देण्यात आले होते. आर्चार्य धर्मेंद्र यांना आपल्या पूर्वजांचा आणि त्यांनी केलेल्या शौर्याचा कमालीचा आदर होता.
आचार्य स्वामी धर्मेंद्र (Aacharya Dharmendra) यांना सोमेंद्र शर्मा आणि प्रणवेंद्र शर्मा असे दोन पुत्र आहेत. सोमेंद्र यांची पत्नी आणि आचार्य यांची सून अर्चना शर्मा सध्या गेहलोत सरकारमध्ये समाज कल्याण मंडळाच्या अध्यक्षा आहेत.
– सई बने