भुपेन हजारिका यांना आजच्या दिवशी म्हणजेच १८ फेब्रुवारी २००१ रोजी मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) पुरस्कार मिळाला होता. भुपेन हजारिका यांचा जन्म ५ सप्टेंबर १९२६ मध्ये आसाम मधील तीनसुकिया येथे झाला. त्यांच्या १० जणांच्या भावंडात भुपेनजी सर्वात मोठे होते. खरे तर त्यांच्या आईकडून त्यांना गाण्याची प्रेरणा मिळाली. त्यांचे लहानपण गुवाहटी मध्ये गेले. चित्रपट निर्माते ज्योतिप्रसाद अग्रवाल यांनी त्यांचा आवाज ऐकला, त्यांना त्यांचे गाणे आवडले आणि त्यांनी भुपेनजींना संधी दिली. १९३६ मध्ये कोलकता येथे भुपेनजी यांनी त्यांचे पहिले रेकॉर्डींग केले.
भुपेन हजारिका यांनी ज्योतिप्रसाद यांच्या ‘इंद्रनिल’ चित्रपटात दोन गाणी गायली. ते उत्तम गीतकार ही होते वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी पहिले गीत लिहिले. तेव्हापासून गायक, गीतकार, कंम्पोजर म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली होती. ते चित्रपट निर्मातेही होते. १९४२ मध्ये त्यांनी आर्टस् मधून शिक्षण घेतले तर पुढे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मधून एम. ए. केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर भुपेनजी यांनी ऑल इंडिया रेडिओवर गाणी गाण्यास सुरवात केली, त्यावेळी ते बंगाली गाण्यांचे हिंदीत भाषांतर करून गात असत. त्यांना अनेक भाषांचे ज्ञान असे आणि विशेष म्हणजे त्यांचे प्रत्येक गाणे हा वेगळा आविष्कार असे.
काही काळ त्यांनी स्टेजवर देखील कार्यक्रम केले. त्यांनी कोलंबिया युनव्हर्सिटीची पी एच डी मिळवली. अमेरिकेत असताना त्यांची ओळख प्रियवंदा पटेल यांच्याशी झाली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले, अमेरिकेत असतानाच त्याचे लग्न झाले. १९५२ मध्ये त्यांचा मुलगा तेज हजारिका याचा जन्म झाला. पुढे १९५३ मध्ये आपल्या कुटुंबासोबत ते भारतात परत आले. परंतु भारतात आल्यावर पती पत्नी फार काळ एकत्र राहू शकले नाहीत. त्यांनी गुवाहटी युनिव्हर्सिटी मध्ये प्राध्यापकांचे काम केले परंतु ते फार काळ शिक्षकांचे काम करू शकले नाहीत, त्यांनी पुढे आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. घरात पैसा येणे बंद झाला, त्याची चणचण भासू लागली त्यामुळे त्यांच्या पत्नी प्रियवंदा आणि ते विभक्त झाले. मग मात्र ते आणि संगीत यांची साथ आजन्म टिकली.
भुपेन हजारिका (Bhupen Hazarika) यांची संगीताची कारकीर्द खूप मोठी होती. भारतीय संगीतात त्यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांनी रुदाली, मिल गई मंझिल मुझे, साज दरमिया, गजगामिनी, दमन, आणि क्यों या चित्रपटातून अजरामर गाणी दिली. भुपेन हजारिका यांनी त्यांच्या आयुष्यात १००० गाणी लिहिली. तसेच १५ पुस्तके लिहिली.
त्यांनी स्टार टीव्हीसाठी ‘डॉन’ या सिरियलची निर्मिती देखील केली. त्यांच्या संगीत क्षेत्रातील अद्बभूत योगदानाबद्दल त्यांना अनेक अवॉर्डस मिळाले आहेत. १९७५ मध्ये त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. १९७५ मध्ये चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला, तर २०११ मध्ये त्यांना पद्म भूषण पुरस्कार मिळाला.
भुपेन हजारिका यांचे ५ नोव्हेंबर २०११ रोजी मुंबईत निधन झाले. २०१९ मध्ये त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळाला. आजही भुपेन हजारिका यांची गाणी ऐकली की आपण मंत्रमुग्ध होतो. त्यांची रुदाली मधील गाणी कोणीही विसरू शकणार नाही.
सतीश चाफेकर