Home » Salman Rushdie : पुन्हा ‘सॅटनिक व्हर्सेस’ चे वादळ !

Salman Rushdie : पुन्हा ‘सॅटनिक व्हर्सेस’ चे वादळ !

by Team Gajawaja
0 comment
Salman Rushdie
Share

वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांचे प्रसिद्ध पुस्तक सॅटॅनिक व्हर्सेस पुन्हा चर्चेत आले आहे. या पुस्तकावर 36 वर्षापूर्वी प्रथम भारतात बंदी घालण्यात आली होती. आता ही बंदी उठवण्यात आली असून भारताच्या राजधानीत सलमान रश्दी लिखित सॅटॅनिक व्हर्सेस हे पुस्तक मिळू लागले आहे. ही फक्त बातमी वाटत असली तरी सॅटॅनिक व्हर्सेस आणि त्याचे लेखक सलमान रश्दी हे दोन्हीही एका वादळासारखे आहेत. सॅटॅनिक व्हर्सेसवर बंदी घालणारा भारत हा जगातील पहिला देश होता. ब्रिटनमध्ये या कादंबरीचे प्रकाशन सुरू झाल्यानंतर अवघ्या नऊ दिवसांतच या कादंबरीच्या आयातीवर भारतात बंदी आली. (Salman Rushdie)

त्यावेळी राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली सरकार केंद्रात होते. सॅटॅनिक व्हर्सेसवर भारतानं बंदी घातल्यावर इराणनं सलमान रश्दी यंच्याविरुद्ध फतवा जाहीर केला. वर्षापूर्वी त्यांच्यावर हल्लाही करण्यात आला आहे. मात्र या पुस्तकाच्या खपावर त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही. उलट सॅटॅनिक व्हर्सेस भारत वगळता, जगभर अधिकच विकले गेले. आता याच बंदीविरोधात न्यायालयात दाद मागण्यात आली होती. त्यात पक्षकाराच विजय झाला असून सॅटॅनिक व्हर्सेस नवी दिल्लीतील बहरीसन बुक स्टोअरमध्ये उपलब्ध झाले आहे. अर्थात या पुस्तकावर बंदी आणावी अशी मागणीही होऊ लागली आहे. मात्र जगभर मोठ्या प्रमाणात विकत असलेल्या पुस्तकाला भारतात बंदी कशाला हा प्रश्न न्यायालयानं विचारल्यानं सॅटॅनिक व्हर्सेसला विरोध करणा-यांची गोची झाली आहे. (International News)

36 वर्षांपूर्वी भारतात बंदी घालण्यात आलेले लेखक सलमान रश्दी यांचे सॅटॅनिक व्हर्सेस या कादंबरीची पुन्हा भारतात विक्री सुरू झाली आहे. सलमान रश्दी यांची ही कादंबरी प्रकाशित होताच यावरून जगभरात वाद सुरू झाला. भारतीय वंशाचे ब्रिटिश-अमेरिकन कादंबरीकार सलमान रश्दी यांनी लिहिलेली ही कादंबरी 26 सप्टेंबर 1988 रोजी, इंग्लंडच्या वायकिंग पेंग्विन पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केली. ही कादंबरी येताच जगभर त्याच्यावरुन मोठा गदारोळ उठला. सॅटॅनिक व्हर्सेसच्या अनेक प्रती जाळण्यात आल्या. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांनी 14 फेब्रुवारी 1989 रोजी रश्दी यांच्या विरोधात फतवा जारी केला. त्यामुळे रश्दी यांच्यावर अनेक हल्ले झाले. रश्दी हे ब्रिटीश सरकारच्या संरक्षणाखाली असले त्यांच्यावर ऑगस्ट 2022 मध्ये न्यूयॉर्कमधील एका शैक्षणिक संस्थेत चाकूने हल्ला झाला. त्यातून ते बचावले असले तरी त्यांच्या डोळ्यावर जखमेची खूण राहिली आहे. (Salman Rushdie)

