Home » ‘या’ मंदिरात श्रीकृष्णाचा आहे वास…

‘या’ मंदिरात श्रीकृष्णाचा आहे वास…

by Team Gajawaja
0 comment
Temple
Share

केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील भगवान श्रीकृष्णाच्या मंदिराला दक्षिणेची द्वारका म्हटले जाते.  5000 वर्ष जुने असलेल्या या श्रीकृष्ण मंदिरात आजही पुरातन काळापासून चालत आलेल्या परंपरा जोपासल्या जातात.  मंदिरात फक्त हिंदू धर्मियांना प्रवेश असून प्रत्यक्ष श्रीकृष्णाचा या मंदिरात वास आहे, अशी भावना भक्तांची आहे.  या मंदिरात भगवान श्रीकृष्णाला भक्त त्यांच्या वजनाएवढ्या वस्तू अर्पण करतात.  हे मंदिर म्हणजे गुरुवायूर मंदिर.  गुरुवायूर हे केरळमधील लोकप्रिय तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. या मंदिराचे दैवत भगवान गुरुवायुरप्पन आहेत, जे भगवान कृष्णाचे बालस्वरूप मानले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दक्षिणेची द्वारका असलेल्या गुरुवायूर मंदिरात जाऊन प्रार्थना केली. तसेच आपल्या वजनाएवढी कमळ फुले मंदिरात अर्पण केली. (Temple)

भगवान श्रीकृष्णाची दक्षिण राज्यातील जी महत्त्वाची मंदिरे आहेत, त्यामध्ये गुरुवायूर मंदिराचा प्रामुख्यानं उल्लेख होतो.  पाच हजार वर्ष जुने असलेल्या या मंदिराची पुर्नबांधणी 1638 साली करण्यात आली.  या मंदिराची स्थापत्यशैली बघण्यासाठीही अनेक भाविक आणि अभ्यासक मंदिराला भेट देतात.  मंदिराच्या पूर्वेकडे दोन गोपुरम म्हणजेच मंदिराचे प्रवेशद्वार आहेत.  त्यापैकी एक गोपुरम पूर्वाभिमुख आहे.  त्याला स्थानिक भाषेत किझाक्के नाडा म्हणतात.  तर दुसरे गोपुरम पश्चिमेकडे आहे.  त्याला पडिंजरे नाडा म्हणतात. 

मंदिराच्या समोर असलेल्या चौकात नलंबलम म्हणजेच चौकोनी खांब आहेत.  मंदिराच्या पूर्व दिशेला प्रकाशस्तंभ आहेत. मंदिराच्या आतील भागातही असे अनेक दिव्याचे खांब आहेत.  मंदिराच्या पूर्वेकडे असलेला दीपस्तंभ 24 फूट उंच आहे.  हा दीपस्तंभ जेव्हा दिव्यांनी प्रज्वलित होतो, तेव्हाचे दृष्य बघण्यासाठी हजारो भाविक गर्दी करतात.  या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील 70 फूट उंच असलेला ध्वजस्तंभ.  हा ध्वजस्तंभ सोन्याचा आहे. या मंदिरात भगवान श्रीकृष्णासह भगवान गणपती, भगवान अयप्पा आणि इदत्तदत्त कविल भगवती यांच्याही मूर्ती आहेत.  मुख्य म्हणजे, मंदिरात पुरातन काळापासून चालू असलेल्या पुजा आजही करण्यात येतात.  मंदिर पहाटे 3 वाजता भक्तांसाठी खुले करण्यात येते.  (Temple)

या मंदिराच्या नावाबद्दल थोडं जाणून घेऊया.  गुरु म्हणजे देवगुरु बृहस्पति, वायु म्हणजे भगवान वायुदेव आणि ऊर हा मल्याळम शब्द आहे.  या शब्दाचा अर्थ जमीन असा आहे.  ज्या भूमीवर देवगुरु बृहस्पतीने वाऱ्याच्या साहाय्याने स्थापना केले ते मंदिर. गुरुवायूर शहर आणि भगवान गुरुवायुरप्पन यांच्याबद्दल एक लोकप्रिय आख्यायिकाही आहे.  त्यानुसार कलियुगाच्या सुरुवातीला गुरु बृहस्पती आणि वायुदेव यांना भगवान श्रीकृष्णाची मूर्ती सापडली होती.

मानवाच्या कल्याणासाठी वायू देव आणि गुरु बृहस्पती यांनी एका मंदिराची निर्मिती केली, आणि त्यात या मुर्तीची स्थापना केली.  मंदिरात मुर्तीची स्थापना केल्यावर गुरु बृहस्पती आणि वायुदेव यांनी आपल्या नावावरुन  भगवान श्रीकृष्णाचे  गुरुवायुरप्पन हे नवीन नाव ठेवले.  तसेच ज्या शहरात मंदिर उभारले त्यालाही गुरुवायूर असे नाव ठेवले.  काही धार्मिक ग्रंथानुसार कलियुगापूर्वी द्वापार युगात श्रीकृष्णाच्या काळातही ही मूर्ती अस्तित्वात होती. 

गुरुवायुर मंदिरात (Temple) असलेली भगवान कृष्णाची मुर्ती अन्य ठिकाणी असलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या मुर्तीपासून वेगळी आहे.  या मुर्तीला चार हात आहेत.  यामध्ये भगवान श्रीकृष्णाने एका हातात शंख, दुसऱ्या हातात सुदर्शन चक्र, तिसऱ्या हातात कमळ आणि चौथ्या हातात गदा धारण केली आहे.  मंदिरात कृष्णाच्या बालपणीच्या घटनांची आठवण करुन देणारी भव्य चित्रे काढण्यात आली आहेत. त्यामुळेच या मंदिराला भूलोका वैकुंठ म्हणजे पृथ्वीवरील वैकुंठ जग असेही म्हणतात.

=============

हे देखील वाचा : जगातील अनोखे रेस्टॉरंट, नकारात्मक विचार करणाऱ्याच मंडळींचे केले जाते स्वागत

=============

गुरुवायूर मंदिर (Temple) गुरपु विश्वकर्मा यांनी स्वतः बांधल्याचीही माहिती आहे.  मंदिरात सूर्याची पहिली किरणे थेट भगवान गुरुवायूरच्या पायावर पडतात. हे दृश्य बघण्यासाठी मंदिरात पहाटे भाविकांची गर्दी होते.  

केरळमध्ये पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या लिस्टमध्ये गुरुवायूर मंदिर (Temple) पहिल्या स्थानावर असते.  मंदिरात होणारे वेगवेगळे महोत्सव हे अनोख्या परंपरा जपणारे असतात.  यात मंदिरात होणारी हत्तींची पूजा, स्थानिक लोककलाकारांचा उत्सव, विष्णुची विविध रुपे दाखवणारी लोककला आणि त्यांचे सादरीकरण आदी विविध कारणांनी हे मंदिर पर्यटकांना आकर्षित करते.  मुख्य म्हणजे, या मंदिराचा परिसर नितांत सुंदर आहे.  मंदिरात स्वच्छतेची खूप काळजी घेण्यात येते.  पहाटेपासून येथे भाविक येतात.  दुपारी काहीकाळ बंद असलेल्या मंदिरात प्रवेश घेण्यासाठी भक्तांना भारतीय पोशाख आवश्यक असतो.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.