शनिशिंगणापूर चौथऱ्यावरील आणि शबरीमाला मंदिरातील नाकारण्यात आलेला महिला प्रवेशाचा वाद देशभर चांगलाच चर्चेत आला होता. तसेच, मासिकपाळी ही विटाळ असून या दिवसात महिला अपवित्र असल्याने त्यांना प्रवेशबंदी असते हे ही आपण जाणतोच. पण आज आपण अशा काही खास धार्मिक स्थळांविषयी जाणून घेणार आहोत जिथे जायला चक्क पुरुषांना बंदी घातली जाते (Men are not allowed). चला तर मग जाणून घेऊयात या धार्मिक स्थळांविषयी.
१. कन्याकुमारी मंदिर, कन्याकुमारी
कन्याकुमारी मंदिर ५२ शक्तिपीठांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. हे जागृत देवस्थान असून या ठिकाणी आदिशक्तीचा उत्सव केला जातो. पुराणकथेतील एका प्रसंगानुसार असे सांगितले जाते की, विवाह सोहळ्यानंतर कैलासवासी शंकरांनी कुमारीच्या रूपातील देवी पार्वतीचा याच ठिकाणी अपमान केला व संपूर्ण स्त्रीजतीचा अनादर केला त्यामुळे या ठिकाणी पुरुषांना प्रवेश नाही. मात्र असे असले तरी देखील मंदिराच्या प्रवेशदारापर्यंत पुरुषांना जाता येते.
२. ब्रह्मदेव मंदिर, राजस्थान
हिंदू धार्मिय अनेक देवी-देवतांची मंदिरे आपल्याला ज्ञात आहे परंतु ब्रह्मदेवांचे मंदिर अत्यंत दुर्मिळ आहे. राजस्थान मध्ये असणाऱ्या या मंदिरात विवाहित पुरुषांना प्रवेश बंदी आहे. असे सांगितले जाते की, ब्राम्हदेवांनी एका यज्ञाची तयारी केली होती. या दरम्यान देवी सरस्वती यांना येण्यास विलंब होत असल्याकारणाने त्यांनी देवी गायत्री यांच्याशी विवाह करून यज्ञ पूर्ण केला. तेव्हा क्रोधित झालेल्या देवी सरस्वतीने ब्रह्मदेवांना शाप दिला की, जो कोणी विवाहित पुरुष तुमच्या दर्शनास येईल त्याला वैवाहिक जीवनात समस्या येतील. त्यामुळे या मंदिरात विवाहित पुरुषांना स्थान नाही.
३. कामाख्या देवी, आसाम
रजस्वला झालेल्या या देवीच्या योनीची पूजा या मंदिरात केली जाते. शिव-पार्वती यांचे युद्ध झाले तेव्हा तिच्या शरीराचे तुकडे झाले व तिच्या योनीचा भाग हा या ठिकाणी पडला. देवी पार्वती ही तेव्हा रजस्वला होती म्हणून या ठिकाणी कामाख्या अशा नावाने मंदिराची स्थापना झाली. मासिक पाळी असलेल्या आणि सुरू झालेल्या महिला व मुलींची येथे पूजा केली जाते. त्यामुळे ठराविक काळात या मंदिरात महिला व संन्यासी पुरुष सोडून इतर पुरुषांना प्रवेश बंदी असते.
४. अट्टकुल मंदिर, केरळ
दक्षिण भारतीयांचा ‘पोंगल’ हा सण म्हणजे दिवाळी दसऱ्याप्रमाणे असतो. अट्टकुल हे स्त्रीशक्तीचा जागर असलेले मंदिर असून, पोंगलच्या वेळेस येथे सर्व महिला एकत्र येत मोठा उत्सव साजरा करतात. फेब्रुवारी -मार्च महिन्याच्या दरम्यान १० दिवसांच्या कालावधीत येथे पुरुषांना बंदी असून महिला एकत्र येत मोठा उत्सव साजरा करतात.
५. माता मंदिर, मुझफ्फरनगर
मुझफ्फरनगर मधील हे मंदिर भारतातील एक प्रमुख शक्ती पीठ असून, आसाम मधील कामाख्या मंदिराप्रमाणेच या मंदिरातील देवीचा सुद्धा मासिक पाळीचा एक काळ असतो आणि या काळात मंदिराची सुरक्षा अधिक वाढवली जाते व मंदिराच्या आवारात सर्व पुरुषांना येण्यास मज्जाव असतो. एवढेच नाही तर मंदिराचे जे मुख्य पुरुष पुजारी आहेत त्यांना सुद्धा मंदिरात येणास बंदी असून तीन-चार दिवसांच्या काळात केवळ स्त्रियाच मंदिरात येऊ शकतात.
हे ही वाचा: ताजमहल, लाल किल्ला आणि राष्ट्रपती भवन विकणारा नटवरलाल (Natwarlal) आहे तरी कोण?
‘पाणीवली बाई’ म्हणून सर्वांना परिचित असलेल्या ‘या’ महिलेने थेट इंदिरा गांधींशी पंगा घेतला होता
तर, भारतामधील विशेष मंदिरे जिथे पुरुषांना प्रवेशबंदी आहे ( Men are not allowed). आणि आश्चर्य म्हणजे त्याविरोधात पुरुषांनी कधी चकार शब्दही काढला नाही बरं का!