लहरों से डरकर नौका पार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।
सोहनलाल द्विवेदी यांच्या या काव्याला जगभर प्रसिद्धी मिळाली अनेकांनी या काव्याचे वाचनही केले आहे. पण हे काव्य जगणारे मात्र काल, आज आणि उद्याही कायम असामान्य असतील हे नक्की. या काव्याच्या ओळी जगणारी माणसे ही आपल्या ‘फायटिंग स्पिरिट’मुळे असामान्य होऊन जातात. आज आम्ही अशाच एका सामान्य माणसाच्या खडतर प्रवासाची माहिती देणार आहोत. ज्याने हार मानून रडत न बसता स्वतःच्या हिमतीवर आयुष्य घडवलं.
गडगंज पगाराची नोकरी मिळवणं आणि सगळ्या भौतिकसुखाचा आनंद घेणं, हे भूतलावरील सगळ्याच माणसांचे स्वप्नं असते. नोकरीकरीता लागणारे कौशल्य असूनही नोकरी न मिळाल्याने अनेकजण मानसिकदृष्ट्या नैराश्याच्या गर्तेत जात असतात. त्यात कोरोनामुळे हे प्रमाण जरा जास्तच वाढत गेले आहे. पुण्यातल्या ‘रेवण शिंदे’ या तरुणाबाबतही असेच काहीसे झाले. मात्र खचून न जाता त्याने या प्रतिकूल परिस्थितीत असे काही केले की, आज तो दरमहा ५० हजार रुपये कमवत आहे (Watchman to Entrepreneur).
सुमारे ६ वर्षापूर्वी कामाच्या शोधात असलेल्या रेवणला एका खाजगी कंपनीत १२ हजार रुपयांवर सुरक्षा रक्षकाची नोकरी मिळाली होती. पण दुर्दैवाने २०१९ च्या डिसेंबरमध्ये ती कंपनी बंद पडल्याने त्याची नोकरी गेली. त्यांनतर रेवणने एका स्नॅक्स सेंटरमध्ये कामाला सुरुवात केली (Watchman to entrepreneur).
काही दिवसातच रेवणने स्वतः एक स्नॅक्स सेंटर भाड्याने घेतले व ते चालवायला सुरुवात केली. पण नियतीने इथेही त्याची परीक्षा पाहिली. मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन लागलं आणि त्यामुळे सगळंच होत्याचं नव्हतं झालं. गाठीशी असलेले पैसेही संपत आले होते. परंतु, जूननंतर शासनाने हळूहळू केलेल्या अनलॉकमुळे त्याने पुन्हा आपला व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले.
हे ही वाचा: बालमजुरी करून शिकलेल्या अनुराधा भोसले (Anuradha Bhosale) यांच्या बालमजुरी विरोधात लढ्याची थक्क करणारी कहाणी
शब्बास रे पठ्ठ्या! शिक्षण अर्धवट सोडून व्यवसायाला सुरुवात केली, आता कमावतोय वर्षाला कोटी रुपये
परंतु, कोरोनामुळे फार कोणी येत नसल्याने सुरुवातीला त्याने लोकांना मोफत चहा द्यायला सुरवात केली. त्याच्या चहाच्या उत्कृष्ट चवीमुळे हळूहळू ग्राहकांची वर्दळ वाढत गेली आणि त्याचा व्यवसायही वाढीस लागला. आजच्या घडीला त्याच्या हाताखाली ५ कर्मचारी काम करतात. आजूबाजूची ऑफिसेस आणि त्याच्याकडे येणारे गिऱ्हाईक, असं मिळून रेवण दिवसाला ७०० कप चहा विकतो.
रेवणने अलीकडच्या काळात आल्याच्या चहासोबत, कॉफी आणि गरम दूध विक्रीस ठेवायला सुरुवात केली आहे. रेवणच्या चहाच्या एका लहान कपाची किंमत ६ रुपये आणि मोठ्या कपची किंमत १० रुपये आहे.
हे सुद्धा वाचा: सोलापूरच्या ‘या’ मुलीने गाढवाच्या दुधामुळे जगात नाव गाजवले आहे; सध्या तिच्या उत्पादनला येतेय जगातून मागणी; वाचा सविस्तर
रेवण दरमहा २ लाख रुपयांचा चहा विकतो, ज्यातून त्याला सुमारे ५० हजार रुपयांचा नफा होतो. योग्य नियोजन करून रेवण आता फोनवरूनही ऑर्डर घेऊन आपल्या व्यवसायाच्या कक्षा रुंदावत आहे. आज जिथे छोट्या छोट्या गोष्टींमुळे लोक नैराश्याच्या गर्तेत अडकत जातात तिथे रेवणसारखे तरुण समाजासमोर नवीन आदर्श निर्माण करत आहेत.
-निवास उद्धव गायकवाड