वाचकहो चक्रावून गेलात ना शीर्षक वाचून. अहो वरील संज्ञांचा नुसता उल्लेख वाचून सुद्धा अंगात कापरं भरतं. इम्प्रोवाईज्ड एक्सप्लोसिव्ह डिवाइस अथवा डायनामाईट सापडल्याची खबर मिळाली की सुरक्षा यंत्रणांची झोप उडते व ते निकामी केल्याशिवाय ते स्वस्थ बसू शकत नाहीत, अन्यथा काय होते ते आपल्याला सांगायची गरज नाही. घाबरू नका. मी आज चर्चा करणार आहे ती क्रिकेटच्या मैदानावरील एका इंडियन एक्सप्लोसिव्ह डिवाइसची.
या डायनामाईटचे नाव आहे वीरेंदर सेहवाग. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या तपात (१२ वर्षे) या स्फोटकाने जगभरातील क्रिकेट मैदानावर असा हलकल्लोळ माजवला होता की भल्या भल्या संघांची, त्यांच्या गोलंदाजांची झोप त्याने उडवली होती आणि त्याची पाठ पाहिल्याशिवाय त्यांना झोप तर सोडाच पण अन्न सुद्धा गोड लागत नसेल.
अशा या सेहवागचा (Virender Sehwag) आज २० ऑक्टोबरला ४३ वा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्याला शुभेच्छा देतानाच त्याच्या कारकिर्दीतील काही ठळक कामगिरीचा संक्षिप्त आढावा घेण्याचा हा प्रयत्न.
सेहवाग नावाचे ज्वालाग्राही रसायन तब्बल १२ वर्षे १०४ कसोटी सामन्यात धगधगत होते. २३ शतके आणि ३२ अर्धशतकांच्या साहाय्याने त्याने ८५८६ धावा काढल्या त्या ४९.३४ च्या सरासरीने आणि ८२.११ च्या स्ट्राईक रेटने.
सेहवागचे भारतीय कसोटी संघात आगमन झाले ते २००१ साली दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर. मधल्या फळीत खेळताना त्याने पहिल्याच कसोटीत पहिल्या डावात १०५ धावा ठोकून शतकी सलामी दिली. एवढेच नव्हे तर त्याचा आदर्श सचिन तेंडुलकरबरोबर त्याने द्विशतकी भागी पण रचली. यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही.
२००२च्या इंग्लंड दौऱ्यात सौरव गांगुलीने त्याला सलामीचा फलंदाज बनवले आणि इथूनच हा आगीचा लोळ अव्याहतपणे पसरू लागला. त्यावेळची सेहवागने एक गमतीशीर आठवण सांगितलेली ऐकण्यात आली. गांगुलीने जेव्हा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन सेहवागला तयार होण्यास सांगितले त्यावेळी राहुल द्रविड सेहवागच्या आधी पॅड बांधून तयार झाला. सेहवागने त्याला कारण विचारले तेव्हा तो म्हणाला की तू सलामीला जाणार आहेस तर मला तयार होण्यास सुद्धा वेळ मिळणार नाही. राहुलने ध्वनित केले की सेहवाग लगेच बाद होईल अशी त्याला भीती वाटत होती.
पण सेहवागने राहुलची ही भीती व्यर्थ ठरवली. त्याने ८४ धावा काढल्या. पुढच्याच कसोटीत सेहवागने शतक काढले (१०६ धावा). या शतकानंतर राहुलने त्याला कानमंत्र दिला की तू जर सातत्याने मोठ्या धावा रचल्यास तर तुला समकालीन तसेच भूतपूर्व क्रिकेटपटू आणि समालोचकांकडून मान (रिस्पेक्ट) मिळेल. सेहवागने हा सल्ला फारच गंभीरपणे घेतला आणि एकूण २३ शतकांपैकी १४ वेळा त्याने १५० च्या वर धावा केल्या. त्यात चार द्विशतके आणि दोन त्रिशतके होती.
