खरं म्हणजे स्वस्थ होतं सगळं. ना कमी ना जास्त. जगाच्या दृष्टीनं. सगळं कसं छान. चौकटीत. बंदिस्त. माहीतच नव्हतं, चौकटीच्या बाहेर जाणं. स्वतःच स्वतःभोवती आखून घेतलेल्या काही लक्ष्मणरेषा. एक नाही. कितीतरी. त्याही आवडीनं.
तर काही आखल्या गेलेल्या… जन्मजात. छान वाटायचं. इतर गोष्टींची कधी गरजच वाटली नाही. किंबहुना ती वाटू शकते, या कल्पनांपर्यंत पोहोचणंही कठीण होतं तिच्याकरता.
पाप-पुण्याच्या विधिनिषेधाचे ठोकताळे. काही सांस्कृतिक, सामाजिक बंधनं. काही इतिहासानं लादलेली. काही स्वतःच्याच मनाचे खेळ म्हणून तयार केलेली. काही जीवन जगण्याचा अविभाज्य भाग म्हणून स्वीकारलेली. घट्टपणे मनामध्ये आणि बुद्धीमध्ये रोवलेली. खुशीनं. खरंतर मधला केवढातरी अंधारलेला काळ होता… कितीतरी दिवसांचा… दिवसांचा?
छे… शतकांचा. तसं पाहिलं तर सामाजिक जातीजमातींच्या उतरंडीवर तिचं स्वतःचं असं काही नव्हतंच. त्या उतरंडीवरही ती उताराच्याच दिशेनं. सगळं ठरवूनच ठेवलेलं कुणीतरी… कुणी? माहीत नाही.
आखूनच ठेवलेली कुंडलीतली तिची घरं की, हे असं असं सगळं घडू शकतं हिच्या बाबतीत. फार वाईट घडू शकतं. बेताल होईल हिचं जीवन. तसं झालं तर, हिच्यामुळे इतरांच्या कुंडलीतही अशुभ योग. ते तालबद्ध रहावं असं वाटेत असेल तर हिच्या पायातील ताल आधीपासूनच मर्यादेत ठेवायला हवा. त्यातून हिच्या वाटेला आलेलं सुफलत्व. पेरलं की उगवणारच. म्हणून ह्या सुफलतेच्या मुळाशीच विषप्रयोग. हिची सुफलता, हिचं सौंदर्य, हिचं असणंच विद्रूप करायचं. मग त्याला धार्मिकता, संस्कृती, नैतिकता, शास्त्र, समाजकल्याण इत्यादींचे आयाम.तिनं अग्निप्रवेश करावा, तिनं विहीर जवळ करावी, तिनं अंधा-या चौकटीत रहावं इत्यादी. माणसाच्या जगण्यात, जगण्याच्या प्रवाहात जर काही चुकीचं, त्यानं आखलेल्या समाजनियमांविरुद्ध, अनैतिक प्रकारचं, विनाशकारी युद्ध वगैरे असं काही घडलं तर त्याला कारणीभूत तिचं अस्तित्व. ती आहे म्हणून जगावर, समाजांवर संकटच संकट.
किंवा कधी तिनं, तिच्यासारख्या अनेक जणींनी वस्ती करून गावाबाहेर रहावं, गावाच्या निकोप आरोग्याकरता. ‘त्या’ची अशी वेगळी वस्ती नाही. मग तिला सवयच होऊन गेली सगळ्याचीच. पिढ्यानपिढ्यांची सवय. तिच्या रक्तबीजांमधून ती सवयही पुढे वाहू लागली. तिची स्वरूपं बदलली काही वेळा. मूळ मात्र तेच.
पण…तिची ती चौकट अलगदपणे कधीतरी दुभंगली. त्यातून झिरपलं अनाकलनीय, काव्यात्म काही. ते झिरपणं इतकं हळुवार की, विरघळतोय आपण, हे चौकटीला उमजायलाच वेळ लागला. कडा ठिसूळ होऊ लागल्या. अन् लक्ष्मण रेषा पुसट. पण असं कडा ठिसूळ होणं,रेषा पुसट होणं इत्यादी सोपं नव्हतं. केवढीतरी किंमत मोजली तिनं त्याकरता. खरंतर अजूनहीमोजतेच आहे. चौकट असावी की नसावी, ह्यावर केवढ्या वावटळी उठल्या. पहिल्या चौकटी ठिसूळ झाल्या, पण नव्या तयार झाल्या.
तरीही तिनं जिद्दीनं आयुष्याच्या काव्यात्मकतेला आपल्यात सामावून घेतलं. एका अमूर्त भावनेचं मुक्त चित्र आकारास येऊ लागलं. अरूप, अनंगरंगाचं मोरपीस चौकटीत थरथरू लागलं. त्या थरथरण्याला धून बासरीची अन् नाद पैंजणांचा होता. कधी ती धून लोकसंस्कृतीतून आली तर कधी नागरसंस्कृतीतून. असं चौकटीत राहूनच चौकट रुंदावता येते हे उमजलं तिला. तर काही वेळा चौकट स्वीकारूनही काही अमूर्त असं मांडता येतं, मांडायचं, हेही ठरवलं तिनं.
आता बासरीही तिचीच अन् मुक्तपणे थिरकणारे पैंजणही तिचेच.शब्दांचे, अर्थांचे नि शब्दार्थांच्या मोडतोडीचेही. तिचं तिलाच बरंचसं उमगलं नि ती ‘व्यक्त’ होऊ लागली. काही रचू लागली. काही लिहू लागली. काही रंगवू लागली. काही लयतत्त्वं अंगिकारू लागली. साकारू लागली. हा होता तिचा आत्माविष्कार. आता तिच्या रक्तबीजांतून ही आत्माविष्काराची सवय पुढे प्रवाहित होतेय. कदाचित त्या प्रवाहात जुन्या चौकटी वाहून जातील. आणि नव्या …. तयार होतील? की ती खरंच होईल …. संपूर्ण ‘मुक्ता’.
आणि पुन्हा हजार वर्षांनी लिहील…
मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्यासी.
-डाॅ. निर्मोही फडके.