Home » बद्रीनाथचे प्रवेशद्वार पाण्याखाली जाईल असा धोका…

बद्रीनाथचे प्रवेशद्वार पाण्याखाली जाईल असा धोका…

by Team Gajawaja
0 comment
Entrance to Badrinath
Share

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील जोशीमठ हे चार धामचे मुख्य देवस्थान, बद्रीनाथचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे शहर पाण्याखाली जाईल असा धोका निर्माण झाला आहे. धर्मनगरी जोशीमठ येथील दरड कोसळण्याचे प्रकरण आता पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पीएम ओमध्ये मोठी बैठक झाली. बैठकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याबरोबर बोलून परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतली.  जोशीमठ भागातील जवळपास 530 घरांना धोका निर्माण झाला असून सर्व घरांना तडे पडले आहेत. याशिवाय गंभीर म्हणजे, जोशीमठ येथील ज्योतिर्मठ संकुलावर दरड कोसळल्यानंतर आता शंकराचार्य माधव आश्रम मंदिरालाही भेगा पडल्या आहेत. लक्ष्मी नारायण मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या संकुलातील इमारतींना मोठ्या भेगा पडल्या आहेत. या संकुलात गुंफा, त्रिपुरसुंदरी राजराजेश्वरी मंदिर आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्यांची गादी आहे.

दरम्यान ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद महाराज यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. जोशीमठामध्ये घरांना आणि रस्त्यांना मोठमोठे भेगा पडल्याने घबराटीचे वातावरण आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर सर्व प्रकारची विकास कामे विनाविलंब थांबविण्यात आली आहेत.(Entrance to Badrinath)

उत्तराखंडमधील जोशीमठमध्ये भूस्खलनाच्या घटना आता गंभीर समस्या झाली आहे.  जोशीमठ हे उत्तराखंडच्या हिमालयाच्या प्रदेशात 1890  मीटर उंचीवर आहे. या लहान शहराची लोकसंख्या 20,000 पेक्षा जास्त आहे. हे शहर नाजूक डोंगर उतारावर असून अनियंत्रित विकास प्रकल्पांमुळे संकटात सापडले आहे. अलिकडच्या वर्षांत येथे बांधकाम आणि लोकसंख्या या दोन्हीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. काही वर्षात येथे जमीन धसण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि आता परिस्थिती भयावह आहे. परिसरातील 500 हून अधिक घरांना भेगा पडल्या आहेत, जमीनीला मोठ्या भेगा पडल्या आहेत आणि रस्तेही मोठ्या भेगांनी दुभागले आहेत.   जमीन खचल्यामुळे उत्तराखंड सरकारने जोशीमठ आणि आसपासच्या परिसरात बांधकामांवर बंदी घातली आहे. एनटीपीसीच्या जलविद्युत प्रकल्पामुळे ही समस्या निर्माण झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. जोशीमठमधील हॉटेल आणि कार्यालयेही या सर्वांत पडली असून स्थानिकांसमोर रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे.  

जोशीमठ हे धौलीगंगा आणि अलकनंदा नद्यांनी वेढलेल्या डोंगराच्या मधल्या उतारावर वसलेले आहे. उत्तराखंड राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (USDMA) च्या अभ्यासानुसार, जोशीमठ भूस्खलन-प्रवण क्षेत्रात आहे आणि 1976 मध्ये मिश्रा आयोगाच्या अहवालात येथे प्रथम जमिन धसल्याची घटना नोंदवण्यात आली. जोशीमठ शहराच्या सभोवतालचा परिसर ओव्हरबर्डन सामग्रीच्या जाड थराने व्यापलेला आहे.  जून 2013 आणि फेब्रुवारी 2021 च्या पूर घटनांचाही येथील भूस्खलन क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे.  17 ऑक्टोबर 2021 रोजी जोशीमठ येथे 24 तासांत 190 मिमी पावसाची नोंद झाली.  तेव्हा भूस्खलन क्षेत्र आणखी कमकुवत झाल्याचे अहवालात नोंद करण्यात आले आहे.  मात्र असे असले तरी एनटीपीसीच्या जलविद्युत प्रकल्पामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे जोशीमठ येथील स्थानिकांचे मत आहे. (Entrance to Badrinath)

जोशीमठमध्ये जमीन खचल्याने आता पाणीही बाहेर येऊ लागले आहे. येथे भूजल गळती सातत्याने होत आहे. कडाक्याच्या थंडीत लोकांना घराबाहेर राहावे लागत आहे. घर कधीही कोसळण्याची भीती त्यांना आहे. जोशीमठच्या रविग्राम, गांधीनगर आणि सुनील वॉर्डात याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. प्रशासन आणि राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांसह तज्ज्ञांच्या पथकाने जोशीमठमधील बाधित भागांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले आहे.  उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनीही शनिवारी जोशीमठला भेट दिली. यासोबत तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.  

======

हे देखील वाचा : मध्यप्रदेशची राजधानी इंदौरमध्ये 17 वे प्रवासी भारतीय संमेलन सुरु

======

भूगर्भशास्त्रज्ञ, अभियंते आणि अधिकाऱ्यांच्या पाच सदस्यीय पथकाने या खड्ड्यांची तपासणी केली आहे.  एनटीपीसीच्या जलप्रकल्पाचे बोगदे आणि चारधाम ऑल-वेदर रोडचे बांधकाम या सर्व परिस्थितीसाठी जबाबदार धरले जात आहे.  बोगद्याच्या कामाचा सर्व गाळ मोठ्या प्रमाणात निघाल्यामुळे हा बोगदा बंद करण्यात आला. प्रकल्पाचा 16 किमी लांबीचा बोगदा जोशीमठच्या खालून जाणार आहे. शास्त्रज्ञांच्या मते, या बोगद्यात वायू तयार होत आहे, ज्यामुळे वरच्या दिशेने दाब निर्माण होत आहे. यामुळेच जमीन बुडत आहे. तसेच जोशीमठ अलकनंदा नदीकडे सरकत असल्याचेही काही स्थानिकांचे म्हणणे आहे.   यासंदर्भात निर्णायक पावले तातडीने न उचलल्यास मोठा अनर्थ घडू शकतो आणि जोशीमठचे अस्तित्व पुसले जाऊ शकते, असा इशारा भूगर्भशास्त्रज्ञांनी दिला आहे.  जोशीमठमधील विध्वंस पाहून तज्ज्ञांचे पथकही अवाक झाले आहे.  जोशीमठच्या रहिवाशांना रात्री त्यांच्या घराच्या फरशीखाली पाणी वाहत असल्याचा आवाज येत आहे. पथकातील सदस्यांनी दिवसभर शहरातील खड्ड्यांची तपासणी सुरूच ठेवली, मात्र हे पाणी जमिनीखाली कोठून येत आहे, याचा कोणताही पत्ता त्यांना लागला नाही.

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यासंदर्भात म्हणाले की, जोशीमठ येथील जमीन खचण्याची घटना अत्यंत चिंताजनक आहे. ऐतिहासिक आणि पौराणिक सांस्कृतिक नगरी जोशीमठ धोक्यात आली आहे.  याचा बचाव करण्यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना कराव्या असे आवाहन त्यांनी केले आहे.  

सई बने…


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.