२००२च्या मोसमात भारतात वेस्टइंडिज व न्यूझीलंडविरुद्ध त्याने प्रत्येकी एक शतक नोंदवले. पण खऱ्याखुऱ्या वीरेंदर सेहवागची ओळख क्रिकेट जगताला झाली ती २००३च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मेलबॉर्न कसोटीत २३३ चेंडूत काढलेल्या 195 धावांमुळे. ब्रेट ली, ब्रॅकन, बीचेल, मॅकगिल या गोलंदाजांची त्याने इतकी यथेच्च पिटाई केली की स्टिव्ह वॉ ला शेवटी कामचलाऊ कॅटिचला चेंडू द्यावा लागला आणि त्याच्याच फुल टॉस वर सेहवाग षटकार मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. ही खेळी सेहवागच्या झुंजार तसेच बेडर वृत्तीची साक्ष देणारी होती. डावाच्या सुरवातीला तीन वेळा ब्रेट लीचा उसळता चेंडू त्याच्या हेल्मेटवर आदळला होता. परिणामस्वरूप त्याला मैदानात उपचार घ्यावे लागले होते.
२००४ मध्ये भारतीय संघ १५ वर्षानंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. गतदौऱ्यांच्या अनुभवांमुळं भारत काहीसा दबावाखाली होता. त्यातच रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरने भारतीय संघास आव्हान दिले होते. पण सेहवागने गर्जना केली की मी रावळपिंडी एक्सप्रेसला यार्डात पाठवीन.
आणि खरोखरच वीरेंदर त्याच्या शब्दाला जागला. पहिल्या मुल्तानच्या कसोटीत त्याने त्रिशतक ( ३७५ चेंडूत ३०९ ) काढताना पाकिस्तानी तेज मार्याची पार वासलात लावली. हे त्रिशतक सर्वार्थाने ऐतिहासिक होते कारण हे भारतीय खेळाडूने नोंदवलेले पहिले त्रिशतक होते. पण यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने यापूर्वीच्या दौऱ्यांमध्ये झहीर अब्बास, जावेद मियांदाद , इम्रान खान यांनी भारतीय अस्मितेला दुखावण्याचे जे काम केले होते त्याची सव्याज परतफेड केली.
या एका खेळीने त्याने पाकिस्तानी पूर्वसुरींच्या आठवणी पुसून टाकल्या. भारताने मुलतान तर जिंकलेच पण ही मालिका सुद्ध २-१ अशी जिंकून पाकिस्तान्यांना त्यांच्याच भूमीवर प्रथमच पाणी पाजले. शेवटच्या कराची कसोटीत सेहवाग पहिल्या चेंडूवर बाद झाला तेव्हा पाकिस्तानी खेळाडूंना हर्षवायू होणेच बाकी होते इतका त्यांनी त्याचा धसका घेतला होता. पण द्रविडने २७० धावा काढून पाकिस्तान्यांचा आनंद क्षणभंगुर ठरवला ही गोष्ट वेगळी.
२००४ च्या उत्तरार्धात ऑस्ट्रेलियाने भारताचा दौरा केला ही मालिका भारताने २-१ अशी गमावली पण चेन्नईच्या दुसऱ्या सामन्यात सेहवागने १५५ धावा काढल्या. तो बाद झाला तेव्हा भारताचा स्कोर ६ बाद २३३ असा होता यावरून सेहवागने एकहाती किल्ला कसा लढवला याची कल्पना येते.
२००५ मध्ये पाकिस्तानचा संघ भारतात आला. सेहवागने पहिल्या कसोटीत १७३ धावा काढल्या तर अंतिम सामन्यात २०१ धावा काढल्या. पण भारताने हा सामना गमावला तो सेहवाग दुसऱ्या डावात चांगल्या सुरवातीनंतर धावबाद झाल्यामुळे.
२००६ च्या सुरवातीला भारतीय संघ पाकिस्तानात गेला होता. लाहोरच्या पहिल्या अनिर्णित कसोटीत सेहवागने २३७ चेंडूत २५४ धावा चोपून पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. अप्पर कट चा मोह आवरला असता तर राहुल द्रविडच्या साथीने त्याने पंकज रॉय आणि विनू मंकड यांचा ४१३ धावांच्या सलामीच्या भागीचा विक्रम सहज मोडला असता. सेहवाग-द्रविडने ४१० धावांची भागीदारी रचली.
त्यानंतर मात्र सेहवागचा सूर हरपला. २००६ च्या आफ्रिका दौऱ्यात तो साफ अपयशी ठरला. २००७ च्या इंग्लिश दौऱ्यात त्याला चक्क वगळण्यात आले. २००७-०८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची निवड झाली पण पहिल्या दोन कसोटीत त्याला संघात जागा मिळू शकली नाही.
