द्रौपदी मुर्मू यांनी २५ जुलै २०२२ ला भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. प्रतिभाताई पाटील यांनी देशाची पहिली महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळवला. त्यानंतर राष्ट्रपती पदावर विराजमान झालेल्या द्रौपदी मुर्मू या दुसरी महिला आहेत. आदिवासी समाजातल्या प्रथम राष्ट्रपती म्हणूनही त्यांच्या कारकिर्दीला विशेष वलय प्राप्त झालंय. देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदी निवडली जाणं हे देशासाठी गौरवास्पद आहे. (Droupadi Murmu)
द्रौपदी मुर्मू यांनी यापूर्वी झारखंडच्या राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. ओडिसा राज्यातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या बडीपोसी या गावात १९५८ मध्ये त्यांचा जन्म झाला. संथाळ (संथाली) या आदिवासी समाजाचं त्या प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे साहजिकच आदिवासी राष्ट्रपती आदिवासी समाजाच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी काय आणि कसं योगदान देणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असणं स्वाभाविक आहे.
द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्यावर संथाली आणि इतर आदिवासी समाजांचे प्रश्न सध्या चर्चेच्या ऐरणीवर आले आहेत. देशाची प्रथम नागरिक म्हणून आदिवासी महिला निवडली गेल्यानंतर या प्रश्नांवर काही मार्ग निघणार का, याकडेही अनेकांचं लक्ष आहे. त्यानिमित्ताने आदिवासी समाजाला सध्या भेडसावणारे प्रश्न आणि त्यावर उपाय म्हणून काय पावलं उचलण्याची गरज आहे, याकडेही लक्ष देणं आवश्यक आहे. (Droupadi Murmu)
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ज्या संथाली या आदिवासी समाजातून आल्या आहेत, ती भारताच्या पूर्व भागातील राज्यांमध्ये एक प्रमुख आदिवासी जमात म्हणून ओळखली जाते. झारखंड, बिहार, ओडिसा, पश्चिम बंगाल आणि काही प्रमाणात आसाम, मिझोराम, त्रिपुरामध्ये या जमातीचं वास्तव्य आहे.
२००० च्या जनगणनेनुसार देशाच्या लोकसंख्येत तिसरी सर्वाधिक लोकसंख्या या जमातीची आहे. संथाळींसह सगळ्याच आदिवासी जमातींतील काही लोकसंख्या आता मुख्य प्रवाहात येण्यास सुरुवात झाली असली तरी या समाजातल्या मुलांना आजही उच्च शिक्षण, रोजगार संधी, पायाभूत सुविधा अशा अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आहे, हे वास्तव आहे. (Droupadi Murmu)
बहुतांश आदिवासी जमातींचं वास्तव्य हे देशाच्या दुर्गम भागात असल्यामुळे शाळा उपलब्ध असणं, त्या सुरु असणं, तिथे चांगले शिक्षक पोहोचणं हे मुद्दे गंभीर आहेत. चांगल्या आहाराच्या अभावामुळे मुलांमध्ये कुपोषण हाही एक गंभीर प्रश्न आदिवासींमध्ये आहे. आदिवासी महिलांचं लैंगिक शोषण, बेरोजगारी हेही आदिवासींपुढचे काही मुख्य प्रश्न आहेत.
====
हे देखील वाचा – टेलिफोनचा शोध ग्रॅहॅम बेलने लावला.. मग टेलिफोनवर ‘हॅलो’ म्हणण्याचा शोध कोणी लावला?
====
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं बालपण ज्या गावात गेलं त्या ओडिसा राज्यातल्या ऊपरबेडा गावात अगदी अलिकडच्या काही वर्षांमध्ये वीज पोहोचली. रस्ते झाले. पाण्याच्या पाईपलाईन पोहोचल्या. काही भागांमध्ये तर द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारीची घोषणा झाल्यावर वीज आली. पण तरी हे गाव आजही स्वयंपूर्ण गाव आहे, असं म्हणायला वाव नाही. बँक, हायस्कूल, चांगलं हॉस्पिटल अशा प्राथमिक म्हणाव्या अशा सोयीसुविधांची गावाला आजही प्रतिक्षाच आहे. महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुलींना आजही दूरच्या गावांमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही. त्यातून अनेकींचं शिक्षण मागे पडतं ते कायमचंच. (Droupadi Murmu)
हे प्रश्न काही फक्त संथाळी जमातीतल्या आदिवासींचे नाहीत. देशाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या सगळ्याच आदिवासींसमोर हे प्रश्न आहेत. हे प्रश्न दैनंदिन जगण्याचे आहेत, अस्तित्वाचे आहेत आणि मूलभूत अधिकारांचेही आहेत. द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाचा मुकूट धारण केल्यानंतर आता आदिवासींना प्रतिक्षा आहे ती त्यांच्या जगण्यात काही परिवर्तन होण्याची. ते परिवर्तन घडवून आणण्यात महामहिम राष्ट्रपती यशस्वी होणार का, या प्रश्नाचं उत्तर मात्र येणारा काळच देईल. (Droupadi Murmu)