आपल्या भारताला मंदिरांचा समृद्ध इतिहास लाभला आहे. विविध प्रकारच्या अनेक मंदिरांमुळे भारत संपन्न झाला आहे. आपल्या देशामध्ये अशी असंख्य मंदिरं आहेत, ज्यांना हजारो वर्ष जुना इतिहास लाभला आहे. यापैकी अनेक मंदिरं तर अशी आहेत, ज्यांच्यामध्ये बरीच रहस्य देखील दडलेली आहेत. काही रहस्य उलगडली आहेत, तर काही आजही अनुत्तरित आहेत. असेच एक मंदिर म्हणजे विरुपाक्ष मंदिर. भारताच्या कर्नाटक राज्यातील हम्पी येथे असलेल्या विरुपाक्ष मंदिराची देखील बरीच रहस्य आजही रहस्यच आहेत. चला जाणून घेऊया या मंदिराबद्दल आणि या मंदिराच्या विविध रहस्यांबद्दल.
कर्नाटकमधील हम्पी शहर युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांपैकी एक आहे. हंपीमध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यातीलच एक प्राचीन मंदिर आहे विरुपाक्ष मंदिर. हंपी हे रामायण काळातील किष्किंधाचे असल्याचे मानले जाते. या मंदिरात भगवान शंकराच्या विरुपाक्ष रूपाची पूजा केली जाते. या मंदिराची अनेक वैशिष्ट्य असून त्याच्याशी रहस्यही जोडले गेले आहेत. इंग्रजांनीही या मंदिराचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही.
विरुपाक्ष मंदिराबद्दल अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. १४ व्या शतकात अर्थात १३३६ ते १६४६ या काळात विजयनगर साम्राज्याचा मोठा विस्तार झाला, त्यावेळी विरुपाक्ष मंदिराला मोठे महत्त्व प्राप्त झाले. १६ व्या शतकापर्यंत विरुपाक्ष मंदिर या साम्राज्याचे मुख्य केंद्रस्थान बनले होते. विजयनगर साम्राज्य त्याच्या काळातील सर्वांत शक्तिशाली राज्यांपैकी एक होते. विजयनगरच्या शासकांच्या काळातच या विरुपाक्ष मंदिराची भरभराट झाली. विजयनगरचे शासक कलेचे रक्षक होते.
विरुपाक्ष मंदिर हे द्रविडीयन स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. विजयनगर साम्राज्याचा ऱ्हास झाला तरी हे मंदिर सुरक्षित राहिले. राजा कृष्णदेवराय सम्राट असताना वैशिष्टय़पूर्ण गोपुरम म्हणजेच उंच प्रवेशद्वार आणि राज्याभिषेक मंडप बांधले गेले. मंडपामध्ये कोरीव काम केले असून हा मंडप विविध शिल्पांनी सुशोभित केलेल्या अनेक खांबांनी सजवण्यात आला आहे. या खांबांवर त्यावर पौराणिक कथा, प्राणी आणि गोपुरम देवता आहेत. मंदिराच्या गर्भगृहात एक शिवलिंग आहे.
हम्पीला आज दक्षिण भारतातील शेवटचे ‘महान हिंदू साम्राज्य’ म्हणून ओळखले जाते. युनेस्कोनेदेखील या शहराचे वेगळेपण ओळखले आणि हम्पी येथील स्मारक समूहाचे जागतिक वारसास्थळ म्हणून वर्गीकरण केले. विरुपाक्ष मंदिर पंपातीर्थ स्वामीस्थल या नावानेसुद्धा प्रसिद्ध आहे
या मंदिराची रहस्यमय गोष्ट म्हणजे मंदिरातील काही खांबांमध्ये एक आवाज येतो. हा आवाज संगीताचा असतो. म्हणूनच त्यांना संगीत स्तंभ देखील म्हणतात. इंग्रजांनी खांबांमधून संगीताचा आवाज कसा येतोय याचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्याचे अभ्यासकांकडून सांगितले जाते. त्यासाठी इंग्रजांनी या मंदिराचे खांब तोडले आणि पाहिले देखील मात्र यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण खांब आतून पोकळ होते आणि त्यात काहीही नव्हते. हे रहस्य आजही उलगडलेले नाही म्हणून याला रहस्यमय मंदिर म्हणतात.
विरुपाक्ष हे मंदिर भगवान शिव शंकर यांचे असून, त्यांच्या रुपात या मंदिरात भगवान विरुपाक्ष आणि त्यांची पत्नी देवी पंपा यांना समर्पित आहे. हे मंदिर पंपावती मंदिर या नावाने देखील ओळखले जाते. या मंदिराचा मोठा भाग पाण्याखाली बुडाला आहे. त्यामुळे तिथे कोणी जात नाही. बाहेरील भागाच्या तुलनेत मंदिराच्या या भागाचे तापमान खूप कमी असते.
==========
हे देखील वाचा : किवी खाल्ल्याने आरोग्यास होणारे फायदे माहित आहे का…?
==========
शिवाय विरुपाक्ष, भगवान शिवाचे एक रूप आहे. या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथील शिवलिंग, हे दक्षिणेकडे झुकलेले आहे. या शिवलिंगाची कथा रावणाशी संबंधित आहे. रामाशी युद्धात विजय मिळवण्यासाठी रावणाने शिवाची पूजा केली, अशी धार्मिक मान्यता आहे. यानंतर जेव्हा भगवान शंकर प्रकट झाले तेव्हा रावणाने त्यांना लंकेत शिवलिंग स्थापन करण्यास सांगितले.
रावणाच्या वारंवार प्रार्थनेनंतर भगवान शंकर तयार झाले, परंतु त्याने त्याच्यासमोर एक अट ठेवली. लंकेला नेत असताना शिवलिंग जमिनीवर ठेवू नये, अशी अट होती. रावण शिवलिंग घेऊन लंकेला जात होता, पण वाटेत त्याने गणेशाच्या रूपातील एका महात्म्याला हे शिवलिंग धरायला दिले, पण त्याच्या वजनामुळे त्याने शिवलिंग जमिनीवर ठेवले. तेव्हापासून हे शिवलिंग इथेच राहिले. अनेक प्रयत्न करूनही ते हलवता आले नाही.