शेवटच्या ऍडलेड कसोटीत दुसऱ्या डावात त्याने १५१ धावा फाटकावून भारताला सामना अनिर्णित ठेवण्यात मदत केली. भारताचा एकूण स्कोर होता ७ बाद २६९. यावरून सेहवागने कसा एकहाती सामना वाचवला ते कळून येईल.
२००८ च्या मध्यावर भारत श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला होता. ही मालिका भारत हरला पण दुसऱ्या सामन्यात पहिल्या डावात सेहवागने नाबाद २०१ धावा काढल्या. त्या वेळेपर्यंत भारतीय खेळाडूने श्रीलंकेत झळकावलेले ते पहिले द्विशतक होते. भारताने हा सामना जिंकला.
या मालिकेनंतर आफ्रिकेचा संघ भारतात आला. पहिल्याच कसोटीत चेन्नईला सेहवागने २७८ चेंडूत ३०० धावा काढून क्रिकेट इतिहासातील सर्वात जलद त्रिशतक नोंदवण्याचा विक्रम केला तो स्टेन, मॉर्केल, एण्टीनि, कॅलिस या सर्वोत्तम वेगवान माऱ्यासमोर. सेहवागने ३१९ धावा काढताना वासिम जाफर व राहुल द्रविडबरोबर लागोपाठ दोन द्विशतकी भागीदाऱ्या केल्या. या खेळीचा समावेश विस्डेन मासिकात झाला .
पाठोपाठ इंग्लंडचा संघ भारतात आला. चेन्नई कसोटीत इंग्लंडने भारताला जिंकण्यासाठी ३८७ धावांचे आव्हान दिले. सेहवागने हे आव्हान स्वीकारताना इंग्लड गोलंदाजीवर असा काही हल्ला चढवला की चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लड विजेत्यांच्या आवेशातून बचावात्मक भूमिकेत गेला. सेहवागने ८३ धावा काढल्या आणि लक्ष्य आवाक्यात आणून ठेवले. शेवटच्या दिवशी सचिनने युवराजच्या साथीने स्वतःच्या शतकाबरोबरच भारताला सामना जिंकून दिला.
२००९ मध्ये श्रीलंका संघ भारत दौऱ्यावर आला. मुंबईतील तिसऱ्या कसोटीत सेहवागने कमाल केली. त्याने पहिल्या दिवशीच नाबाद २८४ धावा काढताना मुरलीधरन व अजंता मेंडिस ची अशी पिटाई केली की त्यांना निश्चितच वाटले असेल की ‘लंकेवर काळ कठीण आज पातला ‘. सेहवाग दुसऱ्या दिवशी २९४ धावांवर मुर्लीधरणकडेच झेल देऊन परतला. ब्रॅडमॅननंतर एका दिवसात जास्तीत जास्त धावा काढणारा सेहवाग दुसरा फलंदाज ठरला.
२०१० मध्ये त्याने आफ्रिकेविरुद्ध १६५ तर वर्षअखेरीस न्यूझीलंडविरुद्ध १७३ धावा काढल्या. २०१० नंतर मात्र सेहवागला उतरती कळा लागली. २०११ च्या इंग्लंड दौऱ्यात त्याला फक्त एक सामना खेळायला मिळाला. वर्षअखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सेहवागने फक्त दोन अर्धशतके मारली. भारताने ही मालिका ०-४ अशी गमावली.
त्याने आपले अखेरचे शतक इंग्लंडविरुद्ध अहमदाबाद्ला नोंदवले ते २०१२ मध्ये. सेहवागला यादरम्यान दृष्टीची समस्या भेडसावू लागली आणि त्याचे हॅन्ड – आय कोऑर्डिनेशन लुप्त झाले. २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो आपली शेवटची कसोटी खेळला. त्यानंतर त्याला वगळण्यात आले ते कायमचेच.
सेहवागने २३ शतकांपैकी १० शतके परदेशात झळकावली. त्याने ज्या सामन्यात शतकी खेळी केल्या त्यापैकी ८ सामने भारताने जिंकले तर ५ गमावले.
सेहवाग एक उपयुक्त ऑफ स्पिन गोलंदाज होता त्याने ४० विकेट्स काढल्या. २००८ मध्ये भारताने पर्थ येथील सामना जिंकला तेव्हा त्याने मोक्याच्या वेळी ३ बळी घेऊन ऑस्ट्रेलियन संघाला रोखले. तो एक उत्कृष्ट क्लोज इन फिल्डर होता. त्याने कसोटीत ९१ झेल घेतले. तो एक हुशार कर्णधार होता. २०११-१२च्या शेवटच्या अडलेड कसोटीत नेतृत्व करताना त्याने वॉर्नरला रोखण्यासाठी अश्विनला ओपनिंग स्पेल दिले आणि अश्विनने वॉर्नरला स्वस्तात गुंडाळले.
