इसवी सन २००० मध्ये केनियामध्ये आय सी सी चॅम्पिअन्स ट्रॉफीची स्पर्धा सुरु होती. या स्पर्धेत जवागल श्रीनाथबरोबर भारताची द्रुतगती गोलंदाजीची धुरा वाहण्यासाठी एक नवा कोरा गोलंदाज सज्ज झाला होता. त्याने आपल्या आगमनाची नांदी दिली ती वेगवान यॉर्कर्स टाकून. ते बघून सुनील गावस्करांना फार आनंद झाला कारण एका भारतीय गोलंदाजाकडून अशी गोलंदाजी बघायला मिळणे दुर्मिळ होते. या नौजवान गोलंदाजांचे नाव होते झहीर खान. याच झहीर खानचा (Zaheer Khan ) ४३ वा वाढदिवस नुकताच ७ ऑक्टोबरला साजरा झाला. त्याला शुभेच्छा.
झहीरखानचा जन्म ७ ऑक्टोबर १९७८ ला महाराष्ट्रात नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे झाला. तो १९९६ मध्ये क्रिकेटसाठी मुंबईत दाखल झाला. मुंबईत त्याने नॅशनल क्रिकेट क्लब कडून खेळायला सुरुवात केली. या क्लबचे सर्वेसर्वा माजी कसोटीपटू सुधीर नाईक यांनी त्याची गुणवत्ता हेरली व त्याची नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षणासाठी शिफारस केली.
त्यानंतर त्याने वडोदरा संघाकडून रणजी स्पर्धेत खेळायला सुरुवात केली. त्याने रेल्वे विरुद्ध रणजी अंतिम सामन्यात वडोदऱ्याला विजय मिळवून दिला व त्याच कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी खुले झाले.
झहीरचा उदय झाला तेव्हा भारतीय संघात फिरकीचे युग संपून द्रुतगती गोलंदाजीची पहाट उगवत होती.
श्रीनाथ, वेंकटेश प्रसाद यांच्या नंतर इशांत शर्मा, आशिष नेहरा, इरफान पठाण, श्रीसंत, रुद्रप्रताप सिंग, आगरकर, बालाजी, मुनाफ पटेल अशी ताज्या दमाची द्रुतगती गोलंदाजांची फळी तयार झाली. त्यामुळे झहीरला तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागले. झहीरने कसोटी पदार्पण केले ते बांगला देशविरुद्ध २००० साली. पण २००६ पर्यंत तो संघात आपले स्थान पक्के करू शकला नाही.
याच वर्षी तो मुंबईकडून रणजी सामने खेळू लागला. त्याबरोबरच त्याने इंग्लिश काउंटी स्पर्धेत वृसेस्टरशायर काउंटीचे प्रतिनिधीत्व केले. या अनुभवाने झहीरच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली व २००६ च्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापासून तो भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज बनला. पण त्यापूर्वी सुद्धा मिळेल त्या संधीचे त्याने सोने केले.
२००२ च्या न्यूझीलंड मधील मालिकेत अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवताना त्याने परिणामकारक गोलंदाजी केली. त्याने दोन कसोटीच्या मालिकेत ११ विकेट्स घेताना दोन्ही सामन्यांच्या पहिल्या डावात पाच-पाच गडी बाद केले. २००३-०४ च्या ऑस्ट्रेलियातील मालिकेत पहिल्या ब्रिस्बेन कसोटीत पहिल्या डावात त्याने पाच बळी घेतल्याने चांगल्या सुरुवातीनंतर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला आणि नंतर भारताने आघाडी घेऊन सामन्यात वर्चस्व राखले. परंतु नंतर दुखापतीमुळे झहीरला हा दौरा अर्धवट सोडावा लागला.
