Home » स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा झाली शारदा मातेची पूजा

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा झाली शारदा मातेची पूजा

by Team Gajawaja
0 comment
Sharda Mata
Share

काश्मिरमध्ये आता शारदा मातेच्या (Sharda Mata) भक्तांची मोठी गर्दी जमली आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, म्हणजेच 1947 सालानंतर पहिल्यांदाच काश्मीरच्या शारदा मंदिरात नवरात्रीची पूजा करण्यात येत आहे. काश्मिरची आद्य देवता म्हणून या शारदा मातेचा उल्लेख होतो. मात्र देशाची फाळणी झाली आणि शारदा माता मंदिराची दुर्दशा झाली. काश्मिरमधील पंडितांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या या मंदिराची पुन्हा बांधणी अलिकडे करण्यात आली.  या मंदिराचा उदघाटन सोहळाही मोठा गाजला होता. आता त्याच शारदा माता मंदिरात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच नवरात्रीची पूजा,  होम हवन करण्यात येत आहेत.  यानिमित्तानं  भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली असून, हा आमच्यासाठी खूप मोठा सोहळा असल्याचे भाविकांनी सांगितले.  

1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण या स्वातंत्र्यानंतरही काश्मिरमध्ये अनेक वर्ष तणावाचे वातावरण होते.  दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांवर अनेक अत्याचार केले.  यामुळे हजारो काश्मिरी पंडित आपली मायभूमी सोडून अन्यत्र राहू लागले.  असे असले तरी या सर्वांच्या मनात काश्मिरची शारदा माता सदैव राहिली.  पण फाळणीनंतर या शारदा माता मंदिराचीही दुर्दशा झाली. या मंदिराचा जीर्णोद्धार गृहमंत्री अमित शहा यांनी 23 मार्च 2023 रोजी केला.  त्यानंतर या मंदिरात भक्तांची गर्दी वाढू लागली. आता नवरात्रीच्या निमित्तानं शारदा माता मंदिर भक्तांनी फूलून गेले आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शारदा मंदिरात नवरात्री पूजा केली.  काश्मिर खो-यातील शांततेचे प्रतिक म्हणून या देवीचा उल्लेख केला जातो.   काश्मिरमध्ये शारदामाता (Sharda Mata) मंदिर हे आदी शंकराचार्यांच्या आधीपासून असल्याचा उल्लेख आहे. या मंदिर परिसरात अनेक आश्रम होते.  त्यात हजारो विद्यार्थी ज्ञानार्जन करण्यासाठी येत असत.  पण परकीय आक्रमणांनी हा सर्व परिसर नष्ट करण्यात आला.  तसेच शारदा मातेच्या मंदिरालाही हानी पोहचवण्यात आली.  

आता नव्यानं उभारण्यात आलेल्या शारदा माता मंदिराला पुन्हा पूर्वीसारखेच वैभव प्राप्त व्हावे, अशी इच्छा मातेचे भक्त व्यक्त करीत आहेत.  हंपीचे स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी आपल्या अनुयायांसह या शारदा मातेचे दर्शन घेतले.  कर्नाटकातील भगवान हनुमानाचे जन्मस्थान असलेल्या किष्किंधा येथून  स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी रथयात्रा काढली होती.  या रथयात्रेत अनेक काश्मिरी पंडितही सहभागी झाले होते. याशिवाय अनेक साधूसंतही नवरात्रौत्सवानिमित्त या शारदा मातेचे दर्शन घेण्यासाठी या भागात येत आहेत.  (Sharda Mata)

काश्मिरमधील शारदा पीठ हे जवळपास 2300 वर्षे जुने असल्याची माहिती आहे. या भागात शारदा मातेचे अनेक उपासक रहात असत.  हे सर्व शारदा मातेची (Sharda Mata) पुजा करत. या भागात हजारो विद्यार्थी देशविदेशातूनही येत असत. पहिल्यांदा मंगोलियन आक्रमकांचा या मंदिराला फटका बसला.  त्यानंतर वारंवार मंदिरावर हल्ले झाले आणि शारदापिठाचे वैभव लोप पावले.  

शारदापीठ हा सर्व परिसरच मोठ्या विद्यापिठासारखा होता.  यात  देवी सरस्वतीचे मंदिर किशनगंगा नदीच्या काठावर होते.  हा भाग आता  पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे.  त्याचे काही अवशेष भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ आहेत. यावर भारताचा अधिकार आहे. आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आणि नयनरम्य आहे. शारदा पीठ मुझफ्फराबादपासून सुमारे 140 किलोमीटर आणि कुपवाड्यापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे.  काश्मिरी पंडिताची देवता म्हणून शारदा देवीचा उल्लेख होतो.  दोन हजार वर्षापेक्षाही जुन्या असलेले मंदिर कालांतरानं भग्नावस्थेत गेले.  काश्मीरचे पंडित अनेक वर्ष या मंदिराच्या नूतनीकरणाची मागणी करत होते.  मात्र हा भाग अतिसंवेदनशील असल्यामुळे मंदिर बांधण्याच्या कामास वेळ लागला.  आता हे मंदिर पुन्हा तयार झाल्यावर त्यामध्ये माता शारदा देवीचा उत्सव सुरु आहे.  

============

हे देखील वाचा : ‘या’ मंदिरात रचले गेले महाकाली स्तोत्र

============

असे असले तरी हा मंदिराचा पहिला टप्पा असल्याचे सांगितले जाते.  कारण प्राचीन काळी हा सर्व भाग शारदापिठ म्हटला जायचा,  कारण येथे शिक्षणाचे केंद्र होते.  अनेक वाचनालये होती.  त्यात विविध विषयावरील ग्रंथसंपदा होती.  त्यांचा अभ्यास करण्यासाठी विद्वान या भागात येत असत.  इतिहासकारांच्या मते,  शारदा मातेचे मुळ मंदिर सम्राट अशोकाने इ.स.पूर्व 237 मध्ये बांधले.  शारदा पीठ हे शक्ति संप्रदायाचे पहिले तीर्थक्षेत्र आहे असे मानले जाते. काश्मीरच्या या मंदिरात देवीची पूजा सर्वप्रथम सुरू झाली.  त्यानंतर वैष्णोदेवी मंदिराची स्थापना झाली. काश्मिरी पंडित मानतात की, शारदा पीठात पूजा केली जाणारी माता शारदा ही तीन शक्तींचा संगम आहे. पहिली शारदा (शिक्षणाची देवी), दुसरी सरस्वती (ज्ञानाची देवी) आणि वाग्देवी (भाषणाची देवी). याच शारदा मातेच्या मंदिरात आता स्वातंत्र्यानंतर साज-या होणा-या नवरात्रौत्सवासाठी देश-विदेशातील भक्तांनी गर्दी केली आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.