Home » स्वामीजींचा जन्मदिवस संपूर्ण भारतात युवा दिन म्हणून का साजरा करतात?

स्वामीजींचा जन्मदिवस संपूर्ण भारतात युवा दिन म्हणून का साजरा करतात?

by Team Gajawaja
0 comment
Swami Vivekananda
Share

हिंदू तत्त्वज्ञानाच्या अमेरिका, इंग्लंड आणि युरोपमध्ये प्रसार करणारे स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) यांची आज जयंती आहे. स्वामी विवेकानंद यांनी काय कार्य केले, हे सांगण्यासाठी आणखी एका विवेकानंदाची गरज आहे, कारण स्वामी विवेकानंद यांचे कार्य तेवढेच व्यापक आणि समाजभिमुख आहे. गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांनी आपल्या देशाला जाणण्यासाठी एक सोप्पा मंत्र तरुणांना दिला आहे.  तर तरुण पिढीला आपला देश, भारत जाणून घ्यायचा असेल तर त्यांनी विवेकानंद यांचे साहित्य वाचले पाहिजे. कारण तुम्हाला त्यांच्यामध्ये सर्व काही सकारात्मक दिसेल, नकारात्मक काहीही नाही. रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेला हा शब्द न शब्द खरा आहे. आज तरुणपिढीला ज्या सकारात्मक विचारांची गरज लाभते, ते विचार स्वामी विवेकानंद(Swami Vivekananda) यांच्या विचारातून नक्कीच मिळतात.  

12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे नरेंद्रनाथ यांचा जन्म झाला. या नरेंद्रनाथांनी 25 व्या वर्षी संन्यास स्वीकारला. त्यानंतर नरेंद्रनाथांचे नाव विवेकानंद झाले. विवेकानंद यांची ओळख यापलिकडेही खूप आहे. विवेकानंद यांचे वडील विश्वनाथ दत्त हे कलकत्ता उच्च न्यायालयातील प्रसिद्ध वकील होते. त्यांचे आजोबा दुर्गाचरण दत्ता हे संस्कृतचे अभ्यासक होते.  विवेकानंद यांची आई धार्मिक स्वभावाची होती. त्यांच्या आई भुवनेश्वरी यांना रामायण, महाभारत ऐकण्याची खूप आवड होती. त्यानिमित्तानं कथाकार त्यांच्या घरी नियमित येत असत. भजन-कीर्तनही नियमित व्हायचे. कुटुंबातील धार्मिक आणि अध्यात्मिक वातावरणाच्या प्रभावामुळे लहानपणापासूनच बाल नरेंद्राच्या मनात धर्म आणि अध्यात्माबाबत रुची होती, ओढ होती.  रायपूर आणि कोलकता येथे त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. कोलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश परीक्षेत प्रथम श्रेणीचे गुण मिळवणारे ते एकमेव विद्यार्थी होते. नरेंद्र यांनी तत्त्वज्ञान, धर्म, इतिहास, सामाजिक विज्ञान, कला आणि साहित्याचा अभ्यास केला.  याशिवाय  भारतीय शास्त्रीय संगीताचेही शिक्षण घेतले.  या सर्वांबरोबरच नरेंद्रे शारीरिक व्यायाम आणि खेळांमध्येही अव्वल असत.  अनेक अभ्यासकांची पुस्तके ते नियमीत वाचत असत.  त्यांच्या अभ्यासाचा आणि वाचनाचा आवाका त्यांच्या शिक्षकांनाही चकीत करत असे.  पाश्चात्य तत्त्वज्ञांचा अभ्यास करण्याबरोबरच नरेंद्र बंगाली साहित्याचाही अभ्यासही करत असत. 