तो एकूण २५१ एकदिवसीय सामने खेळला त्यात त्याने १५ शतके मारली. त्यापैकी चौदा सामने भारताने जिंकले. २०११ मध्ये इंदूरला त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध त्यावेळच्या सर्वोच्च २१९ धावा काढल्या. २००३ आणि २०११ ची विश्वचषक स्पर्धा त्याने गाजवली.
टी२० ची पहिली विश्वचषक स्पर्धा तो खेळला. त्याला दोन सामने खेळायला मिळाले. इंग्लंडविरुद्ध त्याने ६८ धावा फटकावून गंभीरबरोबर शतकी सलामी दिली आणि भारताच्या विजयाला हातभार लावला.
सेहवागने कसोटीत जे धावांचे इमले रचले त्याचे रहस्य काय असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याने ६० टक्के धावा चौकार/षटकारांच्या मदतीने केल्या त्यामुळे धावा पळून काढताना होणारी दमछाक कमी झाली आणि त्याचा स्ट्राईक रेट कमालीचा उंचावला. अनेक माजी खेळाडू/समीक्षक सेहवाग पायाची हालचाल अजिबात करत नाही म्हणून नाके मुरडत. पण हेच तर त्याचे बलस्थान होते. तो चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत नसे तर चेंडू त्याच्यापर्यंत येण्याची वाट पाहत असे.
तो शफल न करता क्रीज मध्येच उभा राहत असे त्यामुळे तो चेंडू येण्यापूर्वी कंमीट झालेला नसे. तसेच तो मधली यष्टी व डावी यष्टी कव्हर करून स्टान्स घेत असे. त्यामुळे ऑफ स्टंप वरील अथवा थोड्या बाहेरील चेंडू मारताना त्याला पुरेशी जागा मिळत असे व चेंडू पूर्णपणे बॅटवर घेता येत असे. तो बचावात्मक खेळताना चेंडूने बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये फार क्वचित झेल बाद झाला असेल कारण तो कधीच चेंडूच्या सरळ रेषेत येऊन खेळला नाही.
बहुतांशी आक्रमक फटके खेळतानाच बाद झाला कारण प्रत्येक चेंडू हा मारण्यासाठीच असतो अशी त्याची धारणा होती. आपण गोलंदाजाला घाबरण्याऐवजी त्याने आपल्याला घाबरले पाहिजे असे त्याचे म्हणणे होते.
बँकेत जसे एखादे कर्जखाते कागदोपत्री आर्थिक निकषांवर अनुत्पादक वाटते पण वास्तवात व्यवसाय उत्तम तर्हेने चालत असतो आणि कर्जाची परतफेड पण वेळेवर
होत असते तदवतच सेहवागचे क्रिकेट पुस्तकी निकषांवर अयोग्य ठरत असेल तरी प्रत्यक्ष मैदानावर त्याची बॅट प्रेक्षकांच्या पैशांची दामदुपटीने वसुली करून देत असे.
सेहवागच्या फलंदाजीत सौन्दर्य नसेल पण विजेची चपळाई आणि कडकडाट जरूर होता. त्याने मारलेल्या फटक्यांवर चेंडू बंदुकीच्या गोळीच्या वेगाने सीमापार होत असे तेव्हा क्षेत्ररक्षक जागचे हालत नसत.
आपल्याकडे फारूक इंजिनिअर, संदीप पाटील यासारखे तितकेच स्फोटक फलंदाज होऊन गेले पण त्यांच्यात सातत्य नव्हते तसेच निग्रहाचा अभाव होता. कपिल देव जरी सेहवागच्या जातकुळीचा असला तरी मुख्यतः तो गोलंदाज होता.
२०१५ मध्ये निवृत्त झाल्यावर मैदानावरील अग्निवर्षाव थांबला असला तरी शाब्दिक ज्वाला मात्र अधूनमधून भडकत असतात कारण सेहवाग स्पष्टवक्ता आहे. त्या अर्थी हे इंडियन एक्सप्लोसिव्ह डिवाईज अजून धगधगतच आहे असे म्हणणे वावगे ठरू नये.
– रघुनंदन भागवत
(लेखक क्रीडा अभ्यासक आहेत)
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.