सॅटॅनिक व्हर्सेसला जगभर विरोध होत असतांना त्याची भारतातील कथा वेगळी आहे. सॅटॅनिक व्हर्सेसवर बंदी घालणारा भारत हा पहिला देश होता. अगदी या कादंबरीचे ब्रिटनमध्ये तिचे प्रकाशन झाल्यानंतर अवघ्या नऊ दिवसांतच सॅटॅनिक व्हर्सेसच्या आयातीवर भारतात बंदी घालण्यात आली. हा निर्णय तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी घेतला. या कादंबरीमुळे देशातील शांतता बिघडू शकते, असे कारण पुढे कऱण्यात आले. या कादंबरीच्या काही भागांमध्ये इस्लाम धर्म आणि पैगंबर यांचा कथित अनादर आणि निंदा करण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे जगभरातून सॅटॅनिक व्हर्सेस कादंबरीला विरोध होऊ लागला. मात्र सॅटॅनिक व्हर्सेसला जेवढा विरोध होऊ लागला तिथेच या कादंबरीची विक्रमी विक्री होऊ लागली. आतापर्यंत जगभरात 10 लाख प्रती विकल्या गेल्याची माहिती आहे. जगभरातील पुस्तक विक्री केंद्रात हे पुस्तक विक्रीस असले तरी भारात ते नव्हते. (International News)

कोलकाता येथील 50 वर्षीय संदीपन यांनी या बंदीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 2017 मध्ये ही कादंबरी विकत घेण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तकांच्या दुकानांना भेटी दिल्या. त्यावेळी त्यांना या पुस्तकावर बंदी घातल्याची माहिती मिळाली. मग बंदीचे कारण शोधण्यासाठी त्यांनी प्रथम मंत्रालयाला सार्वजनिक माहितीची विनंती पाठवली. ही विनंती दुसऱ्या मंत्रालयाकडे पाठवण्यात आली. आणि संदीपन यांना सॅटॅनिक व्हर्सेस या पुस्तकाच्या विक्रीवर भारतात कुठलीही बंदी नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर संदिपन यांनी 2019 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने संबंधित आदेश सादर करण्यास सांगितले. पण 5 ऑक्टोबर 1988 रोजी जारी केलेला मूळ आदेश सापडला नाही. हे स्पष्ट झाल्यावर नोव्हेंबर 2024 मध्ये न्यायालयाने सॅटॅनिक व्हर्सेसवर बंदी घालणारा कोणताही सरकारी दस्तऐवज नसल्याचे सांगत दिल्ली उच्च न्यायालयाने सॅटॅनिक व्हर्सेस पुस्तकाच्या विक्रीवर असलेली विक्री बंदी उठवण्याचा निर्णय सुनावली. (Salman Rushdie)

=======

हे देखील वाचा : America : ट्रम्पना हवा आहे बर्फाचा देश !

Paper Mache : काश्मिरच्या कलाकारांची कला जगभर

=======

या निर्णयाच्या सुमारे दीड महिन्यानंतर सॅटॅनिक व्हर्सेस भारतात मर्यादित प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. दिल्लीच्या सुप्रसिद्ध बहरीसन बुक स्टोअरमध्ये हे पुस्तक वाचकांसाठी उपलब्ध आहे. सॅटॅनिक व्हर्सेस पुस्तकावर जगभर वाद असले तरी या पुस्तकानं अनेक पुरस्कार जिंकले आहेत. 1988 मध्ये पुस्तक बुकर पुरस्कारासाठी नामांकित झाले. त्याच वर्षी व्हिटब्रेड पुरस्कार पुस्तकाला मिळाला. या सर्वांमुळे पुस्तकाच्या खपात वाढ झाली. आता नव्यानं हे पुस्तक भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाल्यानं वादही सुरु झाले आहे. मुस्लिम धर्मगुरुनी यासंदर्भात इशारा देत पुस्तकावर बंदी कायम ठेवावी अशी मागणी केली आहे. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.