1893 मध्ये अमेरिकेत शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म महासभेत विवेकानंद यांनी आपल्या देशाच्या वतीने सनातन धर्माचे प्रतिनिधित्व केले.  त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली.  विवेकानंद यांना  रामकृष्ण परमहंस यांच्यासारखे गुरु लाभले.  रामकृष्ण परमहंस यांनी विवेकानंद (Swami Vivekananda) यांच्या असंख्य प्रश्नांना उत्तरे दिली आणि त्यातून विविकानंद यांचे व्यक्तिमत्व साकारले. रामकृष्णांच्या मृत्यूनंतर, विवेकानंदांनी भारतभर प्रवास केला.  वयाच्या 25 व्या वर्षी नरेंद्रने भगवे कपडे परिधान केले होते. त्यानंतर त्यांनी संपूर्ण भारताचा पायी प्रवास केला. 31 मे 1893 रोजी विवेकानंदांनी आपला प्रवास सुरू केला आणि जपानमधील अनेक शहरांना भेट दिली यात नागासाकी, कोबे, योकोहामा, ओसाका, क्योटो आणि टोकियो या शहरांचा समावेश होता.  चीन आणि कॅनडामार्गे अमेरिकेतील शिकागो येथे ते पोहोचले.  1893 मध्ये शिकागो येथे जागतिक धर्म परिषद झाली. यामध्ये स्वामी विवेकानंद भारताचे प्रतिनिधी म्हणून दाखल झाले. त्यांनी या धर्मपरिषदेत केलेले भाषण गाजले.  माझ्या बंधु आणि भगिनींनो….अशी सुरुवात स्वामी विवेकानंद यांनी या भाषणाची केली.  या भाषणानं समस्त उपस्थितांची मने जिंकली आणि अमेरिकेतही स्वामी विवेकानंद यांची लोकप्रियता वाढली.  

विवेकानंदांनी हिंदू तत्त्वज्ञानाच्या तत्त्वांचा अमेरिका, इंग्लंड आणि युरोपमध्ये प्रसार केला आणि अनेक सार्वजनिक आणि खाजगी व्याख्याने दिली.  स्वामी विवेकानंद छोट्या छोट्या गोष्टींमधून सकारात्मक जीवनाची उदाहरणे देत असत.  स्वामी विवेकानंदांची (Swami Vivekananda) कीर्ती देश-विदेशात पसरली होती.  तरुणवर्गामध्ये ते लोकप्रिय होते. स्वामी विवेकानंदांचा त्या काळी प्रचलित असलेल्या इंग्रजी शिक्षण पद्धतीला विरोध होता.   कारण या शिक्षणाचा उद्देश फक्त बाबूंची संख्या वाढवणे हा होता. मुलाचा सर्वांगीण विकास व्हावा, असे शिक्षण त्यांना हवे होते. मुलाच्या शिक्षणाचे उद्दिष्ट त्याला स्वावलंबी बनवून स्वतःच्या पायावर उभे करणे हे असते. असे स्वामी विवेकानंद आपल्या भाषणात सांगत असत.  

======

हे देखील वाचा : हनुमानाला केशरी रंगाचे शेंदूर का लावले जाते?

======

स्वामी विवेकानंदांचे (Swami Vivekananda) शिक्षणावरील विचार केवळ पुस्तकी ज्ञानावर नसून मनुष्यनिर्मितीच्या प्रक्रियेवर केंद्रित होते. एका पत्रात ते लिहितात – “शिक्षण म्हणजे काय? ते पुस्तकी शिक्षण आहे का? नाही! हे ज्ञानाचे वैविध्य आहे का? नाही, इतकेच नाही. ज्या संयमाने इच्छाशक्तीचा प्रवाह आणि विकास नियंत्रणात आणला जातो आणि तो फलदायी असतो, यालाच शिक्षण म्हणतात. चारित्र्यनिर्मितीसाठी शिक्षणाचा उपयोग करावा यासाठी विवेकानंद आग्रही होते. स्वामींनी देशाच्या प्रगतीमध्ये शिक्षणाची मध्यवर्ती भूमिका मानली. योग्य शिक्षणातून व्यक्तिमत्त्व घडले पाहिजे आणि चारित्र्य घडले पाहिजे, असे स्वामी विवेकानंदांचे मत होते.  

4 जुलै 1902 रोजी स्वामीजींनी बेलूर मठात प्रार्थना केली आणि योगासनेही केली. त्यानंतर तेथील विद्यार्थ्यांना योग, वेद, संस्कृत या विषयांचे शिक्षण देण्यात आले. संध्याकाळी स्वामीजी योगासने करण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले आणि त्यांनी शिष्यांना शांतता भंग करण्यास मनाई केली आणि योग करत असताना त्यांचा मृत्यू झाला.  स्वामीजींचा (Swami Vivekananda) जन्मदिवस संपूर्ण भारतात युवा दिन म्हणून साजरा केला जातो. अत्यंत कमी वयात भारताच्या युवा पिढीला नव्या विचारांचा वारसा देणा-या स्वामी विवेकानंद यांचे कार्य हे अमुल्य असेच होते.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.