भारत हा अतिशय धार्मिक आणि आस्तिक लोकांचा देश आहे. बहुतकरून हिंदू लोकांची संख्या जास्त असणाऱ्या या देशामध्ये मंदिरांना अनन्यसाधारण महत्व आहे. मंदिरांचा देश म्हणून देखील भारताचाही एक विशेष ओळख आहे. प्रत्येक गावात, शहरात, राज्यात एक तरी खास मंदिर असतेच असते. अगणित मंदिरं असलेल्या या देशामध्ये काही निवडक मंदिरांना खूपच महत्व आहे. संपूर्ण देशातील काही मोजकी मंदिरं अशी आहेत, ज्याचा इतिहास, प्रचिती, शास्त्र हे खास आहे. त्यामुळेच ही मंदिरं खास आहेत. यातलेच एक मंदिरं म्हणजे आंध्रप्रदेशमधील तिरुपती बालाजी मंदिर. (Tirupati Balaji)
दक्षिण भारतातील सर्व मंदिरं ही त्यांच्या भव्यता, विलक्षण रचना आणि सुंदरतेमुळे प्रसिद्ध आहेत. दक्षिण भारतात अनेक मंदिरं आहेत, परंतु तिरुपती बालाजीचे मंदिर हे खास आणि सर्वात जास्त लोकप्रिय आहे. तिरुपती बालाजीचे मंदिर आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आहे. हे मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक मानले जाते.
या मंदिरात दररोज लाखो-कोटींचे दान दिले जाते. हे मंदिर अतिशय जाज्वल्य मानले जाते. देश विदेशातील अनेक प्रख्यात लोकं देखील या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. या मंदिरात येणाऱ्या दानाची नेहमीच चर्चा होते. मात्र या तिरुपती बालाजी मंदिराशी संबंधित अनेक अनोख्या गोष्टी आणि गुपितं आहेत, ज्याची उत्तरं आजही मिळालेली नाही.
चित्तुर जिल्ह्यात आसलेल्या तिरुमला पर्वातावर उभे असलेले हे मंदिर भारतातील सर्वात प्रमुख आणि पवित्र तीर्थस्थळांपैकी एक आहे. या मंदिराचे मुख्य देव श्री व्यंकटेश्वर स्वामी आहेत, जे स्वतः भगवान विष्णूचे अवतार मानले जातात आणि तिरुमला पर्वतावर त्यांची पत्नी पद्मावतीसोबत राहतात. तिरुपतीच्या चारही बाजूला असलेल्या डोंगररांगाना शेषनागाचे सात फण मानले जातात. या डोंगररांगाना सप्तगिरी असं म्हटलं जातं. श्री व्यंकटेश्वराचं मंदिर हे सप्तगिरीच्या सातव्या डोंगरावर आहे. चला तर जाणून घेऊया या गुपितांबद्दल.
- समुद्रसपाटीपासून ३२०० फूट उंचीवर तिरुमाला टेकड्यांवर श्री वेंकटेश्वर मंदिर बांधले आहे. अनेक शतकांपूर्वी बांधलेले हे मंदिर दक्षिण भारतीय वास्तुकला आणि कलाकुसरचे एक अद्भुत उदाहरण आहे. बालाजीची मूर्ती दगडी आहे. या मंदिराचा गाभारा अतिशय थंड आहे. मात्र, तरीही या मूर्तीला घाम येतो. घामाचे थेंब आपल्याला अगदी स्पष्ट दिसतात.
- लोकांच्या मान्यतेनुसार, या मंदिरात असलेली काळ्या रंगाची ही मूर्ती कोणीही तयार केली नसून ती स्वतः जमिनीतून प्रकट झाली असल्याचे सांगितले जाते. स्वयंभू मूर्ती असल्याने या मूर्तीचे विशेष महत्त्व आहे.
- अशी मान्यता आहे की बालाजीसोबतच देवी लक्ष्मीदेखील इथे वास करते. म्हणूनच भगवान बालाजीला स्त्री आणि पुरुष दोघांचेही वस्त्र परिधान केले जातात. बालाजीला खाली धोतर आणि वर साडी नेसून सजवले जाते.
