Home » माँ विंध्यवासिनीचा वासंतिक नवरात्रौत्सव….

माँ विंध्यवासिनीचा वासंतिक नवरात्रौत्सव….

by Team Gajawaja
0 comment
Navratri festival
Share

उत्तरप्रदेश राज्यातील मिर्झापूर येथील माता विंध्यवासिनी देवीच्या मंदिरात चैत्र नवरात्रौत्सवानिमित्त लाखो भाविकांनी गर्दी केली आहे.  आदिशक्तीच्या रुपात माता विंध्यवासिनीची पूजा करण्यात येते. या मंदिरस्थळाचे अवघे रुप बदलत चालले आहे.  विंध्याचल हे एक धार्मिक पर्यटन स्थळ आहे, येथे माता दुर्गेची अनेक मंदिरे पाहायला मिळतात. त्यातील माता विंध्यवासिनी देवी मंदिर हे मुख्य मंदिर आहे. याशिवाय विंध्याचलमधील अष्टभुजी देवी मंदिर, काली खोह मंदिर, सीता कुंड, विंध्याचलचे गंगाघाट येथेही भाविकांची गर्दी होत आहे. हा संपूर्ण परिसरच मंदिरांचा परिसर आहे. त्यामुळेच सरकारतर्फे येथे कॅरिडोअरची निर्मिती करण्यात येत आहे. देवीच्या मंदिराचे आणि आसपासच्या परिसराचे बदलणारे हे रुप भाविकांना सुखावत आहे. त्यामुळेच यावर्षीच्या चैत्र नवरात्रौत्सवात भाविकांनी येथे मोठी गर्दी केली आहे.  

मिर्झापूर येथील प्रसिद्ध असलेल्या विंध्याचल धाम येथे मंगला आरतीने वासंतिक नवरात्रौत्सवाची सुरुवात झाली. विंध्य पर्वतावर बसलेल्या माता विंध्यवासिनीची पूजा करण्यासाठी नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी गर्दी केली. मंगला आरतीपासून दर्शनासाठी पूजेसाठी भाविकांची झुंबड उडली. या सोहळ्यासाठी विंध्यवासिनी मंदिर 20 प्रकारच्या फुलांनी सजवले गेले. पहिल्या दिवशी 5 लाखांहून अधिक भाविकांनी येथे पूजा केल्याची माहिती देण्यात आली. 

विंध्य पर्वतावर विराजमान असलेल्या आदिशक्ती माता विंध्यवासिनीचा महिमा अमर्याद आहे. माता विंध्यवासिनीचे निवासस्थान मणिद्वीप नावाने प्रसिद्ध आहे. येथे आदिशक्ती माता विंध्यवासिनी, संपूर्ण शरीर घेऊन विराजमान आहे. देशातील अन्य शक्तीपीठांमध्ये देवी सतीच्या शरीराचा प्रत्येक अवयव गळून पडला आहे. माता विंध्यवासिनीचे हे सिद्धपीठ हे अनादी काळापासून ऋषी-मुनींचे सिद्धी प्राप्तीसाठी तपश्चर्याचे ठिकाण आहे. येथे देवीची चार रुपात आरती करण्यात येते. यामध्ये सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री आरती केली जाते. या प्रत्येक वेळी देवीला वेगवेगळ्या रुपात मानण्यात येते. यात सकाळी मुलांची, दुपारी तरुणांची, संध्याकाळी प्रौढांची आणि रात्री वृद्धांची पूजा केली जाते.

गेल्या काही वर्षापासून या माता विंध्यवासिनी मंदिरातील हा चैत्र नवरात्रौत्सव अधिक उत्साहात साजरा होत आहे.  त्यामागचे मुख्य कारण म्हणजे, 2018 मध्ये राज्य सरकारने नवरात्रौत्सवाला राज्यस्तरीय उत्सव  म्हणून घोषित केले आहे.  माता विंध्यवासिनीचे रुप हे अष्टभूजा धारीणी आहे.  या मंदिर परिसराचे सुशोभिकरण आणि त्यात होत असलेल्या सुविधांमुळे भाविकांची संख्या वाढली आहे.  काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या धर्तीवर विंध्याचल धामचे बांधकाम सुरू आहे. राम मंदिरापूर्वी विंध्याचल कॉरिडॉर तयार होईल अशी माहिती देण्यात आली आहे.   डिसेंबरपासून भाविकांना माँ विंध्यवासनीचे दिव्य दर्शन घेता येणार आहे.  येथील अरुंद गल्ल्या तोडून मातेच्या दरबाराला भव्य स्वरूप दिले जात आहे. यासाठी 400 कारागीर रात्रंदिवस काम करत आहेत. मंदिराभोवती 50  फूट रुंदीचे चार परिक्रमा मार्ग तयार करण्यात आले आहेत.  मध्यभागी मातेचे गर्भगृह आहे. परिक्रमा मार्गांची लांबी 100-200 मीटर आहे.  या मंदिराच्या परिसराचे सौदर्यीकरणाचे काम सुरु आहे.  मिर्झापूरच्या अहरौरा येथील गुलाबी दगडांचा वापर यासाठी केला जात आहे. दगडी स्लॅब राजस्थानच्या जयपूरमधून कोरीव काम करुन आणण्यात आले आहेत.  काशी विश्वनाथ कॉरिडॉर गंगा नदीतील रो-रो बोट (शिप) सेवेद्वारे विंध्याचल कॉरिडॉरशी जोडला जाणार आहे.  या मंदिराच्या परिसरात चालू असलेल्या या सर्व सुविधांमुळे परदेशी भाविकही मोठ्या संख्येनं देवीच्या मंदिराला भेट देण्यासाठी येत आहेत.  

======

हे देखील वाचा : स्वामी विवेकानंद यांनी साधना केलेले प्रसिद्ध मंदिर

=====

नवरात्रीच्या या नऊ दिवसात देवीची वेगवेगळ्या रुपात पूजा करण्यात येते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीच्या रूपात देवीची पूजा केली जाते. यामागे पौराणिक कथा सांगितली जाते. शैल म्हणजे पर्वत. पार्वती ही पर्वतांचा राजा हिमालयाची कन्या होती. हिमालयाच्या पर्वतराजाच्या कन्येला शैलपुत्री असेही म्हणतात. देवीच्या एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात कमळाचे फूल आहे. महाभारत काळापासून देवीची ख्याती आहे.  सृष्टीच्या आरंभापासून विंध्यवासिनींची पूजा केली जात असल्याची मान्यता आहे.  शिवपुराणात विंध्यवासिनी आईला सती मानले गेले आहे आणि श्रीमद भागवतात नंदजा देवी म्हणजेच नंद महाराजांची कन्या असे म्हटले आहे. आता याच अष्टभूजा विंध्यवासिनी देवीच्या मंदिरात लाखो भाविक गर्दी करत आहेत.  त्यातच या विंध्यवासिनी मंदिर परिसरात होत असलेल्या विकास कामांनी भाविकांना अधिक सुविधा मिळत आहेत, त्यामुळे भविष्यात येथे अधिक भाविकांची गर्दी होणार आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.