तिबेटला जगाचे छप्पर म्हणून ओखळण्यात येते, ते त्याच्या हवामानामुळे. जगाचा तिसरा ध्रुव अशीही तिबेटची ओळख आहे. जगातील पिण्यायोग्य गोड पण्याचा तिसरा सर्वात मोठा स्रोत याच तिबेटमध्ये आहे. तिबेट हे आशिया खंडातील सहा सर्वात मोठ्या नद्यांचे उमगस्थान आहे. या सहा नद्या जगातील २० टक्के लोकसंख्येच्या पाण्याची गरज पूर्ण करतात. या सहा नद्यांव्यतिरिक्तही तिबेटमधून अन्य काही लहान नद्या आणि तलाव आहेत. जगातील सर्वात स्वच्छ पाण्याचा स्रोत असलेल्या याच तिबेटच्या नद्या आणि तलाव सध्या तिबेट, भारत आणि चीनसाठीही धोकादायक ठरु लागल्या आहेत. (Tibet)
त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे, या नद्यांमध्ये आणि तलावांमध्ये होणारा मोठा पाण्याचा साठा. तिबेटच्या आसपास असणा-या हिमनद्या मोठ्या प्रमाणात वितळू लागल्या आहेत. याचा परिणाम म्हणजे, तिबेटमधील नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. तर तिबेटमधील तलाव हे गेल्या काही वर्षात चौपट पाण्यानं भरलेले आढळून आले आहेत. बदलत्या हवामानाचा हा परिणाम असून हिमनद्या वितळण्याचे प्रमाण असेच वाढले तर हे तलाव फुटण्याचाही धोका आहे.
असे झाले तर या पाण्यामुळे तिबेट, भारत आणि चीन या देशांना मोठा धोका निर्माण होणार आहे. सोबतच तिबेटमधून ज्या नद्यांचा उगम होत आहे, त्या नद्यांमधीलही पाण्याचा प्रवाह वाढत चालला आहे. त्यामुळे या नद्या ज्या प्रांतातून वाहत आहेत, त्या भागातील मोठा भुपृष्ठ पाण्याखाली जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
तिबेटच्या उंच पर्वतरांगांमध्ये असलेले तलाव बघण्यासाठी हजारो पर्यटक या भागाला भेट देत आहेत. पण हे तिबेटचे तलाव हवामान बदलामुळे धोकादायक ठरले आहेत. या भागातील हिमनद्या वितळल्याने तिबेटची शोभा असणारे तलाव अब्जावधी टन अतिरिक्त पाण्याने भरण्याची शक्यता आहे. याचा गंभीर परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Tibet)
हिमालयाच्या कुशीत वसलेल्या तिबेटला हवामान बदलाचा फटका बसला आहे. वाढत्या उष्णतेमुळे हिमनद्या झपाट्याने वितळत आहेत. त्यातच या भागात पावसाचे प्रमाणही वाढले आहे. या सर्वांमुळे अतिरिक्त अब्जावधी टन पाणी नयनरम्य तलावांमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. या तलावांचा आकार वाढण्यास सुरुवात झाली आहे. याचा पहिला फटका चीनला बसणार आहे. त्यासोबत भारताचेही नुकसान होणार आहे. यासंदर्भात ‘नेचर जिओसायन्स‘ या जर्नलमध्ये एक शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. त्यात या शतकाच्या अखेरीस, किंघाई-तिबेट पठार परिसरात असलेल्या काही तलावांचे क्षेत्रफळ ५० टक्क्यांनी वाढेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. (Tibet)
या अहवालानुसार तलावांची पाणी साठवण क्षमता ६०० अब्ज टनांनी वाढणार आहे. यामुळे पहिला फटका चीनला बसणार आहे. कारण चीनने तिबेटमध्ये मोठी आर्थिक गुंतवणूक केली आहे. या तलावातील पाणी वाढल्यास ते फुटण्याची शक्यता आहे, असे झाल्यास तिबेटमधली मनुष्यवस्तीस जेवढा धोका आहे, तेवढाच तेथील विकास कामांनाही फटका बसणार आहे. आत्ताच या तलवांचे क्षेत्रफळ २०२० च्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक वाढल्याचे पाहणीत स्पष्ट झाले हे. तसेच तलावातील पाण्याची पातळीही सुमारे १० मीटरने वाढली आहे. (Tibet)
चीन, वेल्स, सौदी अरेबिया, अमेरिका आणि फ्रान्सचे शास्त्रज्ञही सध्या तिबेटमधील या हवामान बदलाचा अभ्यास करीत आहेत. पुढच्या काही वर्षात येथील जलसाठ्यात चौपट वाढ होणार आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रयत्न न केल्यास, “एक हजार किलोमीटरहून अधिक रस्ते, सुमारे ५०० वस्त्या आणि १० हजार चौरस किलोमीटरचे पर्यावरण जसे की गवताळ प्रदेश, दलदल आणि शेततळे पाण्याखाली जातील.” असे त्यांनी सांगितले आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, तलावांचा आकार वाढल्यामुळे चीनला जेवढा धोका आहे, तसाच भारतालाही आहे. कारण भारतात वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रेसह अनेक मोठ्या नद्यांचे उगमस्थान तिबेट आहे. तिबेटच्या किंघाई-तिबेट पठाराला ‘आशियाचे जलस्तंभ‘ म्हटले जाते. (Tibet)
===========
हे देखील वाचा : मेक्सिकोच्या राष्ट्रपती म्हणून एका महिलेची निवड
===========
जगातील सर्वात उंच पठारावर एक हजाराहून अधिक पाण्याचा साठा असलेली छोटी मोठी तलाव आहेत. हे तलाव हिमनद्यांच्या पाण्यांनी एक होण्याचा धोका आहे. तिबेटमधून उगम पावणाऱ्या नद्यांची संख्याही मोठी आहे. त्यात ब्रह्मपुत्रा नदी म्हणून ओळखली जाणारी, यारलुंग झांगबो ही नदी प्रमुख आहे. या विशाल नदीमध्ये हिमालयातील सर्वात मोठा धबधबा असून त्याची ३० मीटर आहे. तशीच यार्लुंग झांगबो नदीयार्लुंग झांगबो नदीही मोठी आहे. (Tibet)
अरुणाचल प्रदेश राज्यात वाहत ही नदी बंगालच्या उपसागराकडे जाताना गंगेला सामील होते. तिबेटमध्ये ग्याल्मो न्गुलचू म्हणून ओळखली जाणारी, सालवीन नदी, जगातील १२ वी सर्वात मोठी नदी असणारी मेकाँग नदी, यांगत्से नदी, यलो नदी, सिंधू नदी, सतलज नदी, इरावडी नदी, भोटे कोसी नदी, अरुण नदी, कर्नाळी नदी, त्रिशूली नदी अशा अनेक नद्यांचे उगम स्थान तिबेट आहे. या सर्वच नद्यांमध्ये हिमनद्यांचे पाणी वितळून अधिक पाणी येण्याची भीती आहे. असे झाले तर पुढच्या काही वर्षात या नद्यांच्या काठावरील मनुष्यवस्तीला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होणार आहे.
सई बने