- बालाजीच्या हृदयात लक्ष्मी देवीचा वास आहे, अशी एक मान्यता आहे. दर गुरुवारी तिरूपति बालाजीचे सर्व शृंगार काढून चंदनाचा लेप लावून आंघोळ घातली जाते तेव्हा त्या मूर्तीत लक्ष्मी देवीची छबी दिसून येते.
- तिरुपती बालाजीच्या मूर्तीला केस आहे. मुख्य म्हणजे मूर्तीवरील हे केस खरे असल्याचे सांगितले जाते. त्या केसांचा कधीच गुंता होत नाही.
- बालाजीच्या मंदिराची रचना अशी आहे की बाहेरचा आवाज गाभाऱ्यात येत नाही. पण अशी मान्यता आहे की, भगवान बालाजीच्या मूर्तीजवळ कान लावून ऐकल्यावर आपल्याला समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो. मात्र या मंदिराच्या जवळपास कुठेही समुद्र नाही.
- तिरुपती बालाजीच्या मंदिरातील दिवा हा नेहमी तेवत राहो. या दिव्यात कधीच कोणी तेल किंवा तूप टाकत नाही. वर्षानुवर्षे जळत असलेला दिवा कधी आणि कोणी पहिले लावला, हे अद्याप कोडच आहे.
- या मंदिरात उजव्या बाजूला एक काठी ठेवली जाते ज्याने बालाजींना लहानपणी एकदा मारले गेले होते. काठीने मारल्यामुळे देवाच्या हनुवटीवर जखम झाली होती. या कारणास्तव त्याच्या हनुवटीवर चंदनाचा लेप केला जातो.
- तिरुपती बालाजींना पचाई नावाचा कपूर लावला जातो. या कापूर बद्दल असे म्हटले जाते की जर ते कोणत्याही दगडावर लावले तर काही वेळात दगडांना भेगा पडतात, पण या पचाई कापूरचा बालाजीच्या मूर्तीवर कोणताही परिणाम होत नाही.
- बालाजी गर्भगृहात मधोमध उभे दिसतात: जेव्हा आपण तिरूपती बालाजीला बाहेरुन पाहतो त्यावेळी ते गर्भगृहात मधोमध उभे असल्याचे दिसून येते. पण खरं तर बालाजीची मूर्ती ही उजव्या बाजूला एका कोपऱ्यात आहे.
- भगवान बालाजीच्या मंदिरापासून 23 किमी अंतरावर एक गाव आहे आणि येथे बाहेरील लोकांना प्रवेश नाहीये. येथे लोक खूप नियम आणि संयमाने राहतात. बालाजीला अर्पण करण्यासाठी इथूनच फळे, फुले, दूध, दही आणि तूप दिले जाते.
======
हे देखील वाचा : श्रावण महिना आणि त्याचे महत्व
=======
- भगवान श्रीकृष्ण आणि विष्णूला तुळस अत्यंत प्रिय आहे. बालाजी मंदिरातही पूजेमध्ये तुळशीच्या पानांचे विशेष महत्त्व आहे. सर्व मंदिरांमध्ये देवाला अर्पण करण्यात आलेले तुळशी पत्र नंतर प्रसाद स्वरुपात भक्ताला परत दिले जाते. पूजा झाल्यानंतर तुळशी पत्र मंदिराजवळील एक विहिरीत टाकले जाते.
- मंदिरात बालाजीचे दिवसातून तीन वेळेस दर्शन होते. पहिले दर्शन विश्वरूप, जे सकाळी होते. दुसरे दर्शन दुपारी आणि तिसरे दर्शन रात्री होते. या व्यतिरिक्त इतरही दर्शन आहेत.भगवान बालाजीच्या पूर्ण मूर्तीचे दर्शन केवळ शुक्रवारी सकाळी अभिषेक करताना केले जाऊ शकते.