दुर्गाबाई भागवत म्हटलं की काही जण गप्प बसतात. कारण दुर्गाबाई हयात असतानाच त्यांनी त्यांच्या झटक्याचा असा काही अनुभव घेतला आहे की, तो अजूनही विसरता येत नाही. दुर्गाबाईंचा दराराच तसा होता ना! पण आज त्यांच्या जन्मदिनी (जन्म १० फेब्रुवारी १९१०) कशाला कटू आठवणी उगाळायच्या?
आपण आपलं पुण्यस्मरण करावं हे बरं. दुर्गाबाई भागवत म्हटलं की संतशब्द, साहित्याभ्यासक, ललितगंधकार, अनुवादक अशी त्यांची विविध रुपं डोळ्यासमोर येतात. परंतु दुर्गाबाई म्हटलं की, सर्वप्रथम डोळ्यासमोर येतं ते त्याचं ‘ऋतुचक्र’! सहा ऋतूंचे बारा महिने त्यांनी ज्या पध्दतीने उलगडून दाखवले ते वाचून कुणालाही वाटावं, हे ऋतूचे विभ्रम आपल्याला कसे कधी जाणवत नाहीत?
एका परीने दुर्गाबाईंनी लोकांना आकाशाकडे आणि परिसराकडे पहायला डोळसपणे शिकवले. आजही हे ऋतुचक्र अगदी पर्यावरणाचा ऱ्हास होऊनसुध्दा खुणावत राहतं. नवा वाचकही त्याकडे आकर्षित होतो, त्याचं कारण हेच आहे. दुर्गाबाई कुठलीही गोष्ट मनस्वीपणे करतात त्यामुळेच हे शक्य झाले असेल का?
ऋतचक्र ते अगदी बाणभट्ट यांच्या कांदबरी अनुवादापर्यंत दुर्गाबाईं भागवत यांचा प्रवास पाहता येतो. प्रत्येकाचे काहीना काही वेगळेपण आहे. या सर्वांमध्ये ‘कदंब’ प्रकाराचे वेगळेपण जे काही आहे ते और आहे. त्यासाठी ‘कदंब’ ची हकीकत सांगायलाच हवी.
कदंब वृक्षाचा वेगवेगळ्या अंगाने केलेला अभ्यास म्हणजे हे पुस्तक, असं थोडक्यात सांगता येईल. तरी सुध्दा त्याचे आणखी एक वेगळेपण आहे, हे चटकन एखाद्याच्या लक्षात ही येणार नाही. हे वेगळेपण म्हणजे या पुस्तकाची अर्पणपत्रिका! अर्पणपत्रिका असलेलं दुर्गाबाईचं हे एकमेव पुस्तक आहे. खुद्द दुर्गाबाईंनी म्हटलेलं आहे की, माझ्या बापाला देखील मी पुस्तक अर्पण केलेलं नाही. मग ‘कदंब’ बाबत त्यांना हा अपवाद का करावासा वाटला?
ही एक कथाच आहे. दुर्गाबाईंनी ‘कदंब’ लिहिलं आणि ते एकीने मी प्रकाशकांकडे नेते म्हणून त्यांच्याकडून नेलं. दुर्गाबाई बसल्या वाट पहात की, प्रकाशक त्यांना कळवतील, हस्तलिखित मिळालं म्हणून.पण तसं काही झालं नाही. शेवटी त्यांनी जीनं हस्तलिखित नेलं होतं तिलाच विचारलं. तेव्हा तिने कानावर हात ठेवले आणि, “मी हस्तलिखित नेलंच नाही”, असा पवित्रा घेतला.
====
हे देखील वाचा: सेवाभावी साधनाताई!
====
यावर दुर्गाबाई आता काय करू शकणार होत्या? ‘कदंब’ बाबतचा सर्वांगीण अभ्यास आता नव्याने आपल्याला करता येणार नाही, हे त्यांना स्पष्ट जाणवलं आणि ‘कदंब’ पुस्तक आता कायमचं गेलं, म्हणून त्या नामनिराळ्या झाल्या. हे असं दुर्गाबाईच करू जाणीत. पण एक दिवशी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे सेवक त्यांच्याकडे आले आणि तुमचे एक हस्तलिखित आहे, असे सांगितले.
ते ‘कदंब’चं हस्तलिखित पाहून दुर्गाबाई भागवत चक्रावूनच गेल्या. झाला प्रकार असा होता की, एक हस्तलिखित मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात कुणाला तरी मिळालं, पण त्यावर ना नाव ना पत्ता. त्यामुळे ते तसेच पडून राहिलं. एके दिवशी ते तिथल्या सेवकाने पाहिलं. हे अक्षर दुर्गाबाई भागवतांचे आहे, हे त्याने ओळखलं. अर्थात ते घेऊन तो दुर्गाबाईंकडे आला.
हे हस्तलिखित दुर्गाबाईंना परत मिळवून दिलं ते मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे सेवक म्हणजे मनोहर पारायणे! पारायणे यांची ही कामगिरी मोठीच होती. त्यांच्यामुळे ‘कदंब’ला जणू जीवनदान मिळालं होतं. हे स्मरून दुर्गा भागवत यांनी ‘कदंब’ मनोहर पारायणे यांना अर्पण केलं आहे. मनस्वीपणा हा दुर्गा भागवताच्या स्वभावाचा विशेष गुण होता. त्याचं अजून एक उदाहरण-
बाणभट्ट याच्या संस्कृत कादंबरीचा मराठी अनुवाद करणाऱ्या आणि ते पुस्तक उपलब्ध असणाऱ्या त्या एकमेव लेखिका आहेत. हा अनुवाद त्यांचे स्नेही प्रकाशक वरदा प्रकाशनाचे ह. अ. भावे यांच्या आग्रहापोटी केला होता. त्याच्याही पुढची गोष्ट म्हणजे या अनुवादात प्रकाशकांसाठी म्हणून लिहिता लिहिता त्याचा वेगळाच ग्रंथ झाला. असा अनुवाद दुर्गाबाईंच्या पुस्तकातच मिळू शकतो.
====
हे देखील वाचा: महात्मा गांधींनी बाबा आमटे याना ‘अभय साधक’ पदवी का दिली होती? ही आहे त्यामागची कहाणी
====
या संस्कृत कादंबरीच्या अनुवादाच्या वेळची गोष्ट. दुर्गाबाई बाणभट्टबद्दल ऐसपैस विस्ताराने लिहित होत्या. तेव्हा प्रकाशक ह.अ. भावे म्हणाले, “दुर्गाबाई काही ठिकाणी पुनरावृत्ती झाली आहे तेव्हा दुर्गाबाई म्हणाल्या”, असं दाखवा पाहू?”
भावे यांनी दाखवलं आणि त्यांना वाटलं, दुर्गाबाई आता त्यावर काट मारणार, पण दु्र्गाबाईंनी ती वाक्य बघितली आणि त्याअगोदर त्यांनी लिहिलं, “पुनरावृत्ती दोष पत्कारून मात्र सांगायचे आहे की…”, तर असं हे दुर्गा भागवत यांचं मनस्वीपण!
– रविप्रकाश कुलकर्णी
(जेष्ठ लेखक/ पत्रकार)