एखाद्या गोष्टीबद्दल लोकांची मतं वेगवेगळी असतात. एकाच गोष्टीबद्दल कथा सुद्धा वेगवेगळ्या असू शकतात. साडीच्या बाबतीतही तसंच काहीस झालं आहे. सर्व प्रथम बघायचं झालं तर, रामायण महाभारतात साडीचा उल्लेख आढळतो. पूर्वीच्या काळी पुरुष आणि स्त्रिया शरीराच्या कंबरेपासून खालच्या भागात एक लहान कापड गुंडाळत असत, ज्याला आज आपण धोती किंवा धोतर म्हणतो. हेच साड्यांचे सर्वात जूने पुरावे सिंधू संस्कृतीत सापडतात, जे ईसवी सन पूर्व ३३०० ते १३०० वर्ष जूने आहेत. त्या काळात साडी ही फक्त कमरेभोवती गुंडाळली जायची, आणि शरीराचा वरचा भाग स्त्री पुरुष दोघेही उघडाच सोडत असत. तर असं सुद्धा मानलं जातं की साडी आपल्याकडे ग्रीकांकडून आली. पुरातन ग्रीक मुरत्या आणि चित्र पाहिल्यावर हे लक्षात येतं की, त्याकाळी ते लोकं लांबच लांब वस्त्र शरीराभोवती गुंडाळून त्याचं एक टोक खांद्यावर सोडून देतं असत. (Saree)
साडी हा शब्द शाटीका या संस्कृत शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ “कापडाचा पट्टा” असा आहे. ज्याचा उल्लेख बौद्ध साहित्यामध्ये महिलांचं वस्त्र म्हणून करण्यात आला आहे. यजुर्वेदात आणि ऋग्वेदात सुद्धा साड्यांचा उल्लेख आढळतो. नंतर बदलत जाणाऱ्या सत्ते नुसार आणि काळा नुसार साड्यांची फॅशन आणि साडी परिधान करण्याची स्टाइल बदलत गेली. आर्यं जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांच्या सोबत एक शब्द सुद्धा भारतात आला, तो म्हणज वस्त्र. जेव्हा ते दक्षिण भारताकडे गेले, तेव्हा त्यांनी कपड्याला कंबरेभोवती बांधण्याची शैली स्वीकारली. या कालखंडातच रंगीबेरंगी रंगांनी सजवलेल्या साड्यांचा वापर सुरू झाला आणि कापडावर वनस्पतींच्या रंगांचा वापर लोकप्रिय झाला. महिलांनी साड्या घालण्यास सुरुवात केली आणि त्या साड्यांवर भरतकाम आणि नक्षीकाम करण्याची सुरुवात झाली. त्यानंतर राजघराण्यातील स्त्रियांनी साड्यांवर मणी आणि रत्नांचा वापर करायला सुरुवात केली. त्याचा प्रभाव असा पडला की, तो आजच्या काळातील साड्यांवर सुद्धा दिसतो. (Social News)
=======
हे देखील वाचा : जय हो !
========
ब्रिटिश राजवटीपूर्वी अनेक ठिकाणी ब्लाउजशिवाय साडी नेसली जात असे. पण असं मानलं जातं की, ज्ञानोदानंदिनी देवी या ब्लाउज परिधान करणाऱ्या पहिल्या बंगाली महिला होत्या. ज्ञानोदानंदिनी या रवींद्र नाथ टागोर यांचे भाऊ सत्येंद्र नाथ टागोर यांच्या पत्नी आणि समाजसुधारक होत्या. ज्ञानोदानंदिनी सरकारी नोकरीत असलेल्या पतीबरोबर 1870 च्या दरम्यान बॉम्बेला म्हणजेच आताच्या मुंबईला गेल्या, त्यावेळी त्या पारशी पद्धतीची साडी नेसायला शिकल्या. मग पुन्हा कोलकात्याला परतल्यावर त्यांनी पेटिकोट आणि केमिस ब्लाऊज तसंच जॅकेटसह साडी नेसण्याची ही पद्धत शिकवण्यास तयार असल्याचं अनेक महिलांना सांगितलं. कारण त्याकाळी बंगाली स्त्रियांमध्ये साडी नेसण्याची पध्दत ही बाहेर फिरताना फारशी योग्य समजली जात नव्हती. म्हणून त्यांच्या या साडी नेसण्याच्या पद्धतीकडे महिलाही आकर्षित झाल्या. काळासोबत भारतीय पोशाख आणि वस्त्रांमध्ये बद्दल होतं गेले, काही पोशाख तर नामशेष सुद्धा झाले. पण साडी हे वस्त्र आजही टिकून आहे. आज वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्यामार्केटमध्ये उपलब्ध आहेत. साडी नेसण्याचे ८० पेक्षा जास्त प्रकार सुद्धा नोंदवले गेले आहेत. आज भारतीया संस्कृतीचा सार आणि आधुनिक फॅशन ट्रेंड या दोघांना सोबत घेऊन साडी जागतिक फॅशनवर प्रभाव टाकते. (Saree)