२००७ ची इंग्लंडविरुद्धची मालिका आपण इंग्लंडमध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली जिंकली, त्यात झहीरचा सिंहाचा वाटा होता. त्याने ट्रेंट ब्रिज कसोटीत एका डावात पाच बळी घेऊन भारताच्या विजयाचा मार्ग प्रशस्त केला. याच सामन्यात झहीर फलंदाजी करत असताना इंग्लंडच्या खेळाडूंनी खेळपट्टीवर जेली टाकून त्याला डिवचलं आणि झहीर त्वेषाने पेटून उठला व त्याने इंग्लिश फलंदाजीची दाणादाण उडवली. त्याने मोक्याच्या क्षणी इंग्लिश कर्णधार वॉनचा हलकेच त्रिफळा उडवला व भारताच्या विजयाच्या मार्गातील अडसर दूर केला.
2011 चा इंग्लंड दौरा व त्याच वर्षाच्या अखेरीला ऑस्ट्रेलियाचा दौरा झहीरला दुखापतीमुळे अर्धवट सोडावा लागला आणि त्याचा फटका भारतीय संघाला चांगलाच बसला व दोन्ही मालिका भारताने ०-४ अशा फरकाने गमावल्या.
झहीरने एकूण ९२ कसोटीत ३११ विकेट्स घेतल्या त्या सुमारे ३२.९५ धावांच्या सरासरीने. त्याने ११ वेळा एका डावात पाच किंवा अधिक बळी मिळवले तर एकदा सामन्यात १० विकेट्स काढल्या. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रॅम स्मिथ, कुमारा संगकारा, जयसूर्या, मॅथु हेडन यासारख्या दिग्गज डावखुऱ्या फलंदाजांना त्याने प्रत्येकी १० पेक्षा अधिक वेळा बाद केले.
२०० एकदिवसीय सामन्यात त्याने २९.४४च्या सरासरीतीने २८२ विकेट्स काढल्या. तो २००३, २००७, २०११ अशा तीन विश्वकरंडक स्पर्धेत खेळला आणि त्यात त्याने ४४ गडी बाद केले.
झहीरने मेहनतीने ‘नकल’ बॉल टाकण्याची कला विकसित केली आणि २०११च्या विश्वचषक स्पर्धेत त्याचा प्रभावी वापर केला. तो रिव्हर्स स्विंग पण चांगल्या प्रकारे करत असे. त्याचा आऊटस्विंगर खूप घातक असे. डाव्या हाताच्या फलंदाजांना झहीरचे इनस्विंगर व आऊटस्विंगर खेळणे खूप कठीण जात असे. उजव्या हाताच्या फलंदाजाला त्याने ओव्हर द विकेट गोलंदाजी केल्यावर चेंडूचा अँगल कळत नसे व बरेचसे फलंदाज चेंडू यष्ट्यांवर ओढवून घेत असत.
झहीर दहाव्या, अकराव्या क्रमांकावर येऊन थोड्याफार धावा काढत असे. त्यानं २००४ मध्ये बांगला देश विरुद्ध ११ व्या क्रमांकावर येऊन स्वतःची सर्वोच्च धावसंख्या ७५ नोंदवताना सचिन बरोबर शतकी भागीदारी केली होती.
झहीर खूप लोकप्रिय खेळाडू होता. २००५ च्या बेंगळुरू येथील पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत एका युवतीने स्टेडियममध्ये ‘झहीर आय लव यू’ असा फलक झळकावला होता. इशा शर्वाणी बरोबर त्याचे नाव काही काळ जोडले गेले होते. अखेर झहीर सागरिका घाटगे बरोबर विवाहबद्ध झाला.
झहीर बराच काळ व्ही व्ही एस लक्ष्मणचा रूम पार्टनर होता आणि लक्ष्मणची शिस्त त्याला जाचक वाटायची असे तो विनोदाने सांगतो.
तो मुंबई इंडियन्स कडून आय पी एल स्पर्धेत खेळला. झहीरने २०१५ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. त्याने पुण्यात एक हॉटेल सुरु केले. सध्या तो कोचिंगकडे वळला आहे.
दुखापतींनी जर झहीरचा पिच्छा पुरवला नसता तर तो कपिलपेक्षा अधिक विकेट्स मिळवून भारतीय स्विंग गोलंदाजीचा सार्वकालिक ‘बादशाह’ बनला असता हे निश्चित.
– रघुनंदन भागवत
(लेखक क्रीडा अभ्यासक आहेत)
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.