चीन! उद्याची महासत्ता! सध्याच्या घडीला जागतिक राजकारणात प्रभाव टाकणारा एक महत्वाचा देश म्हणून चीनकडे पाहता येईल. मागच्याच दशकात चीन महासत्ता होण्याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. २१ व्या शतकात चीन एक ताकदवान आशियाई देश म्हणून पुढे येईल असं दिसत होतं.
चीनने त्याची सैनिकी ताकद वाढवली. त्याचबरोबर आर्थिक ताकदसुद्धा वाढवली. येत्या काही वर्षात चीन अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आजमितीला चीनची लोकसंख्या १४० अब्ज इतकी आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार करायचा झाल्यास सगळ्यात ज्यास्त वस्तूंची आणि सेवांची निर्यात करणारा देश म्हणून चीनचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. ही झाली चीनची एक बाजू. पण जागतिक समूहाची चीनबद्दल असलेली विश्वासार्हता फारशी चांगली नाही. याला अनेक कारणं आहेत.
चीनची सीमा एकूण १४ देशांबरोबर विभागलेली आहे. किलोमीटरच्या स्वरूपात सांगायचं झाल्यास चीनची २२,४५७ किलोमीटरची सीमा इतर देशांबरोबर आहे. चीनचे जवळपास बऱ्याचशा देशांबरोबर सीमावाद चालू आहेत. यात भारताचाही समावेश होतो. सध्याच्या घडीला भारत-चीन संबंध बिघडले आहेत.
वादग्रस्त अशा गलवान खोऱ्यात भारतीय लष्कर आणि चीनी लष्कर यांच्यात २०२० साली आमने सामने झालेल्या चकमकीनंतर सगळं चित्रच बदललं आहे. याच पार्श्वभूमीवर चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी (Wang Yi) हे या महिन्यात (मार्च २०२२) शेवटच्या आठवडयात भारतभेटीवर येत आहेत.
गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षाच्या वेळी भारतीय लष्कराचे अधिकारी आणि जवान असे मिळून २० जण हूतात्मा झाले होते. यात चीनचेसुद्धा अनधिकृत स्त्रोतानुसार एकूण ४०-४५ सैनिक मारले गेले होते. चीन खरी आकडेवाडी लपवत असला तरीसुद्धा ऑस्ट्रेलियाच्या एका वर्तमानपत्रानुसार चीनचे ४० च्या जवळपास अधिकारी आणि सैनिक मारले गेले आहेत.
हे सगळं पाहता २०२० नंतर पहिल्यांदाच चीनचे वरिष्ठ मुत्सद्दी त्यांचे परराष्ट्र मंत्री वँग यी (Wang Yi) भारत भेटीवर येत आहे. त्यामुळे या त्यांच्या भारतभेटीला महत्व आहे. गलवान संघर्ष झाल्यानंतर एकूण १५ वेळा चीन आणि भारत यांच्यामध्ये कॉर्प्स कमांडर स्तरावर (लष्करी अधिकारी) बैठकी झाल्या आहेत. पण सगळ्या चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. आता मंत्री स्तरावर ही पहिल्यांदाच भेट होत आहे.
लाइन ऑफ ॲकचूअल कंट्रोल (LAC) वरुन झालेल्या बैठका या मिलिटरी स्तरावर होत्या, त्या आता डिप्लोमॅटीक स्तरावर होणार आहेत आणि कूटनीतीद्वारे बैठका होऊन त्यातून ठोस स्वरूपात काही निष्पन्न होऊ शकतं, अशी परिस्थिती आज आहे.
भारताने आपला मुद्दा चीनसमोर अत्यंत स्पष्ट शब्दात मांडला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी याधीच हे स्पष्ट केलं आहे की चीनने जर LAC बदलायचा प्रयत्न केला तर भारत त्याला कदाचितही मान्य करणार नाही.
====
हे देखील वाचा: चीनमुळे कर्जबाजारी झालेल्या ‘या’ देशाला भारत देतोय मदतीचा हात
====
आता जर प्राप्त परिस्थिती पाहिल्यास चीनने नरमाईची भूमिका घेतली आहे, असं दिसतय. वँग यी (Wang Yi) यांनी या संबंधात एक स्टेटमेंट दिलं आहे. ते म्हणतात, “भारत आणि चीनने एकमेकांची ऊर्जा खर्च करण्यापेक्षा (म्हणजे भांडण्यापेक्षा) एकत्र येऊन आपापली उदिष्ट साध्य करावीत.” हे स्टेटमेंटला महत्वाचं आहे. यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. पण आत्तापर्यंतचा चीनचा असा सुर नव्हता. चीनला हे पक्क माहिती आहे की, भारत हा आता १९६२ ला होता तसा राहिला नाही.
भारताने मिलिटरी माइट (सैन्यदलांची क्षमता) दाखवली आहे आणि ती दुसऱ्या देशांवर युद्ध लादण्यासाठी नसून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आहे. स्थिर सरकार, बदललेली सकारात्मक राजकीय परिस्थिती या सर्व बाबींमुळे आर्थिक विकास, जीडीपीचा दर उंचावला असून यामुळे उंचावलेले जीवनमान, दरडोई उत्पन्नात वाढ, इत्यादी आर्थिक निर्देशकांनुसार भारत एका सशक्त अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे.
चीनवर पटकन विश्वास ठेवणं अवघड आहे. चीन बोलतो एक आणि करतो दुसरं. एकीकडे चीन म्हणतोय की, भारत चीन संबंध सुधारायला हवेत, पण चीनने सीमेवर तैनात केलेले सैनिक मागे घेतले नाहीत. तसंच ३८,००० स्क्वेअर किलोमीटरचा भूभाग अनधिकृतपणे हस्तगत केला आहे, मग याचा अर्थ काय समजायचा?
====
हे देखील वाचा: Russia -Ukraine Crisis: रशिया – यूक्रेन संघर्षामध्ये भारताची भूमिका कोणती?
====
चीनबाबत संपूर्ण अनभिज्ञ राहून काहीही न करणे हीसुद्धा एक धोकादायक बाब आहे. चीनने मध्यंतरी आण्विक, रासायनिक आणि जैवीक शस्त्रांच्या संदर्भात तिबेटमध्ये लष्करी कवायती केल्या. हा सुद्धा भारताला इशाराच आहे की काय असं वाटावं. भारताने चीनशी कूटनीतीद्वारे चर्चा कराव्यात, त्याचबरोबर सजग रहावं.
शेवटी एक मुद्दा लक्षात घ्यावा, जो ताकदवान आहे त्यालाच जग नमस्कार करतं, आत्तापर्यंत चीन अशाप्रकारे ताकद दाखवत होता… पण गलवान घडलं आणि चीनला लक्षात आलं की, भारताबरोबर चर्चा करूनच सीमा वादावर मार्ग निघू शकतो. (इथे कुठेही भारत सर्वशक्तिमान आहे हे सांगण्याचा हेतु नाही, तसंच भारत महासत्ता आहे अशा पोकळ वल्गना करायचा हेतू अजिबात नाही, पण सत्य परिस्थिती तर अशीच आहे.) त्याशिवाय वँग यी अशा पद्धतीचं ‘स्टेटमेंट’ करू शकत नाहीत.
शी जिनपिंग यांच्या मनात काय चालले आहे हे समजू शकत नाही, पण भारताची वाढलेली ताकद, जगभरात अनिवासी भारतीयांची वाढलेली संख्या, आर्थिक आणि लष्करी ताकद या अनुषंगाने वँग यी यांच्या भारत भेटीकडे पहावे लागेल.
-निखिल कासखेडीकर