Home » व्हाईट हाऊसच्या प्रमुख पदासाठी नामांकित डॉ आरती प्रभाकर नक्की आहेत तरी कोण?

व्हाईट हाऊसच्या प्रमुख पदासाठी नामांकित डॉ आरती प्रभाकर नक्की आहेत तरी कोण?

by Team Gajawaja
0 comment
Arati Prabhakar
Share

अमेरिका ही महासत्ता आहे. याचे मूळ अमेरिकन संशोधकांना जाते. परंतु अमेरिकेमध्ये काही भारतीय वंशाचे संशोधक फार मोठी कामगिरी करत आहेत. यातलेच एक नाव म्हणेज डॉ. आरती प्रभाकर (Arati Prabhakar). “अभियंता आणि भौतिकशास्त्रज्ञ असलेल्या डॉ. प्रभाकर या कुठल्याही कठीण आव्हानांचे निराकरण करु शकतात. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचा फायदा घेण्यासाठी त्यांची मी वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्ती करत आहे.” अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी अशा शब्दात कौतुक करत डॉ. आरती प्रभाकर यांची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पॉलिसी (OSTP) कार्यालयाच्या संचालकपदी नियुक्ती केली. OSTP चे नेतृत्व करणाऱ्या ‘आरती’ या पहिल्या भारतीय स्थलांतरीत महिला ठरल्या आहेत. अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या डॉ. आरती यांचा सगळा प्रवास अनुकरणीय आहे.  

डॉ. आरती प्रभाकर (Arati Prabhakar) यांचा जन्म नवी दिल्ली येथे 2 फरवरी 1959 रोजी झाला. काही वर्षांनी त्या टेक्सासला (अमेरिका) गेल्या. 1979 मध्ये त्यांनी टेक युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर ऑफ सायन्सची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी 1980 मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर ऑफ सायन्स आणि 1984 मध्ये कैलिफोर्निया इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मधून अप्लाइड फिजिक्समध्ये पीएचडी केली. त्याच वर्षी त्यांना 1984 मध्ये ऑफिस ऑफ टेक्नॉलॉजी असेसमेंटमध्ये फेलोशिप मिळाली.

डॉ. आरती यांनी डिफेन्स ‘ॲडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सी (DARPA)’ मध्ये सामील होऊन नवीन तंत्रज्ञान आणि व्यवसायाच्या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. नंतर त्या DARPA च्या मायक्रोइलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान कार्यालयाच्या संस्थापक संचालक झाल्या.

या वेळी डॉ. आरती यांनी लष्करी यंत्रणेतील नवीन प्रगत सेमीकंडक्टर तंत्रज्ञानाशी संबंधित कार्यक्रम सुरू करुन त्याचा प्रचार केला. त्यानंतर 1993 मध्ये, बिल क्लिंटन राष्ट्राध्यक्ष असताना डॉ. आरती यांची ‘राष्ट्रीय मानक आणि तंत्रज्ञान संस्था (NIST)’च्या प्रमुखपदी नियुक्ती झाली. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी डॉ.आरती प्रभाकर यांच्याकडे डिफेन्स ॲडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सी (DARPA)ची जबाबदारी सोपवली. त्यानंतर डॉ. आरती यांनी सिलिकॉन व्हॅलीमध्ये तंत्रज्ञान अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली. त्यांनी रेकेम येथे इंटरव्हल रिसर्चच्या उपाध्यक्ष आणि नंतर अध्यक्ष म्हणून काम केले. 

ग्रीन टेक्नॉलॉजी आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये करिअर करत असताना डॉ. आरती 2001 मध्ये अमेरिकन व्हेंचर्स पार्टनर्समध्ये सामील झाल्या. पुढच्याच वर्षी त्या  DARPA  च्या प्रमुख झाल्या. येथे त्या बॉम्ब बनवण्याआधी आण्विक आणि रेडिओलॉजिकल सामग्री शोधण्यासाठी यंत्रणा तयार करणाऱ्या संघांचे परीक्षण करत असत. त्यांच्या नेतृत्वात मानवी तस्करीचे नेटवर्क शोधण्यासाठी साधने तयार करण्यात आली आहेत.   

=====

हे देखील वाचा – Shangri-La Dialogue: आशियाई देशांच्या संरक्षण परिषदेबद्दल तुम्हाला माहित आहे का? 

=====

सामाजिक क्षेत्रातही डॉ. आरती यांनी आपल्या कतृत्वाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी 2019 मध्ये समाजकल्याण क्षेत्रात काम करण्यासाठी एक ना-नफा तत्वावर संस्था सुरू केली.  

आता डॉ. आरती प्रभाकर एरिक लँडर यांची जागा घेतील. लँडरने ७ फेब्रुवारी २०२२ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आरती व्हाईट हाऊस ऑफिस ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी OSTP च्या संचालक असतील. अर्थात पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांना सिनेटची मंजुरी आवश्यक आहे. ज्याला काही महिने लागू शकतात. सिनेटने त्यांना मान्यता दिल्यास OSTP चे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरतील.  

वैज्ञानिक सल्लागाराचे मुख्य काम म्हणजे विज्ञानासाठी राष्ट्रपतींचा अजेंडा पूर्ण करण्यास मदत करणे. डॉ. आरती प्रभाकर यांना DARPA मध्ये काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे त्यांची कारकीर्द यशस्वी असेल, असा विश्वास खुद्द अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी व्यक्त केला आहे. तमाम भारतीयांसाठी डॉ. आरती प्रभाकर यांची नियुक्ती ही गौरवास्पद आहे.

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.